‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा, तसेच संत आणि सहसाधक यांचे साहाय्य’, यांमुळे साधिकेला नैराश्यातून बाहेर पडून सेवेतील आनंद घेता येणे
१. साधिकेच्या मनाची नकारात्मक स्थिती
‘६ मासांपूर्वी माझ्या मनाची स्थिती निराशाजनक होती. मला पुष्कळ निराशा आल्याने मी मायेकडे धाव घेण्याचा प्रयत्न करू लागले. मी माझ्या मनातील विचार आणि प्रसंग कधीच कुणाला मोकळेपणाने सांगत नव्हते. माझ्यातील ‘भावनाशीलता’ हा स्वभावदोष आणि ‘प्रतिमा जपणे’ हा अहंचा पैलू तीव्रतेने कार्यरत झाला होता.
काही प्रसंगांमध्ये माझ्या मनात साधकांविषयी नकारात्मकता निर्माण झाली होती. त्याविषयी मला वाईट वाटायचे. ‘साधक चांगले आहेत, तरीही माझ्या मनात त्यांच्याविषयी पूर्वग्रह निर्माण झाला आहे. माझे मन अशुद्ध आणि मलीन झाले आहे. मी पुष्कळ वाईट आहे’, असे मला वाटू लागले.
२. नैराश्य आल्यामुळे झालेले परिणाम !
अ. ‘काही प्रसंगांमुळे माझी साधनेची स्थिती खालावत चालली आहे’, हेसुद्धा माझ्या लक्षात येत नव्हते. निराशेमुळे मी टोकाची भूमिका घेत होते. त्याचा परिणाम साधनेसह माझ्या सर्वच कृतींवर झाला.
आ. निराशेमुळे मला काहीच करण्याची इच्छा होत नव्हती. त्यामुळे माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष होऊ लागला.
इ. माझी अलिप्तता वाढली. मी संघर्षापासून दूर पळत होते. मला बुद्धीने सर्व कळत होते; पण मी काहीच करू शकत नव्हते.
३. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी साधकांच्या साहाय्याने केलेले प्रयत्न !
३ अ. मैत्रीण आणि तिचे यजमान यांनी साधिकेशी स्वतःहून बोलून तिला समजावणे अन् मैत्रिणीशी मोकळेपणाने बोलल्यावर तिने योग्य दृष्टीकोन देणे : मला निराशा आल्यावर माझी मैत्रीण सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३६ वर्षे) आणि तिचे यजमान श्री. संदीप शिंदे हे माझ्याशी स्वतःहून बोलले. त्यांनी मला समजावून सांगितले. त्यानंतर मी मोकळेपणाने बोलण्यास आरंभ केला. मी स्वातीताईला माझ्या मनातील सर्व विचार सांगू लागले. त्यांवर ती मला योग्य दृष्टीकोन देत असे.
३ आ. भावनाशीलतेमुळे रडू येणे आणि तेव्हा ‘मानसोपचारतज्ञांशी बोलणे, नामजपादी उपाय करणे अन् स्वयंसूचना देणे’, हे प्रयत्न केल्याने त्यातून बाहेर पडता येणे : मला निराशा आल्यामुळे माझा ‘भावनाशीलता’ हा स्वभावदोष उफाळून येत असे. काही प्रसंगांत मला पुष्कळ रडू यायचे. मला त्यावर मात करता येत नसे. मी खचून गेले होते आणि आत्मविश्वास गमावून बसले होते. मी मानसोपचारतज्ञांना ही सर्व सूत्रे सांगितली. त्या मला ‘प्रसंग कसा हाताळायचा ? प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न कसे करायचे ? विचारांची योग्य दिशा कशी असायला हवी ?’, हे सांगू लागल्या. त्यानंतर माझ्या मनात नकारात्मक विचार आल्यावर मला रडू आले, तर मी रडता रडता स्वयंसूचना सत्र बनवून स्वातीताईला किंवा मानसोपचारतज्ञांना पाठवायचे. त्यांनी सांगितलेली स्वयंसूचना देऊन मी नामजपादी उपाय करायचे. त्यानंतर काही वेळाने मी शांत झाल्यावर माझ्या लक्षात यायचे की, ‘मनमोकळेपणाने बोलणे, नामजपादी उपाय करणे आणि स्वयंसूचना देणे’, हे प्रयत्न केल्याने मी त्या स्थितीतून बाहेर पडले. स्वयंसूचना देतांनाही माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष व्हायचा. तेव्हा मी मानसोपचारतज्ञांशी वेळोवेळी बोलून त्यांचे साहाय्य घेत असे.
३ इ. सौ. सुप्रिया माथूर यांना आढावा देऊ लागल्यावर योग्य दिशा मिळणे आणि त्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर स्थिती सुधारणे : त्यानंतर मी साै. सुप्रिया सुरजित माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४१ वर्षे) यांना माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा देऊ लागले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मी हळूहळू आढाव्यात मनमोकळेपणाने बोलू लागले. सुप्रियाताईंच्या माध्यमातून मला योग्य दिशा मिळू लागली. ‘अंतर्मुख होऊन प्रयत्न कसे करायला हवेत ?’, हे मला कळू लागले. मी ताईंनी सांगितलेल्या दृष्टीकोनांनुसार प्रयत्न केले. त्यानंतर माझी स्थिती सुधारत गेली.
४. संतांनी केलेले साहाय्य !
४ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधिकेला पुष्कळ प्रेमाने सांभाळणे आणि त्यांच्या सत्संगातून साधिकेला ऊर्जा मिळणे : मी निराशेच्या स्थितीत असतांना एका सेवेनिमित्त श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे जात असे. तेव्हा माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष होत असे. त्या माझी पुष्कळ प्रेमाने विचारपूस करायच्या आणि निराशेवर मात करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगायच्या. त्या साक्षात् देवीच असल्यामुळे त्यांना माझ्या मनातील सर्व विचार कळायचे. माझ्या नकारात्मक स्थितीत त्यांनी मला पुष्कळ प्रेमाने सांभाळले. त्यांनी सांगितलेली सेवा करतांना माझ्या मनातील नकारात्मक विचार दूर होऊन मला त्या सेवेशी थोडेफार एकरूप होणे जमू लागले. सेवेच्या वेळी माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय व्हायचे. त्यांच्या सत्संगात असतांना आणि त्यांच्या समवेत सेवा करतांना मला पुष्कळ ऊर्जा मिळायची.
४ आ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधिकेसाठी नामजपादी उपाय करणे आणि त्यामुळे साधिकेला त्रासातून बाहेर पडण्यास साहाय्य होणे : या कालावधीत सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी माझ्यासाठी २ – ३ घंटे नामजपादी उपाय केले. माझी स्वतःहून नामजप करण्याची स्थिती नव्हती. मी उपायांना बसले, तरी ‘मला काही लाभ होत नाही’, असे मला वाटायचे. सद्गुरु गाडगीळकाका भ्रमणभाष करून मला बोलवायचे. मला बोलावण्यात त्यांचा वेळ जाऊ नये; म्हणून मी त्यांच्याकडे नामजपादी उपायांसाठी जाऊ लागले. मला माझ्या आध्यात्मिक त्रासातून बाहेर पडायला त्यांचे पुष्कळ साहाय्य झाले.
५. परात्पर गुरुदेवांनी साधिकेला निराशात्मक स्थितीतून बाहेर काढून तिच्याकडून साधना करवून घेतल्याची आलेली अनुभूती !
‘माझी निराशात्मक आणि हतबल स्थिती असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे माझ्यावर पूर्ण लक्ष होते’, याचा अनुभव मी घेतला. परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून प्रयत्न करून घेतले आणि त्यांनीच मला नकारात्मक स्थितीतून बाहेर काढले. प्रत्यक्षात सेवा करतांना माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष होत होता, तरीही मी सेवा चालू ठेवली. त्यामुळे मला साधकांकडून पुष्कळ शिकायला मिळाले. माझी स्थिती नसतांनाही परात्पर गुरु डॉक्टर मला सेवेतील सूत्रे सुचवायचे आणि माझ्याकडून सेवा करून घ्यायचे. त्यामुळे सेवा करतांना माझ्या मनातील नकारात्मक विचार दूर होऊन मला शिकण्यातील आनंद मिळायचा आणि माझी भावजागृतीही व्हायची.
६. कृतज्ञता आणि प्रार्थना
आता पुष्कळ कालावधीनंतर मला देवाचे विचार ग्रहण करता येत आहेत. मला निराशेतून बाहेर काढण्याचे श्रेय परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि मला साहाय्य करणारे साधक यांनाच जाते.
‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, ‘आज मी करत असलेली प्रत्येक सेवा तुमच्या कृपेने मला मिळाली आहे. मला तुमच्या विश्वासास पात्र बनवा. आता हे आयुष्य तुमच्यासाठीच आहे. मला माझा देह, चित्त, मन आणि बुद्धी रक्तचंदनासमान तुमच्या सेवेत झिजवता येऊ दे’, अशी तुमच्या चरणी कळकळीने प्रार्थना करते.’
– एक साधिका, गोवा. (३.२.२०२४)