‘जगभरातील विविध भाषांची निर्मिती आणि त्यांतील आध्यात्मिक भेद’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
‘भारतातील मुख्य प्रांतीय भाषा, उदा. मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम् इत्यादी आणि विदेशी भाषा, उदा. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, उर्दू इत्यादी यांच्यामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या काय भेद आहे ? या सर्वांची उत्पत्ती कोणत्या काळात, कशी अन् का झाली ?’, यांसंदर्भात मला देवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे. (भाग १)
टीप : भारतातील प्रांतीय भाषा आणि विदेशी भाषा यांच्या निर्मितीच्या कालखंडांची माहिती प्रचलित आहे; परंतु ‘त्या भाषांची बिजे समाजात कधी अन् कशी रोवली गेली ?’, याचे विश्लेषण सूक्ष्मातून प्राप्त झालेल्या ज्ञानाद्वारे दिलेले आहे. त्यामुळे भाषांच्या निर्मितीच्या कालखंडांमध्ये भेद आढळून येतो. वाचकांनी याची कृपया नोंद घ्यावी.
१. मराठी भाषेची निर्मिती – इ.स. पूर्व ५०० पासून मराठी भाषेचा उगम होण्याविषयीचा इतिहास
इ.स. पूर्व ५०० पर्यंत पृथ्वीवर सर्वत्र संस्कृत भाषा प्रचलित होती आणि ती बोलली जात होती. इ.स. पूर्व ५०० पासून ‘कालमाहात्म्य आणि कलियुगाचा प्रतिकूल प्रभाव’, यांमुळे समाजातील व्यक्तींतील सात्त्विकता घटू लागली. त्यामुळे त्यांना संस्कृत भाषा बोलणे अथवा समजणे कठीण होऊ लागले. तेव्हा संस्कृत भाषेचे ज्ञान असलेल्या काही पंडितांनी श्री सरस्वतीदेवीला विनवणी केली, ‘संस्कृत भाषेप्रमाणे सात्त्विकता, सहजता आणि सौंदर्य अबाधित राहून नवीन भाषेची निर्मिती करावी अन् संस्कृत भाषेच्या तुलनेत नवीन भाषेतील शब्द आणि त्यांचे उच्चार सुलभ असावेत.’ त्यातून मराठी भाषेची निर्मिती झाली.
१ अ. सरस्वतीदेवीच्या आशीर्वादाने मराठी भाषेच्या निर्मितीसाठी ‘महामहीम’ या देवाची निर्मिती होणे : समाजातील काही ज्ञानी पंडितांनी ‘संस्कृत भाषेला पर्यायी असलेली नवीन, म्हणजे मराठी भाषेची निर्मिती करणे आणि तिचा विस्तार करणे महत्त्वाचे आहे’, हे जाणले होते. त्यासाठी त्यांनी काही काळ सरस्वतीदेवीची आराधना केली. त्यामुळे सरस्वतीदेवी प्रसन्न झाली. तिच्या आशीर्वादाने सागरातून एखादा थेंब सागराच्या किनारी यावा, त्याप्रमाणे ईश्वराच्या अनंत स्वरूपातून ‘महामहीम’ या देवाची निर्मिती झाली.
१ अ १. ‘महामहीम’ या शब्दाचा अर्थ : ‘महा’ हा शब्द सात्त्विकतेशी संबंधित आहे, तर ‘महीम’, म्हणजे विस्तार करण्याची क्षमता असलेला. भाषेद्वारे सात्त्विकतेचा विस्तार करणारा देव, म्हणजे ‘महामहीम’ होय.
१ अ २. ‘महामहीम’ या देवाचे वर्णन : ‘महामहीम’ या देवाचे कपडे शुभ्र रंगाचे असून त्याच्या दोन्ही हातांत नुकतीच उमललेली लाल रंगाची कमळे आहेत. त्यांपैकी एक कमळ संस्कृत भाषा आणि दुसरे कमळ मराठी भाषा यांचे प्रतीक आहे.
प्राचीन काळापासून संस्कृत भाषा सर्वत्र प्रचलित आहे; परंतु तिच्यात टप्प्याटप्प्याने काही पालट होत गेले. या प्रक्रियेचे वर्णन ‘महामहीम’ या देवाच्या एका हातातील नुकत्याच उमलेल्या कमळाद्वारे केले आहे. ‘मराठी भाषेचा नव्याने आरंभ होणार आहे’, ही प्रक्रिया ‘महामहीम’ या देवाच्या दुसर्या हातातील नुकत्याच उमललेल्या कमळाद्वारे व्यक्त होते.
१ अ ३. ‘महामहीम’ या देवाचे वैशिष्ट्य : ‘महामहीम’ या देवाच्या दोन उपशक्ती आहेत. एका उपशक्तीचे नाव ‘आदित्य’ आणि दुसर्या उपशक्तीचे नाव ‘कला’ आहे.
१ अ ३ अ. ‘आदित्य’ या शब्दाचा अर्थ : येथे ‘आ’ हा शब्द ‘तेज’, या अर्थाने आहे आणि ‘दित्य’ हा शब्द ‘दिपवून टाकणारा किंवा प्रभाव निर्माण करणारा’, याच्याशी संबंधित आहे. स्वतःच्या भाषारूपी तेजाने पृथ्वीला प्रभावित करणारा देव, म्हणजे ‘आदित्य’ होय.
१ अ ३ आ. ‘कला’ या उपशक्तीचे वैशिष्ट्य : भाषेतील व्याकरण, म्हणजे तिच्यातील शब्द, काना, मात्रा, वेलांटी इत्यादींच्या निर्मितीची क्षमता असलेली शक्ती, म्हणजे ‘कला’ ही उपशक्ती होय.
१ अ ४. ‘महामहीम’ या देवाने ‘आदित्य’ आणि ‘कला’ या दोन उपशक्तींद्वारे मराठी भाषेविषयी केलेले कार्य : ‘महामहीम’ या देवाने ‘आदित्य’ आणि ‘कला’ या दोन उपशक्तींद्वारे मराठी भाषेची निर्मिती अन् समाजात तिचा हळूहळू विस्तार केला. ‘आदित्य’ आणि ‘कला’ या दोन उपशक्तींनी मराठी भाषेचे ज्ञान काही पंडितांना सूक्ष्मातून दिले. पंडितांनी ते ज्ञान शब्दबद्ध करून भाषेचे विशिष्ट नियम सिद्ध केले. त्यानंतर त्यांनी समाजात मराठी भाषा प्रचलित केली.
मराठी भाषेत सरस्वतीदेवीचे तेज, सौंदर्य, रस आणि प्रेम आल्याने ही भाषा सर्वत्र प्रचलित होऊ लागली. संस्कृत भाषा बोलणार्यांनाही मराठी भाषेतील सात्त्विक गोडवा अनुभवता आल्याने त्यांनीही मराठी भाषेला विरोध न करता तिचा स्वीकार केला.
२. हिंदी भाषेच्या निर्मितीचा इतिहास
इ.स. पूर्व ३०० मध्ये समाजात मराठी भाषा प्रचलित होऊ लागली; परंतु तेव्हा समाजाची सात्त्विकता आणखी घटली. त्यामुळे काही लोकांना मराठी भाषा ही कंटाळवाणी आणि समजण्यास कठीण होऊ लागली. त्यामुळे भाषेशी संबंधित काही पंडितांनी पर्यायी भाषेची निर्मिती करण्यासाठी सरस्वतीदेवीची आराधना केली. त्या वेळी सरस्वतीदेवी प्रसन्न झाली. तिने ‘महामहीम’ या देवाला नवीन भाषेच्या निर्मितीचे संकेत दिले. त्यानंतर ‘महामहीम’ या देवाकडील ‘उपेंद्र’ या उपशक्तीने हिंदी भाषेची निर्मिती केली.
२ अ. ‘उपेंद्र’ शब्दाचा अर्थ : ‘उ’ हा शब्द आपतत्त्वाशी संबंधित आहे आणि ‘द्र’ हा शब्द ‘रस’ या घटकाशी संबंधित आहे. भाषेद्वारे आपतत्त्वाशी संबंधित रसाची निर्मिती करणारा देव, म्हणजे ‘उपेंद्र’ होय.
२ अ १. ‘उपेंद्र’ या देवाचे हिंदी भाषेसंबंधीचे कार्य : ज्या पंडितांनी ‘मराठी भाषेला पर्यायी भाषा असावी’, यासाठी उपासना केली होती, त्या पंडितांना ‘उपेंद्र’ या देवाने सूक्ष्मातून हिंदी भाषेचे ज्ञान दिले. त्या भाषेचा समाजात हळूहळू विस्तार होऊ लागला. समाजातील काही लोकांना मराठी भाषेपेक्षा हिंदी भाषेतील मृदूता आणि रस अधिक प्रभावित करू लागला. त्यामुळे मराठीच्या समवेत हिंदी भाषेचाही हळूहळू सर्वत्र प्रसार होऊ लागला.
२ आ. हिंदी भाषेचे वैशिष्ट्य : मराठी भाषा तेजतत्त्वाशी संबंधित आहे. हिंदी भाषा आपतत्त्वाशी संबंधित आहे. त्यामुळे हिंदी भाषेत मराठीच्या तुलनेत अल्प शक्ती आहे; परंतु तिच्यात मराठी भाषेपेक्षा अधिक रस आहे.
२ आ १. ‘हिंदी भाषेत रस असणे’, म्हणजे काय ? : ‘हिंदी भाषेतील शब्दांमध्ये ‘विनम्रता आणि दुसर्याला आदर देणे’, यांवर भर दिला आहे. त्यातून हिंदी भाषिकांमध्ये आपापसांत जवळीक किंवा आत्मीयता लवकर निर्माण होते’, हे या भाषेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ‘हिंदी भाषेत रस आहे’, असे म्हटले आहे.
२ इ. इ.स. पूर्व ३०० मध्ये उगम पावलेल्या हिंदी भाषेचा विस्तार इ.स. १२०० मध्ये होणे : पृथ्वीच्या आरंभापासून पुढे अनेक युगे समाजात संस्कृत भाषा टिकून होती. संस्कृत भाषेचा परिणाम इ.स. १२०० पर्यंत टिकून होता. त्यामुळे इ.स. ३०० मध्ये समाजात हिंदी भाषेची बिजे रोवली गेली, तरी हिंदी भाषेचा विस्तार इ.स. १२०० पासून वेगाने होऊ लागला.
३. कन्नड भाषेची निर्मिती
इ.स. पूर्व २०० मध्ये समाजातील सात्त्विकता घटत गेल्याने समाजातील व्यक्तींतील रजोगुणात वाढ होऊ लागली. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला संस्कृत आणि मराठी भाषा नकोशी झाली. त्या काळी काही ज्ञानी जिवांच्या मनात ‘आता नूतन भाषेची निर्मिती करायला हवी’, असा विचार आला. ते सर्व ज्ञानी जीव रजोगुणी होते आणि भगवतीचे उपासक होते. त्या ज्ञानी जिवांनी भगवतीला प्रसन्न केले आणि तिच्याकडे नवीन भाषेचे वरदान मागितले. त्यामुळे भगवतीचा एक दूत ‘वारू’ प्रगट झाला. ‘वारू’ हा रजोगुणी आहे.
३ अ. ‘वारू’ या शब्दाचा अर्थ : ‘वा’ म्हणजे ‘वेगवान’ आणि ‘रू’ म्हणजे प्रकृती. भगवतीदेवीने दिलेले कार्य वेगवान पद्धतीने करणारा देव, म्हणजे ‘वारू’ होय.
३ अ १. ‘वारू’ने कन्नड भाषेची निर्मिती कशी केली ? : ‘व्यक्तीला शिंक ज्या गतीने येते, त्या गतीने ‘वारू’ या दुताने कन्नड भाषेची निर्मिती केली. त्या भाषेत ‘वारू’चा रजोगुण उतरला आहे. ‘वारू’ या दुतामध्ये रजोगुण असल्याने तो कन्नड भाषेतील ज्ञान काही ज्ञानी पंडितांना सूक्ष्मातून पुष्कळ गतीने देत होता; परंतु त्या ज्ञानी पंडितांना एवढ्या गतीने कन्नड भाषेशी संबंधित ज्ञान ग्रहण करता येत नव्हते. त्यामुळे वारूने ज्ञानी उपासकांना ग्रहण होईल, एवढ्या गतीने त्यांना कन्नड भाषेचे ज्ञान दिले; परंतु त्यात विशिष्ट गतिमानता होती. त्यामुळे ज्ञानी उपासकांना काही मासांतच कन्नड भाषेचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर कन्नड भाषेचा विस्तार समाजात हळूहळू होऊ लागला.’
(क्रमश : पुढच्या रविवारी)
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१०.२०२३)
|