महामृत्युंजय यागाचा यागातील घटकांवर सकारात्मक परिणाम होणे
नवरात्रीच्या काळात महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आलेल्या यागांच्या संदर्भातील संशोधन !
‘महर्षींच्या आज्ञेने ऑक्टोबर २०२४ मध्ये नवरात्रीतील पहिले ६ दिवस श्री शाकंभरीदेवीचा याग, त्यापुढील ३ दिवस श्री चंडीदेवीचा याग आणि विजयादशमीला महामृत्युंजय याग करण्यात आले. प्रतिदिन यागाची लघुपूर्णाहुती आणि विजयादशमीला महापूर्णाहुती करण्यात आली. या यागांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. यागांतील काही निवडक घटकांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ हे उपकरण आणि लोलक यांच्याद्वारे संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ आणि लोलक यांच्याद्वारे वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. लेखाच्या शेवटच्या भागात आपण ‘महामृत्युंजय यागाचा यागातील घटकांवर काय परिणाम झाला ?’, हे पाहूया. (भाग ३)
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/867957.html
१. महामृत्युंजय यागाचा यागातील घटकांवर सकारात्मक परिणाम होणे
यागातील काही निवडक घटकांची यागापूर्वी आणि यागानंतर छायाचित्रे काढून त्यांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. त्यांपैकी २ घटकांमध्ये (साधकाचा सदरा आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील औषधे यांच्यामध्ये) यागापूर्वी काही प्रमाणात नकारात्मक ऊर्जा होती; पण यागानंतर ती नाहीशी झाली. यागातील सर्व घटकांमध्ये यागापूर्वी सकारात्मक ऊर्जा होती आणि यागानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली. त्यांच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.
टीप १ : ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे यागातील घटकांची प्रभावळ मोजण्यासाठी चाचणीस्थळी जागा अपुरी पडल्याने ३० मीटर पुढील प्रभावळी लोलकाने मोजण्यात आल्या.
टीप २ : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची श्री शाकंभरीदेवी यागाच्या पहिल्या दिवशी (३.१०.२०२४ या दिवशी) यागापूर्वी आणि महामृत्युंजय यागाच्या दिवशी (१२.१०.२०२४ या दिवशी) यागानंतर छायाचित्रे काढून त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या.
वरील नोंदींतून पुढील सूत्रे लक्षात आली.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
१ अ. महामृत्युंजय यागानंतर शिवाच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढणे : महामृत्युंजय यागातील प्रधान देवता असलेल्या भगवान शिवाच्या चित्रात यागापूर्वीही सकारात्मक ऊर्जा होती. यागाच्या वेळी भगवान शिवाच्या चित्रात शिवतत्त्व आकृष्ट होऊन ते मोठ्या प्रमाणात वातावरणात प्रक्षेपित झाले. त्यामुळे यागानंतर शिवाच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली.
आ. महामृत्युंजय यागानंतर पूजेची मांडणी आणि मांडणीतील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली.
इ. नवरात्रीच्या काळात झालेल्या यागांना उपस्थित असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी त्यांच्या कार्यानुरूप यागांतील चैतन्य ग्रहण केले. त्यामुळे त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.
१ ई. महामृत्युंजय यागाचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांच्या खोलीत ठेवलेली त्यांची औषधे यांच्यावर पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे : महामृत्युंजय यागाचा उद्देश ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा महामृत्यूयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळावे’, हा होता. महामृत्युंजय यागाला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर हे यज्ञस्थळी प्रत्यक्ष उपस्थित नव्हते. त्यांची प्राणशक्ती अल्प असल्याने ते त्यांच्या खोलीत होते. त्यांची औषधेही त्यांच्या खोलीतच ठेवलेली होती. यागानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांमधील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाल्याचे दिसून आले, तसेच त्यांचा सदरा आणि औषधे यांच्यावरही यागातील चैतन्याचा पुष्कळ सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले.
१ उ. महामृत्युंजय यागाचा तीनही सदर्यांवर सकारात्मक परिणाम होणे; पण सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या सदर्यावर तो सर्वाधिक होणे : ‘महामृत्युंजय यागाचा एक साधक, संत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या सदर्यांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्याठी १ प्रयोग करण्यात आला. यासाठी महामृत्युंजय यागाच्या वेळी एक साधक, सद्गुरु गाडगीळकाका आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांचे सदरे यज्ञ परिसरात ठेवण्यात आले. यागापूर्वी साधकाच्या तुलनेत सद्गुरु गाडगीळकाकांच्या सदर्यात पुष्कळ अधिक सकारात्मक ऊर्जा आढळून आली आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांच्या सदर्यात सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा आढळून आली. व्यक्तीची स्पंदने तिच्या कपड्यांमध्येही विद्यमान असतात. संतांमध्ये मुळातच पुष्कळ चैतन्य असते. त्यामुळे त्यांचे कपडेही चैतन्यमय होतात. यागातील चैतन्याचा तिघांच्याही सदर्यांवर सकारात्मक परिणाम झाले; पण सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या सदर्यावर तो सर्वाधिक झाल्याचे दिसून आले.
थोडक्यात महामृत्युंजय यागाचा यागातील सर्वच घटकांवर सकारात्मक परिणाम झाला; पण सर्वाधिक परिणाम सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आणि त्यांच्याशी संबंधित वस्तू यांच्यावर झाला, असे लक्षात आले. यातून ‘ज्या उद्देशाने हा याग करण्यात आला तो उद्देश सफल झाला’, असे जाणवले.’ (समाप्त)
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा (२०.११.२०२४)