भूतकाळातील कटू घटनांचा व्यक्तीच्या मनावरील प्रभाव न्यून करणारा मुंबईतील विख्यात मानसोपचारतज्ञ डॉ. मिनू रतन यांनी सांगितलेला एक अभिनव प्रयोग – ‘बटरफ्लाय रेमेडी’ !
१. व्यक्तीच्या जीवनातील त्रासदायक घटनांचा अभ्यास करून डॉ. मिनू रतन यांनी व्यक्तीचे समुपदेशन करणे
‘मुंबईतील मानसोपचारतज्ञ साधिका डॉ. मिनू रतन यांनी साधारण दोन वर्षांपूर्वी साधनेत विविध अडचणी असणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील काही साधकांचे समुपदेशन केले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला त्यांच्या काही सत्रांना जाण्याची संधी मिळाली. डॉ. मिनूदीदी समोरच्या व्यक्तीच्या जीवनात घडणार्या विविध गोष्टींचा अभ्यास करतात आणि ‘नेमक्या कोणत्या कारणामुळे त्या व्यक्तीच्या जीवनात अडचण असू शकते ?’, हे हेरून त्याप्रमाणे तिचे समुपदेशन करतात. या वेळी त्या ‘व्यक्तीच्या जीवनात भूतकाळात काही कटू घटना घडली आहे का ? तिच्या मनावर काही आघात झाले आहेत का ? व्यक्तीला कोणत्या गोष्टी अधिक त्रासदायक होत आहेत ?’, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करतात.
२. डॉ. मिनू रतन यांचे बोलणे ऐकल्यावर साधकाला त्याच्या बालपणीचा शाळेत जाण्याचा अप्रिय प्रसंग आठवणे
डॉ. मिनूदीदींच्या एक-दोन सत्रांनंतर माझ्या लक्षात आले की, साधारण प्रत्येक वर्षी जून मासाच्या पहिल्या सप्ताहात माझ्या मनावर अनावश्यक ताण येतो. याच्या मुळाशी गेल्यावर मला भूतकाळातील एक घटना लक्षात आली. उन्हाळ्याची सुटी संपून जून मासाच्या पहिल्या सप्ताहात शाळा चालू होतात. शाळेत जाण्याचा मला लहानपणापासूनच कंटाळा असल्याने ‘शाळा चालू होणार’, या विचाराने माझ्या मनावर ताण येत असे. गंमत म्हणजे मला शाळा सोडून जवळजवळ ३० वर्षे उलटून गेली, तरीही त्या संबंधित कालावधीत माझ्या मनावर ताण येत असे. ताण येण्याचे कारण शोधल्यावर लक्षात आले की, शाळेत प्रवेश घेण्यासाठी जात असतांना मोठ्या भावाच्या एका मित्राने मला ‘‘शाळेत शिक्षक मारतात बरे का !’’ असे सांगून माझ्या मनात भय उत्पन्न केले. प्रत्यक्षात शाळेत तसे काही झाले नाही; परंतु त्या वेळी निर्माण झालेले भय मनात घर करून राहिले आणि या गोष्टीची जाणीव व्हायला मला इतकी वर्षे जावी लागली.
डॉ. मिनूदीदींनी माझा हा प्रसंग अत्यंत शांतपणे समजून घेतला आणि माझ्याकडून एक अभिनव प्रयोग करून घेतला. हा प्रयोग केल्यानंतर माझा ताण न्यून झाला, तसेच भूतकाळातील अन्य कटू आठवणीही आपोआप पुसल्या गेल्या. साधकांनाही या प्रयोगाचा लाभ होईल, या अनुषंगाने माझा प्रयोगातील अनुभव आणि प्रयोग करतांना मला आलेली अनुभूती येथे देत आहे.
२ अ. डॉ. मिनूदीदी यांनी सांगितलेला प्रयोग – ‘बटरफ्लाय रेमेडी’ मानसोपचारतज्ञ डॉ. मिनूदीदी सांगत असलेल्या या प्रयोगाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.
२ अ १. टप्पा १ : आरंभी डोळे बंद करून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. ‘श्वास घेतला, सोडला, घेतला, सोडला…’ अशा प्रकारे साधारण २ मिनिटे करा.
२ अ २. टप्पा २ : यानंतर मन पूर्णतः श्वासावर एकाग्र करा. (हे करत असतांना डॉ. मिनूदीदी १ ते १० अंक मोजतात.)
२ अ ३. टप्पा ३ : आता आपल्या समोरच्या एका मोठ्या पडद्यावर चलत्चित्राप्रमाणे आपल्या जीवनातील प्रसंग पहायचा आहे. प्रसंग निवडतांना ‘जो सर्वांत कठीण आणि त्रासदायक प्रसंग आहे’, तो आठवून जसा घडला, तसा त्या पडद्यावर पहायचा आहे.
२ अ ४. टप्पा ४ : हा प्रसंग पहात असतांना ‘काय अनुभवायला येते’, ते पहात रहा.
२ अ ५. टप्पा ५ : आपली दृष्टी समोरच्या पडद्यावर स्थिर ठेवून आपण ‘आपला आत्मा हा आनंदस्वरूप आहे. तो कोणत्याही ताणापासून मुक्त आहे, निर्भय आहे’, हे लक्षात घेऊन त्याला (आत्म्याला) लहान बाळाला घेतो, त्याप्रमाणे आपल्या कडेवर घ्यायचे आहे. (या वेळी आपण आपला उजवा तळहात डाव्या खांद्यावर आणि डावा तळहात उजव्या खांद्यावर, अशी रचना करावी अन् प्रत्यक्ष थोपटतांना तळव्यांनी खांद्यांवर थोपटावे.) यानंतर त्या आत्म्याला थोपटत आपण पडद्याकडे पहायचे आहे. या वेळी ‘पडद्यावर दिसणार्या दृश्याचे काय होते ?’, हे पहायचे आहे.
हा प्रयोग वरील ५ टप्प्यांत केल्यानंतर ‘मनाला काय जाणवते’, हे लिहून काढू शकतो.
२ आ. ‘स्वतः एक लहान बाळ असून परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या कडेवर घेतले आहे’, असा भाव ठेवून साधकाने प्रयोग केल्यावर त्याच्या मनावरील ताण जाऊन मन निर्भय होणे
प्रयोगाचे पहिले दोन टप्पेे झाल्यावर मी पडद्यावर माझ्या शाळेचा पहिला दिवस पाहिला. तो पहात असतांना माझ्या मनावर प्रचंड ताण निर्माण झाला. ‘मनाची घुसमट होऊन श्वास कोंडला जात आहे’, असे मला अनुभवायला आले. त्या वेळी ‘मी एक लहान बाळ आहे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी मला त्यांच्या कडेवर घेतले आहे’, असा मी भाव ठेवला. मी ते दृश्य पाहून भेदरलो होतो आणि परात्पर गुरु डॉक्टर मला थोपटत ‘काळजी करू नकोस. मी आहे’, असे सांगून मला आश्वस्त करत होते. ‘एक बाळ आईच्या कुशीत जसे पूर्णतः सुरक्षित आणि निर्भय असते’, तसे त्या वेळी मला वाटू लागले अन् माझ्या मनावरील दडपण हळूहळू न्यून होऊ लागले.
त्या वेळी माझे लक्ष समोरील पडद्याकडे होते आणि काय आश्चर्य ! जसजसे परात्पर गुरु डॉक्टर मला थोपटत होते, तसतसा पडद्यावर मला दिसणारा शाळेतील पहिला दिवस हळूहळू धूसर झाला आणि थोड्या वेळाने पूर्णतः लुप्त झाला. त्यानंतर माझ्या मनावरील ताण पूर्णतः निघून गेला आणि माझे मन निर्भय झाले. मला शारीरिक स्तरावर थोडे दमल्यासारखे वाटत होते. माझे डोके थोडे जड झाले होते; परंतु मन मात्र हलके झाले होते.
या प्रयोगामुळे ‘भूतकाळातील बर्याच कटू घटनांचा माझ्या मनावरचा प्रभाव न्यून झाला आहे’, असे माझ्या लक्षात आले.’
– श्री. योगेश जलतारे (वय ४८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१.२०२४)