पिंगुळी येथील सुप्रसिद्ध प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात चोरी
चांदीच्या मूर्ती आणि रोख रक्कम मिळून साडेपाच लाख रुपयांची चोरी
कुडाळ – तालुक्यातील पिंगुळी येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिर आणि प.पू. समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज समाधी मंदिर या २ मंदिरांत ३ जानेवारीच्या मध्यरात्री चांदीच्या मूर्ती आणि दानपेटीतील रोख रक्कम, अशी एकूण ५ लाख ३८ सहस्र रुपयांच्या साहित्याची चोरी झाली आहे. या मंदिरात अशा प्रकारची घटना प्रथमच घडली असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या घटनेत प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांच्या समाधी मंदिरातील १ लाख रुपये किमतीची प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांची चांदीची मूर्ती, २० सहस्र रुपये किमतीची स्टीलची १ दानपेटी, ५ सहस्र रुपये किमतीचे चांदीचे ताट यांची चोरी करण्यात आली, तसेच प.पू. सद्गुरु विनायक (अण्णा) राऊळ महाराज समाधी मंदिरातील १० सहस्र रुपये किमतीची एक लाकडी दानपेटी, तसेच ३ लाख ९८ सहस्र रुपये किमतीच्या चांदीच्या पादुका, ५ सहस्र रुपये किमतीची एक दत्तमूर्ती यांची चोरी करण्यात आली.
प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात सुरक्षारक्षक कार्यरत असतात. रात्री २.३० वाजेपर्यंत हे सुरक्षारक्षक जागे होते. त्यानंतर ते झोपले आणि चोरांनी संधी साधून मंदिरामध्ये चोरी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर आलेले पोलिसांचे श्वानपथक येथील रेल्वे रुळापर्यंत जाऊन घुटमळले. पोलिसांना तेथे चोरी केलेले काही साहित्य सापडले. या साहित्याची ठसे तज्ञांकडून पोलिसांनी तपासणी केली. याविषयी समाधी मंदिराचे पुजारी दिनेश ठाकूर यांनी सद्गुरु राऊळ महाराज संस्थानचे उपकार्याध्यक्ष दशरथ राऊळ यांना माहिती दिल्यावर राऊळ यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.