‘महावितरण अभय योजना २०२४’ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ !
मुंबई – देयकाच्या थकबाकीमुळे वीजयंत्रणा कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी चालू केलेल्या ‘महावितरण अभय योजना २०२४’ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजदेयकाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
राज्यातील महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत देयकामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून ‘अभय योजना’ चालू करण्यात आली. या योजनेचा कालावधी ३० नोव्हेंबर या दिवशी संपल्यावर ३१ डिसेंबरपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली; पण राज्यातील ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पहाता ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मार्च २०२५ नंतर योजनेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून थकबाकी न भरणार्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.