समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या विरुद्धचा गुन्हा रहित होणार नाही !
|
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – २४ नोव्हेंबरला संभलच्या शाही जामा मशिदीत सर्वेक्षणाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बर्क हे मुख्य आरोपी आहेत. त्यांच्या विरुद्ध नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याच्या विरुद्ध त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने गुन्हा रहित करणारी मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. ‘या प्रकरणी गुन्हा रहित होणार नसून पोलीस तपास चालूच रहाणार आहे’ए असे न्यायालयाने म्हटले आहे. असे असले, तरी सध्या खासदार बर्क यांना अटक करू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
उच्च न्यायालयाने म्हटले की, ज्या कलमांच्या अंतर्गत खासदार बर्क यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे, त्यामध्ये ७ वर्षांपेक्षा अल्प शिक्षा आहे. पोलीस त्यांना नोटीस जारी करू शकतात आणि त्यांना चौकशीसाठी बोलावू शकतात. त्यांनी पोलीस तपासात सहकार्य करावे, असा आदेशही न्यायालयाने दिला. तसेच त्यांनी पोलीस तपासात सहकार्य केले नाही, तर त्यांना अटक केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले.