‘लाडकी बहीण योजने’ची प्रभावी कार्यवाही करा !
मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश
मुंबई – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील नव्या सुधारणेशी संबंधित जनहित याचिका निकाली काढतांना या योजनेच्या प्रभावी कार्यवाहीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. या वेळी योजनेतील सुधारणेविषयी प्रतिज्ञापत्रात सरकारच्या वतीने काहीच उल्लेख केला न गेल्याने न्यायालयाने संबंधित विभागाच्या उपसचिवांच्या कृतीवर ताशेरे ओढले.
ही योजना जून २०२४ मध्ये चालू करण्यात आली. त्यानंतर २ वेळा त्यात सुधारणा केली; परंतु नव्या सुधारणेमुळे योजनेसाठी पात्र महिलांना अर्ज भरतांना आणि तो ऑनलाईन अपलोड करतांना अनेक अडचणी येऊ शकतात. परिणामी योजनेचा लाभ घेण्यापासून महिला वंचित राहू शकतात, असे सूत्र ‘प्रमेय वेल्फेअर फाऊंडेशन’ने अधिवक्त्या सुमेधा राव यांच्या माध्यमातून केलेल्या जनहित याचिकेद्वारे उपस्थित केला होता. तसेच योजनेच्या प्रभावी कार्यवाहीचे आदेश राज्य सरकारला देण्याची मागणी केली होती.