जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धन कामाची पहाणी !
पंढरपूर – राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण खोरे विकास महामंडळ) आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी मंत्री महाजन यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धन कामाची पहाणी केली. या वेळी पुरातत्व विभाग आणि संबधित कंत्राटदार यांनी सदर कामास गती देऊन कामे वेळेत, तसेच गुणवत्तापूर्ण करावीत, अशा सूचना केल्या. उपलब्ध निधीची न्यूनता भासल्यास तात्काळ निधीची उपलब्धता शासन स्तरावरून तात्काळ येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
या वेळी मंदिरे समितीच्या वतीने मंदिरे समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर आणि शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते शाल अन् श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भाजपचे आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, मंदिर व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांसह अन्य उपस्थित होते.