पर्यावरणविषयक नियमांच्‍या पालनाची सिद्धता करा, अन्‍यथा व्‍यवसाय बंद करण्‍याची सिद्धता ठेवा ! – गोवा राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळ

‘गोवा राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने पर्यावरण संरक्षणासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्‍यानुसार विविध संस्‍थांना पर्यावरणविषयक आवश्‍यक मान्‍यता वा संमती मिळवण्‍याची सक्‍ती करण्‍यात आली आहे. संस्‍थांनी या नियमांचे पालन न केल्‍यास त्‍यांच्‍यावर तात्‍काळ आस्‍थापन बंद करण्‍याची कारवाई होऊ शकते. यामुळे गोवा राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरणविषयक कायद्यांच्‍या कार्यवाहीच्‍या दृष्‍टीने कटीबद्ध असल्‍याचे संकेत मिळत आहेत.

१. गोवा राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश कुणासाठी ?

गोवा राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नुकत्‍याच जारी केलेल्‍या सार्वजनिक नोटिसीमध्‍ये खालील प्रकारच्‍या संस्‍थांसाठी व्‍यापक मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत.

श्री. नारायण नाडकर्णी

अ. निवासी संकुल : २४ किंवा अधिक सदनिका असलेल्‍या संकुलांचा समावेश.

आ. व्‍यावसायिक युनिट्‍स : बेकरी, लाँड्री (कपडे धुलाई केंद्र), पिठाच्‍या आणि तांदळाच्‍या गिरण्‍या अन् लाकूड काम करणारे यांचा समावेश.

इ. आतिथ्‍य क्षेत्र : हॉटेल्‍स (उपाहारगृहे), गेस्‍ट हाऊस, रिसॉर्ट्‍स, मोटेल्‍स आणि रेस्‍टॉरंट्‍स.

ई. कार्यक्रमस्‍थळे : मेजवानीसाठी सभागृह (बँक्‍वेट हॉल), खुली स्‍थळे आणि मंगल कार्यालये

उ. कृषीविषयक स्‍थळे : डेअरी, गोशाळा, कुक्‍कुटपालन आणि वराह पालन यांचा समावेश.

या सर्व संस्‍थांनी जल आणि वायू प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार ‘स्‍थापना अनुज्ञप्‍ती’ (परवाने) आणि ‘संचालन अनुज्ञप्‍ती’ मिळवणे आवश्‍यक आहे.

२. नियमांचे पालन न केल्‍यास होणारे परिणाम

गोवा राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्‍पष्‍ट केले आहे, ‘वैध अनुज्ञप्‍तीखेरीज कोणतीही संस्‍था किंवा केंद्र कार्यरत ठेवणे सहन केले जाणार नाही. मंडळाकडून घालून दिलेल्‍या नियमांचे उल्लंघन करणार्‍या संस्‍थांना तात्‍काळ बंद करण्‍याचे आदेश दिले जाऊ शकतात.’ आस्‍थापनांनी त्‍यांच्‍या अनुज्ञप्‍तीविषयीची माहिती त्‍यांच्‍या प्रांगणात स्‍पष्‍टपणे दर्शवण्‍याची आवश्‍यकता आहे. ग्राहकांना आणि जनतेला संस्‍थेच्‍या नियमांचे पालन करण्‍याच्‍या स्‍थितीविषयी माहिती देण्‍यासाठी हे आवश्‍यक आहे.

३. प्रदूषण मंडळाकडून ध्‍वनीप्रदूषणावर लक्ष

पर्यावरणदृष्‍ट्या संमतीच्‍या नियमनासह गोवा राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळानेे ध्‍वनीप्रदूषणाविषयीची त्‍यांची भूमिका पुन्‍हा एकदा स्‍पष्‍ट केली आहे. आवाजाच्‍या त्रासाविषयीच्‍या तक्रारी स्‍थानिक पोलीस प्राधिकरणांकडे पाठवल्‍या पाहिजेत, ज्‍यामुळे ते राज्‍य सरकारच्‍या ध्‍वनीविषयक योजनेशी संलग्‍न होते.

४. गोवा राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेली कारवाई

ही सार्वजनिक नोटीस गोवा राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळाने विविध आस्‍थापनाविरुद्ध नियमांची कार्यवाही करत केलेल्‍या कारवाईच्‍या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध केली आहे. मे २०२४ मध्‍ये काही हॉटेल्‍स आणि उपाहारगृहे जलाशयात सांडपाणी सोडतांना आढळली होती. यासह जी हॉटेल्‍स आणि उपाहारगृहे आवश्‍यक अनुज्ञप्‍तीविना कार्यरत होती, ती बंद करण्‍यात आली. या व्‍यावसायिकांनी स्‍थानिक सांडपाणी विल्‍हेवाट विभागाला दोष दिला होता; कारण सांडपाणी विल्‍हेवाट विभाग त्‍यांना त्‍यासंबंधीची जोडणी प्रदान करण्‍यात अपयशी ठरला होता.

५. निष्‍कर्ष

गोवा राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नवीन निर्देश गोव्‍यातील सर्व व्‍यवसायांसाठी पर्यावरणविषयक नियमांच्‍या पालनाचे महत्त्व अधोरेखित करतात. या नियमांचे पालन करून मंडळ सार्वजनिक आरोग्‍याचे संरक्षण करण्‍यासह भविष्‍यातील पिढ्यांसाठी गोव्‍याची नैसर्गिक सुंदरता जपण्‍याचा प्रयत्न करत आहे. मंडळाने संस्‍थांना त्‍यांच्‍या पर्यावरणविषयक संमती सुरक्षित करण्‍यासाठी तात्‍काळ कार्यवाही करण्‍याचे आवाहन केले आहे.