राज्यात वेगवेगळ्या धाडींमध्ये ९ लाख २० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
एक नायजेरियाचा, तर एक स्थानिक तुयें येथील नागरिक यांना अटक
पणजी – पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने २ वेगवेगळ्या धाडींमध्ये ९ लाख २० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. सचिन हळदणकर या स्थानिक तरुणाला तुयें येथील औद्योगिक तंत्रज्ञान संस्थेजवळ (आयटीआय – इंडस्ट्रियल टेक्निकल इन्स्टिट्यूट) ७ लाख ७० सहस्र रुपयांचे चरस आणि एक्स्टेसी हे अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या गुप्तहेरांनी अमली पदार्थांच्या वितरणाच्या वेळी आरोपीला पकडण्यासाठी ते स्वतः ग्राहक असल्याचे भासवले. पर्रा येथील आणखी एका धाडीत पथकाने नायजेरियाचा नागरिक जोसेफ उझोर याला दीड लाख रुपयांचे कोकेन बाळगल्याच्या प्रकरणी अटक केली.
अमली पदार्थ व्यवहाराविषयी माहिती मिळाल्यास ११२ आणि १९३३ या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन
अमली पदार्थ विरोधी कक्षाने नागरिकांना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अमली पदार्थांशी संबंधित कोणत्याही संशयास्पद हालचालीची त्वरित तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. गोवा पोलिसांचा ११२ किंवा ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’च्या (अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या) हेल्पलाईन क्रमांक १९३३ वर माहिती दिली जाऊ शकते. गोवा नवीन वर्षाचे स्वागत करत असतांना सुरक्षित आणि अमली पदार्थ मुक्त उत्सव सुनिश्चित करण्यासाठी पार्टीत (मेजवानीत) जाणार्या लोकांना, विशेषतः अज्ञात व्यक्तींकडून मादक पदार्थांचे सेवन टाळण्याचे आवाहनही अमली पदार्थ विरोधी पथकाने केले आहे.
आंतरराज्य गांजा पुरवठा जाळ्याच्या मुख्य सूत्रधाराला झारखंडमधून अटक
अमली पदार्थ विरोधी पथकाने आंतरराज्य गांजा पुरवठा जाळ्याचा मुख्य सूत्रधार गुड्डू मोची राम याला झारखंडमधील पलामू येथून अटक केली आहे. गुड्डू राम गोव्यातील लोकांसह आर्थिकदृष्ट्या वंचित व्यक्तींचा वापर अमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी करत होता, अशी माहिती पथकाने दिली. आरोपीला सध्या ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.