California Plane Crash : कॅलिफोर्निया (अमेरिका) : खासगी विमान कोसळून २ ठार
१० दिवसांत तिसरा विमान अपघात !
वॉशिंग्टन (अमेरिका) – कॅलिफोर्निया येथे भारतीय वेळेनुसार २ जानेवारीच्या रात्री उशिरा एक छोटे विमान इमारतीच्या छताला धडकले आणि कोसळले. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला असून १८ जण घायाळ झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, १० जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, तर ८ जणांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले आहेत. याखेरीज अपघातात ठार झालेले विमानातील प्रवासी आहेत कि तेथे रहाणारे नागरिक, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जागतिक स्तरावर पाहिल्यास गेल्या १० दिवसांतील हा तिसरा विमान अपघात आहे. यापूर्वी २५ डिसेंबरला अजरबैझानहून रशियाला जाणारे विमान कझाकिस्तानमध्ये कोसळले होते. या अपघातात ३८ जणांचा मृत्यू झाला होता. २९ डिसेंबरला दक्षिण कोरियाच्या विमानतळावर कोसळलेल्या विमानातील १८१ जणांपैकी १७९ जणांचा मृत्यू झाला होता.