वायूप्रदूषण नियंत्रणात येईपर्यंत बांधकाम प्रकल्पांवरील निर्बंध कायम !
मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश
मुंबई – जोपर्यंत वायूप्रदूषण पूर्णपणे नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत ई-विभागातील बांधकाम प्रकल्पांवरील निर्बंध कायम रहातील. वारंवार सूचना देऊनही निकषांची पूर्तता न करणार्या बांधकाम प्रकल्पांवर कठोर कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
मुंबई महानगरातील वायूप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कठोर नियमावली घोषित केली आहे. ज्या परिसरांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट अथवा अतीवाईट श्रेणीत आहे, तेथील बांधकामे सरसकट पूर्णत: बंद करण्यात आली आहेत. यामध्ये भायखळा आणि बोरिवली (पूर्व) यांचा प्रामुख्याने समावेश आहे. बांधकामे थांबवल्यानंतरची तेथील स्थिती जाणून घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी भायखळा येथील बांधकाम प्रकल्पांना १ जानेवारी या दिवशी अचानक भेट देत स्थळ पहाणी केली.