साधकांनी सेवा करतांना प्रति १-२ घंट्यांनी (तासांनी) व्यष्टी साधनेचे प्रयत्न करणे आवश्यक !
‘सध्याच्या आपत्काळात वाईट शक्तींच्या त्रासांचे प्रमाण वाढत असल्याने बर्याच साधकांवर परत परत काळे आवरण (त्रासदायक शक्तीचे आवरण) येते. साधकांनी सलग सेवा किंवा वैयक्तिक कामे यांना प्राधान्य दिल्याने त्यांचे आध्यात्मिक उपाय आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न नीट होत नाहीत. याचा परिणाम म्हणून त्यांचे त्रास वाढतात, उदा. मनाची चिडचिड होणे, नकारात्मकता येणे, सेवा करतांना न सुचणे इत्यादी. हे टाळण्यासाठी साधकांनी शक्यतो प्रति १ – २ घंट्यांनी चालू असलेली सेवा किंवा वैयक्तिक कामे थांबवून पुढील प्रयत्न क्रमाने करावेत. २ – ३ मिनिटे आवरण काढणे, प्रार्थना करणे, अर्ध्या मिनिटासाठी एखादा भावप्रयोग करणे, एखादी स्वयंसूचना देणे.
अनेक साधकांनी वरीलप्रमाणे प्रयत्न केल्यावर त्यांना मनाने सकारात्मक आणि स्थिर रहाता येणे, त्यांच्या ईश्वरी अनुसंधानात वाढ होणे, त्यांना पुढील सेवेसाठी ऊर्जा मिळणे, यांसारखे लाभ झाले. सर्वच साधकांनी असे प्रयत्न करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली करण्याचा प्रयत्न करावे !’
– पू. संदीप आळशी (२.१२.२०२४)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |