श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सातारा येथे शतचंडी यागाचे आयोजन !
सातारा, ५ जानेवारी (वार्ता.) – श्रीक्षेत्र सज्जनगड येथील ‘श्री समर्थ सेवा मंडळा’च्या वतीने ७ ते ९ जानेवारी या कालावधीमध्ये शतचंडी यागाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेशबुवा रामदासी यांनी दिली. श्री समर्थ सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अमृत महोत्सवी वर्षाची सांगता शाकंभरी नवरात्रीचे औचित्य साधून करण्यात आली आहे. सातारा आणि पंचक्रोशीतील समर्थभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
समर्थभक्त योगेशबुवा रामदासी पुढे म्हणाले, ‘‘७ जानेवारी या दिवशी सकाळी ८ ते ९ या वेळेत प्रायश्चित्त, प्रधान संकल्प, पुण्याहवाचन होणार आहे. सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना, तसेच देवतांचे आवाहन करून पूजन होणार आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० या वेळेत देवीला कुंकूमार्चन होणार आहे. ज्या भाविकांना कुंकूमार्चन करायचे आहे, त्यांनी समर्थ सदन येथे आपल्या नावाची नोंदणी करावी.’’
शतचंडी यज्ञासाठी केले जाणारे होम आणि हवन यांसाठी मोठ्या स्वरूपातील यज्ञकुंडही साकारण्यात आले आहेत. समर्थ सदन मधील दक्षिणेच्या उजव्या बाजूला यानिमित्त होणार्या कीर्तन प्रवचन सेवेसाठी भव्य मंच उभारण्यात आला आहे. शतचंडी यागाची माहिती देणारे भव्य फलक, तसेच स्वागत कमानी शहर परिसरातील मुख्य चौकाचौकात लावण्यात आल्या आहेत.