राष्ट्र-धर्माचे अविरत रक्षण करणारे श्री गुरु गोविंदसिंह !
उद्या, ५ जानेवारी या दिवशी गुरु गोविंदसिंह जयंती (नानकशाही) आहे. त्या निमित्ताने…
‘विक्रम संवत् १७२३ पौष शुक्ल सप्तमीच्या रात्री (२२.१२.१६६६) दीड प्रहर बाकी असतांना प्रसिद्ध प्राचीन नगर पाटलीपुत्र वर्तमानकाळात पाटणा (पाटलीपुत्र, बिहार) शहरामध्ये माता गुजरीच्या पोटी एका पुत्राचा जन्म झाला. त्याचे नाव ‘गोविंद’ असे ठेवण्यात आले. हा बालक गोविंदराय, गोविंददास या नावानेही ओळखला जाऊ लागला होता. जो नंतर महान संत योद्धा गुरु गोविंदसिंहच्या रूपाने प्रसिद्ध झाला. पिता गुरु तेगबहादूर यांनी गोविंद यांच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली होती. काश्मिरी पंडित कृपारामजी यांनी गोविंद यांना संस्कृत आणि गुरुमुखी लिपीत लिखाण अन् इतिहास इत्यादी विषयांचे ज्ञान दिले, तर काजी पीर महंमद यांनी त्यांना फारसी भाषा शिकवली. त्यासह तलवार, बंदूक आणि अन्य शस्त्र चालवण्यात तरबेज केले. त्याला घोडेस्वारीचे शिक्षणही विशेष रूपाने देण्यात आले होते. गोविंद हा एक उत्तम चित्रकारही होता. त्याचे हस्ताक्षर अत्यंत सुंदर होते. वाद्यांचे वादन करण्यात तो अत्यंत कुशल होता.
१. गुरु तेगबहादूर यांना गुरु गोविंदसिंह यांनी दिलेले निर्भिड उत्तर आणि गुरुपदी विराजमान
गोविंदला देश आणि धर्म या विषयांची थोडीशी प्रेरणा मिळाली असतांनाच त्याच्या पित्यावर धर्मरक्षणार्थ बलीदान देण्याची वेळ येऊन ठेपली होती. काश्मीरच्या इस्लामी शासकांच्या अत्याचारांनी त्रस्त काश्मिरी पंडितांचे शिष्टमंडळ पंडित कृपाराम दत्त यांच्या नेतृत्वाखाली काश्मिरी लोक आनंदपूरमध्ये गुरु तेगबहादूर यांच्या आश्रयाला गेले. औरंगजेब सातत्याने हिंदूंचे धर्मांतर करत होता. दुसर्या बाजूला हिंदूंमध्ये दुर्बलता आणि मतभेद उंचावले होते. एकता आणि राष्ट्रीयता यांचे बळ क्षीण झाले होते. गुरु तेगबहादूर ही परिस्थिती जाणून होते. ते काश्मिरी पंडितांना म्हटले, ‘जोपर्यंत कुणी महापुरुष पुढे येऊन अत्याचाराच्या विरुद्ध उभा रहात नाही, तोपर्यंत देश आणि धर्म यांचे रक्षण होणे अशक्य आहे.’ सभेमध्ये शांतता पसरली. त्याच वेळी बालक गोविंदने साहसाने पित्याला म्हटले, ‘पिताजी हे सर्व ब्राह्मण तुमच्या आश्रयाला आले आहेत; म्हणून आपल्यापेक्षा दुसरा कुणी यांना धीर देणारा असू शकतो का ?’ पुत्राचे निर्भीड वचन ऐकून पित्याने पुत्राला आपल्या मांडीवर बसवून विचारले, ‘पुत्रा, जर मी यांच्या रक्षणासाठी माझे प्राणार्पण करून परलोकी निघून गेलो, तर तुझे, गुरुनानकांच्या या गुरुपरंपरेचे रक्षण कोण करणार ? शिखांचे नेतृत्व कोण करणार ? तू तर अजून बालक आहेस.’
यावर गुरु गोविंदसिंह यांचे उत्तर होते, ‘जेव्हा मी मातेच्या गर्भात ९ मास होतो. तेव्हा अकाल पूर्वजांनी आपले रक्षण केले, तर आता मी ९ वर्षांचा झाल्यावर ते माझे रक्षण करणार नाहीत का ?’ पुत्राचे हे ओजस्वी शब्द ऐकून गुरुजींना विश्वास वाटला की, माझा पुत्र गोविंदराय आगामी दायित्व निश्चितपणे पूर्ण करील. गुरु तेगबहादूरजींनी पुत्राला गुरुपदावर विराजमान करून भारताच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी स्वतःचे बलीदान करण्यासाठी प्रस्थान केले. देहलीमध्ये पित्याच्या महान बलिदानानंतर गुरु गोविंदसिंहांनी आता शीख पंथासाठी प्राण ओवाळून टाकण्याच्या परंपरेकडे वळवण्याचा निश्चय करत प्रतिज्ञा केली.
२. गुरु गोविंदसिंह यांनी सरहिंदच्या नवाबाच्या आदेशावर दिलेले सडेतोड उत्तर
पुढे गुरु गोविंदसिंह यांच्या रौद्र रूपाने चिंतित औरंगजेबाने सरहिंदच्या नवाबाला गुरुजींचा बीमोड करण्याची आज्ञा दिली. गुरुजींवर या आदेशाचा कोणताच प्रभाव पडला नाही. त्यामुळे फेब्रुवारी १६९५ ला दुसरा आदेश काढण्यात आला, ‘कुणीही हिंदु डोक्यावर शेंडी ठेवणार नाही, डोक्याला पगडी बांधणार नाही, शस्त्र धारण करू शकणार नाही. कुणीही हिंदु पालखी, हत्ती आणि घोडे यांवर बसणार नाही.’ गुरुजींनी या अपमानजनक आदेशांना आव्हान दिले आणि स्वतः आदेश दिला, ‘माझा शीख संपूर्ण केशधारी राहील, शीख केसांचा कधीही अनादर करणार नाही. माझा शीख शस्त्रधारी असेल. हत्ती, घोडे आणि पालखी यांवर स्वार होईल.’ गुरुजींनी युद्धाची सिद्धता आरंभली.
३. गुरु गोविंदसिंह यांनी मोगल सैन्यावर मिळवलेला विजय
वर्ष १६९९ च्या बैसाखी पर्वाच्या दिवशी एका महान समारंभात गुरु गोविंदसिंह सिंहगर्जना करत म्हणाले, ‘आज देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी मला शस्त्रांची नाही, तर शीख शूरविरांची आवश्यकता आहे.’ औरंगजेबाने गुरु गोविंदसिंह यांना नष्ट करण्यासाठी वर्ष १६९९ मध्ये देहलीच्या सुभेदाराला आनंदपूरवर आक्रमण करण्यासाठी पाठवले. वर्ष १७०० मध्ये मोगलांनी आनंदपूरवर आक्रमण केले. गुरुजींच्या नेतृत्वामुळे शिखांचा विजय झाला. वर्ष १७०३ मध्ये पुन्हा मोगल सेनेने गुरुजींवर आक्रमण केले. पुढे औरंगजेबाने गुरुजींना पत्र पाठवून देहलीला बोलावले. या धमकीच्या पत्राला गुरुजींनी सडेतोड शब्दांमध्ये उत्तर दिले, ‘तुमचे अत्याचार शिगेला पोचले आहेत. जो हिंदूंशी धर्मांधतेमुळे द्वेषपूर्ण व्यवहार करतो, त्याच्याशी माझी मैत्री कशी होऊ शकेल ?’ पुढे गुरुजी चमकौर नामक गावाच्या हवेलीत पोचले. मोगलांनी गुरुजींचा विश्वासघात केला आणि ७०० सैनिकांनी चमकौर गढीला घेरले. सरहिंदवरून तोफा आणल्या गेल्या. त्या वेळी गढीमध्ये केवळ ४० शीख सिंहगर्जना करत होते. गुरुजी गढीच्या छतावरून बाणांचा वर्षाव करत होते. पंच प्यारेंपैकी २ भाऊ मोहकमसिंह आणि हिंमतसिंह शत्रूशी युद्ध करतांना वीरगतीला प्राप्त झाले. त्यानंतर गुरुजींचा ज्येष्ठ पुत्र अजितसिंहने रणांगणात जाऊन शत्रूला युद्धकौशल्य दाखवत तो वीरगतीला गेला; मात्र गुरुजी येथून सुरक्षितरित्या बाहेर पडले.
४. गुरु गोविंदसिंह यांच्या दोन्ही मुलांचे धर्मासाठी बलीदान
गुरु गोविंदसिंह यांनी त्यांचा जुना आचारी गंगारामवर विश्वास ठेवून माता गुजरी आणि २ पुत्र जोरावर अन् फतेहसिंह यांना त्याच्याकडे थांबवले होते. फितूर गंगारामने ही सूचना मोगल ठाणेदाराला दिली. माता गुजरो आणि मुले यांना सरहिंद येथे पाठवण्यात आले. तेथे त्यांच्यासमोर २ पर्याय ठेवण्यात आले, ‘मुलांनो, एक तर इस्लामचा स्वीकार करा आणि सुख अन् ऐश्वर्यशाली जीवन व्यतित करा. नाही तर मृत्यूला सामोरे जाण्यास सिद्ध व्हा.’ मुलांनी दृढतापूर्वक उत्तर दिले, ‘आम्ही इस्लाम स्वीकारणार नाही.’ दोन्ही गुरुपुत्रांचे निर्भिड उत्तर ऐकून सुभेदाराने मुलांना मृत्यूदंड देण्याचा आदेश दिला. २७.१२.१७०४ या दिवशी मुलांना भिंतींमध्ये जिवंत चिणण्यात (गाडण्यात) आले.
५. गुरु गोविंदसिंह यांच्यावर २ पठाणांनी केलेले आक्रमण आणि त्यांचा अंतिम क्षण
पुढे गुरु गोविंदसिंह यांना ठार मारण्यासाठी वजीरखानाने २ पठाणांना पाठवले. एके दिवशी तंबूमध्ये विश्रांती घेणार्या गुरुजींवर पठाणाने तलवारीने वार केले. गुरुजींना गंभीर जखम झाली, तरीही गुरुजींनी त्वरित त्याच तलवारीने पठाणाची मान कापली; परंतु गुरुजींना घाव फार वर्मी बसल्यामुळे त्यांची प्रकृती खालावू लागली होती. स्वतःचा अंतसमय निकट आल्याचे जाणून गुरुजींनी आदेश दिला, ‘आता आदिग्रंथच गुरुस्थानावर विराजमान होईल आणि तो ‘गुरुग्रंथ साहिब’ असा संबोधला जाईल.’ नंतर त्यांनी एका कनातीच्या मागे चिता रचली. गुरु गोविंदसिंह यांनी स्नान केले, प्रार्थना करून नित्याची वेशभूषा परिधान करून शस्त्र धारण केले आणि त्यांनी चिताग्नीत स्वतःला समर्पित केले.’
– डॉ. श्रीलाल, संपादक
(साभार : मासिक ‘गीता स्वाध्याय’)