आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणारा नाथ संप्रदाय ! – मिलिंद चवंडके
नगर – भगवान विष्णूंच्या आदेशावरून नवनारायणांनी नवनाथ म्हणून अवतार धारण केले. नवनाथांचा हा नाथ संप्रदाय आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणारा आहे, असे प्रतिपादन नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार मिलिंद चवंडके यांनी केले. सिद्धी विनायक कॉलनीमधील श्रीगुरुपादुका मठात प्रथमच आयोजित केलेल्या प्रवचन सोहळ्यात ‘नाथांची दत्तभक्ती’ या विषयावर ते बोलत होते. श्रीगुरुपादुका मठाच्या वतीने औक्षण करत शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन मिलिंद चवंडके यांना सन्मानित करण्यात आले.
श्री. मिलिंद चवंडके पुढे म्हणाले की,
१. आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या वातावरणात प्रत्येक जण आनंदाचा शोध घेत आहे. नवनाथांचा नाथ संप्रदाय आपल्यास शाश्वत आनंदी जीवनाचा मार्ग दाखवतांना जीवन कृतार्थ कसे करता येते ? याचे गूज सांगतो.
२. नाथ संप्रदायातील गूढ तत्त्वज्ञानाचा बारकाईने अभ्यास करतांना नवनाथांनी कलियुगातील भाविकांच्या कल्याणासाठी घेतलेले अथक परिश्रम डोळ्यांसमोर उभे रहातात.
३. आपल्या देहाच्या साहाय्याने परमपदाची प्राप्ती करून घ्यायची असल्याने देहाचे उत्तम रक्षण करावे. उत्तम आरोग्य सांभाळावे. देह शुद्ध ठेवण्यासाठी शुद्ध शाकाहारी आणि निर्व्यसनी असावे. शुद्ध आचरण आणि चारित्र्य संपन्नता आपणास भगवंतापर्यंत घेऊन जातेच.
४. सद़्गुरु भेटले की, अध्यात्म मार्गावर चालण्याचा मार्ग प्रशस्त होत जातो. आपण परगावी जाण्याची जशी जय्यत सिद्धता करतो, तशी सिद्धता भगवंताकडे पोचण्यासाठी केली पाहिजे. भगवंताकडे जाण्याची सिद्धता करण्यासाठी गुरुभक्ती उपयुक्त ठरते.
५. गुरु आपल्या शिष्यास भगवंतास आवडेल, असेच वागण्याचा सल्ला देतांना या जन्माचे सार्थक कसे करायचे ? हे नेमकेपणाने सांगतात.
प्रवचन सोहळ्यास सर्वश्री शशिकांत भास्करे, समीर भास्करे, श्रद्धा भास्करे, संगीता सौदागर, शशीकुमार पंडित, विष्णु शिंदे, प्रवीण बासटवार, नायब तहसीलदार बालाजी कचरे, संजय उडगे, शंकर कुलथे, प्रथमेश घोडके, गोपाल खांडेकर यांच्यासह श्रीगुरुपादुका मठामधील भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
क्षणचित्रे
१. ‘नाथांची दत्तभक्ती’ या विषयावर प्रथमच प्रवचन ऐकायला मिळाले, असे श्रोत्यांनी आयोजक समीर भास्करे यांना विशेष भेटून सांगितले.
२. प्रवचनच्या वेळी मिलिंद चवंडके यांनी उच्चस्वरात केलेला नाथांच्या नावांचा गजर वातावरण मंत्रमुग्ध करून टाकणारा आणि उपस्थितांच्या अंगावर रोमांच आणणारा ठरला.