जुनं ते सोनं !

पूर्वीच्या काळातील अनेक गोष्टी किंवा वस्तू कालौघात विस्मरणात जातात किंवा नव्या वस्तूंमुळे त्या जुन्या गोष्टी/वस्तू बाद कराव्या लागतात. असे असले, तरी ‘जुने ते सोने’ हे लक्षात ठेवून त्यांना हीन लेखू नये. विज्ञानाच्या जोरावरील प्रगतीमुळे कालबाह्य होत असलेल्या अनेक गोष्टींना तुलनेत अल्प महत्त्व दिले जाते; पण त्या कधी काळी उपयोगात पडतील, हे आपण ठरवू शकत नाही. यासंदर्भात नुकतीच घडलेली एक घटना आहे. ‘फेरारी’ या सुप्रसिद्ध आस्थापनाची ‘कॅलिफोर्निया’ ही आलिशान, सर्व सुविधांनी सज्ज असलेली चारचाकी गाडी अलिबाग येथील रेवदंड्याच्या समुद्रकिनार्‍यावर वाळूत रुतली होती. चालकाने अतीउत्साहाच्या भरात समुद्रकिनार्‍यावर वाहन नेले खरे; पण त्याला अंदाज न आल्याने गाडी वाळूत रुतून बसली. चाके आत गेल्याने त्याला गाडी बाहेर काढता येईना ! आता इतक्या नाजूक आणि महागड्या गाडीला तेथून बाहेर काढणार तरी कसे ? हा सर्वांसमोरच मोठा यक्षप्रश्न होता. इतक्यात तेथून जाणार्‍या एका बैलगाडी चालकाला सर्वांनी विनंती केली. त्यानंतर चारचाकीला दोर लावून तो बैलगाडीला बांधण्यात आला. बैलांनी फेरारीला ओढून वाळूतून अलगद बाहेर काढले. शेवटी काय, ‘फेरारी’च्या समोर बैलगाडीच श्रेष्ठ ठरली ! इतके अत्युच्च दर्जाचे चारचाकीचे मॉडेल असूनही शेवटी बैलांचेच साहाय्य घ्यावे लागले. म्हणजे काय, तर ‘विज्ञान’ थिटे पडले ! बैलांचे सामर्थ्य लक्षात घेता बैलगाडीसारख्या जुन्या; पण मौल्यवान वाहनाला नावे ठेवून चालणार नाही. पूर्वीच्या काळी बैलगाडीनेच लोक प्रवास करत असत; पण आता चारचाकी आल्याने बैलगाडीचे महत्त्व न्यून झाले. बैल शेतीच्या कामांसाठी उपयोगी आहेतच; पण अशा घटनांतून बैलगाडीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. शेवटी काय, ‘जुनं ते सोनं’ !

लहान मुले पूर्वी मैदानी खेळ खेळत, आता ती जागा भ्रमणभाषने घेतली असल्याने मैदाने ओसाड पडली आहेत. भ्रमणभाषच्या विळख्यात अडकलेली हीच मुले व्याधीग्रस्त होऊन रुग्णालये किंवा चिकित्सालये अशा ठिकाणी दुर्दैवाने दिसत आहेत. यातूनच मैदानी खेळांचे महत्त्व अधोरेखित होते. सध्या तरुण पिढी, तसेच लहान मुले यांना पिझ्झा, बर्गर, मोमोज किंवा शॉरमा या पदार्थांचे भरपूर वेड आहे. हे पदार्थ प्रतिदिन खाणारेही समाजात आहेत. या पदार्थांमुळे शरिरावर महाभयंकर दुष्परिणाम होत आहेत. या पदार्थांना भाकरी-पोळी, भाजी, वरण, भात यांची सर कधीच येऊ शकत नाही. मुली-तरुणी न्यूनतम कपडे परिधान करून समाजात वावरतात. ही त्यांच्या दृष्टीने ‘फॅशन’ ठरते; पण आज याच लेकीबाळींवर होणारे अत्याचार किंवा बलात्कार पहाता त्यांनी भारतीय संस्कृतीनुसार अंग झाकले जातील, असे कपडे परिधान करणे, हे कालसुसंगत ठरणार नाही का ? पण त्यांना शहाणपण येईल तेव्हाच खरे म्हणायचे ! अशा प्रकारे ‘जुन्यां’ना जपा; कारण ते ‘सोने’ म्हणजेच मौल्यवान आहे !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.