दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : उद्दाम रिक्शाचालकांवर कारवाईची मागणी !; टँकरची ट्रेलरला धडक !…
उद्दाम रिक्शाचालकांवर कारवाईची मागणी !
मुंबई – कुर्ला रेल्वेस्थानक पूर्व परिसरात काही उद्दाम रिक्शाचालकांमुळे वाहतूककोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांनी अशा रिक्शाचालकांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. काही रिक्शाचालक प्रवाशांकडून मीटरप्रमाणे पैसे न घेता ४०० ते ५०० रुपये घेऊन त्यांची लूट करत आहेत. या प्रकरणी काही पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद झालेले आहेत.
संपादकीय भूमिका : अशी मागणी करण्याची वेळ का येते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?
टँकरची ट्रेलरला धडक !
डहाणू – मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवेढे उड्डाणपुलावर दुपारी १ वाजता रसायन वाहतूक करणार्या टँकरने सिमेंटचे पाईप घेऊन जाणार्या ट्रेलरला धडक दिली. या भीषण अपघातात टँकर फुटून मोठ्या प्रमाणात रसायनाची गळती झाली. चालक टँकरमध्येच अडकला होता, तर सिमेंट पाईप वाहून नेणार्या वाहनाची पुष्कळ हानी झाली.
घाटकोपर दुर्घनेतील आरोपीला ७ महिन्यांनी अटक !
घाटकोपर – येथील पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर ७ महिन्यांनी सहआरोपी व्यावसायिक अरशद खान याला लखनऊ येथून अटक करण्यात आली. यातून आर्थिक व्यवहारांविषयीची माहिती समोर येईल.
नागपूरमध्ये ९० हत्याकांड !
नागपूर – येथे गेल्या वर्षभरात ९० हत्याकांडांच्या घटना घडल्या आहेत. दिवसाढवळ्या चाकूने भोसकणे, पैशांची मागणी करत दगडाने ठेचून खून किंवा चाकूने आक्रमण करणे, वैमनस्य, टोळीयुद्ध, युवक-युवतींमधील प्रेमसंबंध, विवाहित महिला आणि पुरुष यांचे अनैतिक संबंध, धार्मिक तेढ, कौटुंबिक वाद इत्यादी घटना येथे मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.
संपादकीय भूमिका : कायदा-सुव्यवस्थेची ऐशीतैशी !