श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके आणि भारत-श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय संबंध
श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी नवी देहली येथे झालेल्या एका गुंतवणूक परिषदेत सहभाग घेतला आणि बोधगयेला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीत दिसानायके यांनी श्रीलंकेवर आलेल्या आर्थिक संकटाच्या काळात केलेल्या साहाय्याविषयी भारताचे आभार मानले. दिसानायके यांनी त्यांच्या पहिल्या परराष्ट्र दौर्यासाठी भारताची निवड करून श्रीलंकेच्या या पुढील वाटचालीविषयी होणार्या चर्चांना विराम दिला आहे. दिसानायके यांच्या विजयानंतर १५ दिवसांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी श्रीलंकेला भेट दिली होती. ‘श्रीलंकेचा भूभाग भारताच्या विरोधात वापरण्यास अनुमती दिली जाणार नाही’, असे आश्वासन श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. भारत आणि श्रीलंका यांनी त्यांच्या भागीदारीचा विस्तार करण्यासाठी एक दूरदर्शी दृष्टीकोन स्वीकारत संरक्षण सहकार्य कराराला अंतिम रूप देण्याचा निर्णय घेतला, तसेच ‘पॉवर ग्रिड कनेक्टिव्हिटी’ (उत्पादित वीज ग्राहकांपर्यंत वितरणासाठी पोचवणारे जाळे) आणि बहुउत्पादन पेट्रोलियम पाईपलाईन निर्माण करून ऊर्जा संबंध मजबूत करण्याचा संकल्पही केला.
१. श्रीलंकेची आतापर्यंतची वाटचाल आणि अनुरा कुमारा दिसानायके यांच्याविषयी…
दिसानायके यांच्या ‘नॅशनल पीपल्स पॉवर’ या आघाडीतील सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या ‘जनता विमुक्ती पेरामुना’, म्हणजेच ‘पीपल्स लिबरेशन फ्रंट’ला भारत विरोधाचा अनेक दशकांचा इतिहास आहे. वर्ष १९३५ मध्ये श्रीलंकेत साम्यवादी चळवळीला प्रारंभ झाला. ‘श्रीलंका समाज पक्ष’ साम्यवादी चळवळीचा पुरस्कार करत होती. वर्ष १९४३ मध्ये त्यात फूट पडून ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ श्रीलंका’ स्थापन झाली. कालांतराने त्यात ‘सोव्हिएत रशियावादी’ आणि ‘चीनवादी’ असे २ गट पडले. चीनवादी पक्ष नामशेष झाला. रशियावादी कम्युनिस्ट पक्ष आणि समाज पक्ष कालांतराने सरकारमध्ये सामील झाले. श्रीलंकेला वर्ष १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. वर्ष १९७१ मध्ये श्रीलंका हे प्रजासत्ताक झाले.
वर्ष १९७८ मध्ये ‘जनता विमुक्ता पेरामुना’ एक राजकीय पक्ष म्हणून श्रीलंकेच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाला. श्रीलंकेचे अध्यक्ष दिसानायके तेव्हा कार्यकर्ता म्हणून ‘जनता विमुक्ती पेरामुना’शी जोडले गेले होते. या कालावधीत ते भूमीगत झाले होते. त्या वेळी पक्षाला चीन सरकारकडून साहाय्य मिळत होते. वर्ष १९९० च्या दशकामध्ये पक्षाने पुन्हा एकदा निवडणुकांच्या राजकारणात सहभाग घेतला. दिसानायके वर्ष २००० च्या निवडणुकांमध्ये श्रीलंकेच्या संसदेत पोचले. वर्ष २००४ च्या निवडणुकीत पक्षाला ३९ जागा मिळाल्या असता दिसानायके यांनी कृषी आणि अन्य मंत्रिपदे भूषवली.
२. अंतर्गत युद्ध, कोरोना महामारी आणि चुकीचे निर्णय यांमुळे श्रीलंकेची झालेली आर्थिक दुःस्थिती
अंतर्गत युद्धानंतर पुनर्बांधणीसाठी श्रीलंकेला मोठ्या प्रमाणावर साहाय्याची आवश्यकता होती. भारत सरकारला द्रमुकचा पाठिंबा असल्याने त्यांनी श्रीलंकेच्या साहाय्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले, तेव्हा चीन श्रीलंकेच्या साहाय्याला धावून आला. राजपक्षेंना विकासाची स्वप्ने दाखवून विविध विकास प्रकल्पांसाठी चीनने महागड्या व्याजाचे कर्ज दिले. आज श्रीलंकेच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा ५५ अब्ज डॉलर्स झाला असून ते फेडण्याची श्रीलंकेची क्षमता नाही. चीनने कर्जाच्या मोबदल्यात सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी बंदर आणि विशेष आर्थिक क्षेत्राच्या जागेचा ताबा घेतला. श्रीलंकेच्या बंदरांमध्ये चीनच्या युद्धनौका, तसेच पाणबुड्या वरचेवर भेट देऊ लागल्या. यामुळे श्रीलंकेत ‘भारत विरुद्ध चीन’, असे युद्ध चालू झाले. श्रीलंकेच्या अंतर्गत राजकारणामुळे तेथे इस्लामी मूलतत्त्ववादही मोठ्या प्रमाणावर पसरला. वर्ष २०१९ मध्ये अध्यक्ष झालेल्या गोताबया राजपक्षेंच्या चुकीच्या निर्णयांमुळे श्रीलंकेवरील कर्ज वाढतच गेले.
‘कोविड १९’ महामारीमुळे प्रभावित झालेले पर्यटन, देशाबाहेरील नागरिकांकडून होणार्या परताव्यांमध्ये झालेली घट, अचानक रासायनिक शेती बंद करून सेंद्रिय शेती करण्याचा घेतलेला निर्णय आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे महागलेले खनिज तेल अन् अन्नधान्याच्या वाढत्या किमती यांमुळे वर्ष २०२२ मध्ये श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोचली. महागाईचा भडका उडाल्याने लोकांनी थेट अध्यक्षीय प्रासादावर आक्रमण केले. अध्यक्ष गोताबया राजपक्षे त्यांच्या कुटुंबियांसह देश सोडून पळून गेले असता, त्यांचे प्रतिस्पर्धी रनिल विक्रमसिंघे अध्यक्ष झाले. त्या वेळी भारताने श्रीलंकेची ढासळती परिस्थिती सावरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विक्रमसिंघेंना श्रीलंकेला आर्थिक शिस्त लावण्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागल्याने वर्ष २०२४ च्या निवडणुकांमध्ये त्यांना मोठा फटका बसला. यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिसानायके आणि त्यानंतर संसदेच्या निवडणुकीत ‘नॅशनल पीपल्स पॉवर’ आघाडीचा विजय झाला.
३. दिसानायके यांच्याविषयीच्या अपेक्षा
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष दिसानायके यांच्या पक्षाचा भारतविरोध आणि चीनसमवेतचे संबंध सर्वश्रुत असले, तरी दिसानायके यांना श्रीलंकेची नाजूक परिस्थिती, चीनची ढासळती अर्थव्यवस्था आणि भारताची स्वतःच्या सुरक्षेविषयीची संवेदनशीलता यांची जाणीव असल्याने ते भारत आणि चीन यांच्यामध्ये समतोल राखत काम करतील, अशी अपेक्षा आहे. भारत आणि श्रीलंका यांचे सुरक्षा हित एकमेकांशी निगडित आहे. ‘सुरक्षा सहकार्य करारा’ला त्वरित अंतिम स्वरूप देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी आणि दिसानायके यांच्या भेटीत झाला. हिंद महासागरात सहकार्य करण्याविषयी झालेला निर्णयही धोरणात्मक आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष दिसानायके यांच्या भेटीनंतर मोदी म्हणाले, ‘कोलंबो सुरक्षा परिषद हे प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि विकास यांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या अंतर्गत सागरी सुरक्षा, आतंकवादाचा बीमोड, सायबर सुरक्षा, तस्करी आणि संघटित गुन्हेगारी यांच्या विरोधात लढा, मानवतावादी साहाय्य अन् आपत्ती निवारण यांमध्ये श्रीलंकेला साहाय्य पुरवले जाईल.
४. भारत आणि श्रीलंका संबंध सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे !
भारत आणि श्रीलंका संबंधांचे मूळ संस्कृतीमध्ये आहे. जेव्हा भारताने पाली भाषेला ‘अभिजात भाषे’चा (समृद्ध भाषा) दर्जा दिला, तेव्हा श्रीलंकेत त्याचा आनंद साजरा झाला. नागापट्टीणम-कनकेसंथुराई यांच्यातील फेरी सेवा आणि चेन्नई-जाफना हवाई संपर्क यांमुळे पर्यटनाला चालना मिळण्यासह सांस्कृतिक संबंधही मजबूत झाले आहेत. आता रामेश्वरम् आणि तलाईमन्नार यांच्यात फेरी सेवा, तसेच बौद्ध सर्किट आणि श्रीलंकेच्या रामायण ट्रेलच्या माध्यमातून पर्यटनातील क्षमता साकारण्यासाठी काम चालू केले जाणार आहे.
मच्छीमार हे एकमेकांच्या समुद्री क्षेत्रात घुसखोरी करत असल्याचा आरोप दोन्ही देश करतात आणि मच्छीमारांना पकडतात. दोन्ही देशांच्या भांडणात सागरी संसाधनांचा नाश होत आहे. श्रीलंकेच्या बंदरांमध्ये चिनी जहाजे ‘डॉकिंग’ (गोदी) करत आहेत. हा भारतीय सुरक्षेला धोका आहे. त्यामुळे दूरदृष्टीकोनातूनच भारत आणि श्रीलंका यांना द्विपक्षीय संबंध दृढ करावे लागणार आहेत.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.