महाराष्ट्र वारकर्यांच्या विचाराने पुढे जात राहील ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले !
आळंदी (जिल्हा पुणे) – महाराष्ट्र नेहमीच वारकरी विचाराने पुढे गेलेला आहे. तो भविष्यातही पुढे जाईल. या विचारांची आठवण सतत रहावी; म्हणून आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेण्यासाठी आळंदीत आलो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे आळंदीत टाळ-मृदुंगाच्या गजरात स्वागत करण्यात आले. या वेळी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी हातात टाळ घेऊन माऊलींचा गजर केला. देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे, राम शिंदे, आमदार अमित गोरखे आणि आमदार शंकर जगताप आदी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.
ते पुढे म्हणाले, ‘‘इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचे काम चालू आहे. हे एक दिवसाचे काम नाही. गावे, शहरे आणि उद्योग यांचे पाणी नदीत सोडले जाते. ते शुद्ध करून इंद्रायणीत सोडायचे आहे. ते काम चालू केले आहे. संबंधित गावे, ग्रामपंचायती, महानगरपालिका यांना निधी उपलब्ध करून देत आहोत. ते काम युद्ध पातळीवर चालू करू.’’