रात्री झोपण्यापूर्वी आध्यात्मिक स्तरावरील उपाय आवर्जून करणे आवश्यक !
‘सध्याच्या आपत्काळात वाईट शक्तींचे त्रास पुष्कळ वाढले आहेत. त्यामुळे बहुतांशी साधकांवर दिवसभर मधे मधे काळे (त्रासदायक) आवरण येत असते. साधकांनी मधे मधे ते काढत रहावे. रात्री झोपायला जाण्यापूर्वी आवरण न काढल्यास रात्रभर आवरणयुक्त राहिल्याने वाईट शक्तींचे आक्रमण अधिक होण्याची शक्यता असते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे खडेमिठाचे उपाय करावेत. पुष्कळ दमल्यामुळे खडेमिठाच्या पाण्यात पाय बुडवून उपाय करणे शक्य नसल्यास अंथरुणावर आरामदायी स्थितीत बसून किंवा पहुडलेल्या स्थितीत दोन्ही हातांच्या मुठीत खडेमीठ घेऊन उपाय केले तरी चालतील. ही पद्धत पुढीलप्रमाणे आहे.
१. दोन्ही हातांच्या मुठींत सहजपणे मावेल इतके खडेमीठ घ्यावे.
२. प्रार्थना करून १० मिनिटे भावपूर्ण नामजप करावा. या वेळी सूक्ष्मातून (मनाने) आवरणही काढू शकतो.
३. त्यानंतर ते खडेमीठ हस्तप्रक्षालनपात्रात (‘बेसिन’मध्ये) विसर्जित करावे आणि दोन्ही हात धुवून घ्यावेत.
झोपण्यापूर्वी काही वेळ नामजप केल्यास रात्रभर तो चालूही रहातो. यामुळे रात्रभर संरक्षककवच लाभण्यास साहाय्य होते.’
– पू. संदीप आळशी (२०.११.२०२४)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |