‘त्रावणकोर देवस्वम् बोर्डा’च्या उधळपट्टीला केरळ उच्च न्यायालयाचा लगाम !
१. केरळमधील ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्डा’कडून सरकारचे अभिनंदन करणारे फलक सार्वजनिक ठिकाणी लावण्याचा प्रकार
‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असा खोटा प्रचार करणारे हिंदु मंदिराच्या अर्पणातून मात्र स्वतःची प्रसिद्धी मिळवतात. ‘केरळमधील ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्डा’ने तेथील सरकार, मुख्यमंत्री, आमदार आणि बोर्डाचे अध्यक्ष यांचे अभिनंदन करणारे फलक मंदिर परिसरात अन् सार्वजनिक ठिकाणी लावले होते. अर्थात् हा बडेजाव भक्तांनी केेलेल्या पैशातूनच केला होता. भारतभरात हिंदूंच्या पैशातून मंदिरात मिळालेले अर्पण सरकार नियंत्रित पदाधिकारी त्यांच्या स्वार्थासाठी वापरतात. प्रवास भत्ते, सप्ततारांकित हॉटेलमध्ये बैठका आयोजित करणे, राज्याबाहेर बैठका घेतल्याचे दाखवून गाडीचे भाडे आणि चालकाचा व्यय घेतला जातो, हे सर्वश्रुत आहे. त्यातीलच एक प्रकार येथे घडला होता.
२. केरळ उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय पिठाकडून ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्डा’च्या कृत्याविषयी स्वतःहून नोंद
केरळमध्ये अलपुल्ला जिल्ह्यातील चिरथाला जवळील थुरावूर महाक्षेत्रम् मंदिर क्षेत्रामध्ये उत्सव होता. मंदिर व्यवस्थापनाने केरळ राज्याचे साम्यवादी मुख्यमंत्री, राज्याचे देवस्वम् मंत्री व्ही.एन्.वासवन, ‘त्रावणकोर देवस्वम बोर्डा’चे अध्यक्ष आणि स्थानिक आमदार यांच्या छायाचित्रांचे फलक तीर्थयात्रेच्या परिसरात लावले. त्याची केरळ उच्च न्यायालयाने स्वतःहून नोंद घेतली. (‘स्यु मोटो’ याचिका स्वतःहून प्रविष्ट केली.) त्यानंतर न्यायालयाने ‘स्वतःला मंदिराचे मालक समजू नका. भाविक मंदिरात मुख्यमंत्री, आमदार आणि मंदिर समितीचे अध्यक्ष यांचे चेहरे पहायला येत नाहीत. त्यांची त्यांच्या देवतेप्रती श्रद्धा असल्यामुळे ते मंदिरात दर्शनाला येतात. भाविकांच्या पैशातून स्वतःची प्रसिद्धी मिळवू नका’, अशा शब्दांत ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्डा’च्या मंदिर विश्वस्ताला फटकारले.
‘शबरीमला यात्रेच्या वेळी थुरावूर मंदिरात थांबा घेतला जातो. त्यामुळे तीर्थयात्रेच्या काळात भाविकांना सुविधा पुरवण्याचे दायित्व राज्य सरकार आणि ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्ड’ यांचे आहे; परंतु भाविकांच्या पैशातून मिळालेल्या अर्पणातून मंदिर सल्लागार समिती फ्लेक्स फलक लावणे, विश्वस्तांची छायाचित्रे लावणे इत्यादी कामे करतात. असा प्रकार न्यायालय खपवून घेणार नाही’, असेही उच्च न्यायालयाने सांगितले.
३. हिंदूंनी मंदिरांत केलेल्या अर्पणाचा लाभ अल्पसंख्यांकांना !
श्रद्धाळू हिंदू मंदिरात अर्पण करतात; परंतु त्या पैशाचा विनियोग कसा होतो, याकडे ते लक्ष देत नाहीत. त्यामुळे गेली अनेक दशके हिंदूंच्या अर्पणातून धर्मांध आणि ख्रिस्ती यांना साहाय्य केले जाते. उदाहरणार्थ मुंबईस्थित सिद्धिविनायक मंदिरातून मिळणार्या साहाय्यामध्ये अन्य पंथियांचा वाटा मोठ्या प्रमाणात असतो. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अनेक याचिका झाल्या आहेत. अशा स्थितीत थुरावूर मंदिराच्या प्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने स्वतःहून नोंद घेतली, हे हिंदूंसाठी दिलासादायक आहे. याचा अर्थ हिंदु भाविकांनी निद्रिस्त रहायचे, असा होत नाही. त्यामुळे त्यांनी धर्मकार्यात सजग राहून सरकारच्या नियंत्रणात असलेल्या मंदिर समितीला धारेवर धरले पाहिजे.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (२०.१२.२०२४)