दाणोली येथे गोवंशियांची अवैध वाहतूक गोरक्षकांनी रोखली
|
सावंतवाडी – नेरूर, तालुका कुडाळ येथून आजरा, संकेश्वर येथे ३ जानेवारी या दिवशी गोवंशियांची होणारी अवैध वाहतूक गोरक्षकांनी तालुक्यातील दाणोली येथे रोखली. या प्रकरणी पोलिसांनी वाहनाचा चालक आणि त्याचा साहाय्यक या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे, तसेच वाहनात असलेल्या ४ गोवंशियांना गोशाळेत सोडले.
नेरूर येथून गोवंशियांची वाहतूक होणार असल्याचे समजल्यावर दाणोली येथे गोरक्षकांनी संबंधित वाहन अडवले आणि पहाणी केली असता ४ बैल वाहनात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गोरक्षकांनी चालक आणि त्याचा सहकारी यांना पोलिसांच्या कह्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता गुरांच्या वाहतुकीचा परवाना, गुरांच्या मूळ मालकाची संमती, गुरे खरेदी केल्याचे कागदपत्र आणि गुरांची वैद्यकीय तपासणी केल्याचे पशूवैद्याचे पत्र चालकाकडे नव्हते. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली.