सामाजिक सजगतेद्वारे पर्यावरणाची हानी न्यून करता येईल का ?
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ आणि ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ यांच्या वतीने ‘संयुक्त राष्ट्रां’त ‘पर्यावरणातील पालट’ या विषयावर संशोधन सादर.
अझरबैजानची राजधानी बाकू येथे ‘संयुक्त राष्ट्रां’नी आयोजित केलेल्या ‘सीओपी २९’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ आणि ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ यांच्या वतीने ‘संयुक्त राष्ट्रां’त ‘पर्यावरणातील पालट’ या विषयावर १९ नोव्हेंबर २०२४ या दिवशी संशोधन सादर करण्यात आले. या परिषदेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे सदस्य श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी सादर केलेला शोधनिबंध वेथे देत आहे.
(भाग १)
१. वर्ष २०१५ मध्ये झालेला पॅरिस करार आणि सद्यःस्थिती
‘वर्ष २०१५ मध्ये पॅरिस येथे आयोजित केलेल्या पर्यावरण परिषदेत पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने काही ठराव (टीप १) करण्यात आले होते. त्याला एक दशक लोटले आहे. हे ठराव जगातील विविध राष्ट्रांत पर्यावरणाच्या र्हासाच्या संदर्भात जागृती निर्माण करणे आणि त्यांना कृतीप्रवण करणे, या दृष्टीने करण्यात आले होते. या ठरावांमुळे विविध देशांतील शासनकर्ते एकत्र येऊन या विषयांवर कार्य करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्यास सिद्ध झाले आहेत; मात्र त्यातून अपेक्षित अशी प्रगती झालेली दिसत नाही.
टीप १ : ‘पॅरिस करार’हा एक जागतिक पर्यावरण करार आहे, जो २०१५ मध्ये पॅरिस येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या ‘हवामानातील पालट’ या परिषदेत संमत झाला होता. ‘जगभरातील देशांना हवामानातील पालटाच्या दुष्परिणामांपासून वाचवणे आणि तापमान वाढ ‘२ डिग्री सेल्सिअस’च्या आत ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यास प्रोत्साहित करणे’, हा या कराराचा उद्देश होता. यामध्ये जागतिक तापमानवाढ १.५ डिग्री सेल्सिअसच्या मर्यादेपर्यंत रोखण्याचा महत्त्वाचा उद्देश आहे.
२. सामाजिक सजगता वाढवणे अत्यावश्यक !
वर्ष २०२४ संपले आहे. हे वर्ष हवामानाच्या दृष्टीने ‘सर्वाधिक उष्ण वर्ष’ म्हणून गणले गेले. (वर्ष १८५० ते १९०० च्या पूर्वीच्या काळाच्या तुलनेत जागतिक तापमान १.५ डिग्री सेल्सिअसने वाढू नये, यासाठी महत्त्वाची पर्यावरणीय सीमा घालण्यात आली आहे. याचे कारण १.५ डिग्री सेल्सिअसने तापमान वाढल्यास जागतिक पर्यावरणावर समुद्राची पातळी वाढणे, ध्रुवीय बर्फ वितळणे आणि हवामानात अत्याधिक पालट होणे इत्यादी गंभीर परिणाम होऊ शकतात.) पॅरिस करारानुसार १.५ डिग्री सेल्सिअसने तापमानवाढीला रोखण्यासाठी जागतिक उत्सर्जन न्यून करणे आवश्यक आहे. यावर्षीचे तापमान सुमारे १.५ डिग्रीने वाढलेले आहे. हरितगृह वायूंचे (टीप २) वातावरणातील प्रमाण अखंड वाढत आहे; मात्र अद्यापही हे प्रमाण शिगेला पोचल्याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. हे गंभीर वास्तव लक्षात घेऊन सर्वांनीच स्वतःची धोरणे पुन्हा निर्धारित करण्याची वेळ आली आहे. एवढेच नव्हे, तर पर्यावरणाच्या र्हासाची ही समस्या न्यून करण्यासाठी सामाजिक सजगता वाढवणे अत्यावश्यक झाले आहे.
टीप २ : हरितगृह वायू हे वातावरणातील असे वायू आहेत, ज्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडून परावर्तित होऊन पुन्हा अवकाशात जाण्याऐवजी पृथ्वीच्या वातावरणातच अडकून रहातो. यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते, यालाच ‘हरितगृह परिणाम’ म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने कार्बन डायऑक्साइड (CO2), मिथेन (CH4), नायट्रस ऑक्साइड (N2O) आणि जलबाष्प (H2O) यांचा समावेश होतो. हरितगृह परिणामामुळे हवामानात पालट आणि जागतिक तापमानवाढ यांसारख्या समस्या निर्माण होतात.
३. पर्यावरणाच्या र्हासाच्या संदर्भात आध्यात्मिक संशोधनाचे अनुमान निराळे !
वर्ष २००६ मध्ये आमच्या संस्थेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पर्यावरणाचा र्हास’ या विषयावर केलेल्या आध्यात्मिक संशोधनावर आधारित अग्रणी लेख प्रकाशित केले होते. या लेखात अलीकडच्या इतिहासात कधीही न अनुभवलेले टोकाचे पर्यावरणातील पालट होण्याविषयी आगाऊ सूचना देण्यात आली होती. या संशोधनातून काढण्यात आलेले अनुमान आज प्रत्यक्षात आलेले दिसत आहे. आध्यात्मिक संशोधन हे नेहमीच्या वैज्ञानिक संशोधनापेक्षा अधिक सर्वसमावेशक असते. नेहमीच्या वैज्ञानिक दृष्टीकोनांच्या तुलनेत आध्यात्मिक संशोधन समग्र दृष्टीकोन देते, समस्यांचे केवळ शारीरिक आणि मानसिक परिमाणच नाही, तर अनेकदा दुर्लक्षित केलेल्या आध्यात्मिक परिमाणांनाही संबोधित करते. पर्यावरणाच्या र्हासाच्या संदर्भात झालेल्या मुख्य संशोधनांच्या अनुमानापेक्षा आम्ही केलेल्या आध्यात्मिक संशोधनाचे अनुमान निराळे आहे. हे अनुमान आपले प्रयत्न कोणत्या गोष्टींवर केंद्रित करायला हवेत, याविषयी अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक अर्थ प्रदान करणारे आहेत. यामधून आपल्याला पर्यावरणाचा र्हास आणि जागतिक तापमान वाढणे यांसारख्या समस्या न्यून करण्यासाठी प्रयत्न करण्याची योग्य दिशा मिळेल.
४. ‘प्राचीन भारतीय शास्त्रां’मधील संकल्पना प्रथम आपण ‘प्राचीन भारतीय शास्त्रां’मधील काही संकल्पनांची ओळख करून घेऊ.
४ अ. त्रिगुण म्हणजे काय ? : अध्यात्मशास्त्रानुसार सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण आहेत. स्थुलातील सूक्ष्मातीसूक्ष्म कणांपेक्षाही सूक्ष्मतम असे हे ३ गुण मूर्त आणि अमूर्त अशा सर्व घटकांत असतात. या ३ गुणांच्या प्रमाणानुसार कोणतीही वस्तू अथवा व्यक्ती यांमधून प्रक्षेपित होणारी आध्यात्मिक स्पंदने कशी आहेत, हे ठरते. प्रत्येक घटकात त्यांचे प्रमाण न्यूनाधिक असते. सत्त्वगुणाचे प्राबल्य अधिक असणारी व्यक्ती सात्त्विक आणि आध्यात्मिक ज्ञानाने संपन्न असते, रजोगुणाचे प्राबल्य असणारी व्यक्ती कृतीप्रवण, तर तमोगुणाचे प्राबल्य असणारी व्यक्ती असात्त्विक असते. एखादी वस्तू किंवा व्यक्ती यांच्यात ज्या गुणाचे प्राबल्य अधिक तशी स्पंदने प्रक्षेपित होतात.
४ आ. पंचमहाभूते : दुसरी संकल्पना ‘पंचमहाभूते’ ही आहे. प्राचीन भारतीय शास्त्रांमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचा उल्लेख ‘पंचमहाभूते’ म्हणून करण्यात आला आहे. पृथ्वीवरील कोणतीही व्यक्ती, वस्तू ही पंचमहाभूतांनी निर्माण झालेली आहे. हवामानात होणारे पालट आणि नैसर्गिक आपत्ती यांच्याशी पंचमहाभूतांचा संबंध आहे. त्यामुळे त्यांचा विचार करणे अत्यावश्यक आहे.
४ इ. कालचक्र : तिसरी संकल्पना ‘कालचक्र’ ही आहे. पृथ्वी लहान आणि मोठ्या अशा ज्या कालखंडांतून जाते, त्यांना ‘कालचक्रे’ असे म्हणतात, तर संस्कृतमध्ये त्यांना ‘युग’ असे म्हटले जाते.
४ ई. कालखंड : दिवसाचा कालखंड हा २४ घंट्यांचा असतो. त्याचे ‘दिवस’ आणि ‘रात्र’ असे २ भाग असतात. या दोन्ही कालावधींचे निराळे आध्यात्मिक गुणधर्म असतात. दिवसाची वेळ सात्त्विक असते, त्या तुलनेत रात्रीचा कालावधी असात्त्विक असतो. त्यामुळे लोक दिवसा आणि रात्री ज्या कृती करतात, त्या कालावधीतील आध्यात्मिक स्पंदनांचा त्यांच्यावर निश्चित परिणाम होतो.
५. कालचक्राशी संबंधित पालट
पृथ्वीवरही आध्यात्मिक स्वरूपाचे कालचक्राशी संबंधित (चक्रिय) पालट होत असतात. यात १०० ते १००० वर्षांचा कालखंड असलेली मोठी कालचक्रे आणि त्यांच्या अंतर्गत लहान लहान कालचक्रे असतात. जेव्हा हे कालचक्र वरच्या दिशेला असते, तेव्हा वातावरणात सत्त्वगुणाचे प्राबल्य आणि जेव्हा हेच कालचक्र खालच्या दिशेला असते, तेव्हा तमोगुणाचे प्राबल्य अधिक प्रमाणात असते. सध्या पृथ्वी एका लहान कालचक्राच्या खालच्या अवस्थेतून जात आहे. त्यामुळे वातावरणात तमोगुणाचे अधिक्य आहे. ही संक्रमण अवस्था आहे; परंतु हे संक्रमण होण्यापूर्वी आपल्या सर्वांवर वातावरणातील वाढलेल्या तमोगुणाचा परिणाम होणार आहे. हे लहान कालचक्र खालच्या दिशेने असल्याने, तसेच ते संपत आले असल्याने काही महत्त्वाच्या घटकांवर याचा विपरीत परिणाम होणार आहे.
६. पंचमहाभूतांचे असंतुलन आणि परिणाम !
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते पृथ्वीवरील पर्यावरण अन् हवामान यांचे संतुलन राखतात; मात्र वातावरणातील वाढती असात्त्विकता किंवा तमोगुण यांचा प्रथमतः नकारात्मक परिणाम पर्यावरण आणि हवामान यांच्यावर होतो. परिणामी ही पंचमहाभूते असंतुलित अन् वातावरणात तीव्र पालट होतात आणि नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढते, उदा. पृथ्वीतत्त्वाचे संतुलन बिघडल्यास भूकंप होतो, आपतत्त्वाचे संतुलन बिघडल्यास पूर येतो अथवा दुष्काळ पडतो.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. शॉन क्लार्क, फोंडा, गोवा.