परात्पर गुरु डॉक्टर जे सांगतात, ते सगळे योग्यच असल्याने ते बुद्धीच्या स्तरावर नाही, तर भावाच्या स्तरावर ऐकायला हवे ! – पू. (श्रीमती) सुमन नाईक
आज पौष शुक्ल पंचमी (४.१.२०२५) या दिवशी फोंडा गोवा येथील सनातनच्या ६२ व्या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक यांचा आज ७६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
पू. (श्रीमती) सुमन नाईक यांना ७६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. साधक : ‘परात्पर गुरु डॉक्टर जी सूत्रे सांगतात, ती मला बुद्धीच्या स्तरावर समजतात; पण बर्याच वेळा असे वाटते की, त्या सूत्रांचा काही वेगळा भावार्थही असेल ! असे काही असते का ? ते कसे ओळखायचे ?
पू. (श्रीमती) सुमन नाईक : परात्पर गुरु डॉक्टर जे सांगतात, ते बुद्धीच्या स्तरावर नाही, तर भावाच्या स्तरावर ऐकायचे. तुम्ही सूत्रे ऐकतांना बुद्धीचा वापर कशाला करता ? आवश्यक आहे, तेथेच बुद्धीचा वापर करायचा. अध्यात्मात बुद्धी पाहिजे; पण ती प्रत्येक ठिकाणी नको. परात्पर गुरु डॉक्टर सांगतात, त्या सूत्रांचा विचार करायला बुद्धी कशाला पाहिजे ? ते सांगतात, ते सगळे योग्यच असते. त्यामुळे ‘हे बरोबर कि चूक’, असा बुद्धीने विचार करायला नको.
२. साधकांना बुद्धीने प्रश्न पडू लागल्यास त्यांनी गुरुचरणी प्रार्थना करून देवाला पुनःपुन्हा शरण जावे !
पू. (श्रीमती) सुमन नाईक : जेव्हा बुद्धीने प्रश्न पडतो, तेव्हा देवाला शरण जायचे आणि ‘देवा, प्रत्येक ठिकाणी ही बुद्धी आड येते. आवश्यक त्या ठिकाणीच तिचा वापर केला जाऊ दे’, अशी गुरुचरणी प्रार्थना करायची. प्रत्येक गोष्टीत देवाला शरण जायचे. पुनःपुन्हा शरण गेले की, देवच योग्य ते सुचवतो. नंतर आपोआप सुचत जाते. तेथे बुद्धीचा अडथळा येत नाही.
३. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगण्यासाठी नव्हे, तर स्वतःच्या प्रगतीसाठी साधकांनी साधनेचे सर्व प्रयत्न भावपूर्ण रीतीने केले पाहिजेत !
पू. (श्रीमती) सुमन नाईक : एका साधिकेने सांगितले की, घरी गेल्यावर मला काही सुचत नाही. माझ्याकडून स्वयंसूचनांची सत्रेही होत नाहीत. घरी गेल्यावर सर्व विसरून का जाते ? कुणी आपल्या व्यष्टी साधनेचा आढावा घेवो अथवा न घेवो, आपण आपली साधना तळमळीने वाढवली पाहिजे. साधक आढाव्याच्या भीतीपोटी किंवा आढाव्यात सांगता यावीत; म्हणून सत्रे करतात आणि ‘७ सूचनासत्रे झाली किंवा १२ झाली’, असे सांगतात. खरेतर सूचनासत्रे भावपूर्ण रीतीने करायला पाहिजेत. कुणी व्यष्टी साधनेचा आढावा घेतला नाही, तरीसुद्धा प्रत्येक गोष्टच भावपूर्ण रीतीने करायला पाहिजे.’