सद्गुरु स्वाती खाडये यांनी पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांची मुलाखत घेऊन त्यांच्या साधनाप्रवासाचे उलगडलेले विविध पैलू !
१४.३.२०२३ या दिवशी पुणे येथील सौ. मनीषा महेश पाठक (वय ४२ वर्षे) सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संतपदी विराजमान झाल्याचे सद्गुरु स्वाती खाडये यांनी घोषित केले. त्या सोहळ्यात आरंभी सद्गुरु स्वाती खाडये यांनी सौ. मनीषा पाठक यांचा साधनाप्रवास जाणून घेण्यासाठी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या काही भाग ३१.१२.२०२४ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहू.
(भाग २)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/868591.html
४. नांदेड येथील सेवाकेंद्रात स्वच्छतेसहित सर्व प्रकारच्या सेवा करणे
सद्गुरु स्वाती खाडये : तुम्ही सेवा कशी चालू केली ?
सौ. मनीषा पाठक : मी नांदेड येथील सेवाकेंद्रात शौचालय आणि स्नानगृह स्वच्छ करायचे किंवा तेथे जी सेवा सांगतील, ती करायचे. नंतर मी पुढचे शिक्षण घेण्यासाठी पुण्याला गेले.
५. पदव्युत्तर शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर साधनेला गती मिळणे
५ अ. पुण्यात आल्यावर साधकांचा सत्संग लाभणे
सौ. मनीषा पाठक : माझ्या वडिलांना ‘मुलींनी स्वतःच्या पायावर उभे रहावे आणि शिकावे’, असे वाटत होते. त्यांनी मला शिकण्यासाठी पुण्याला पाठवले. मी ‘माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये ‘करिअर’ करायचे’, असे ठरवले. तेव्हा मला पुण्यातील काहीच ठाऊक नव्हते. मला सनातनच्या साधिका नीता साळुंखे यांचा भ्रमणभाष क्रमांक मिळाला होता. त्यांना संपर्क केल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘इथे डहाणूकर कॉलनीत सरस्वती शाळा आहे. तेथे तू सत्संगाला ये.’’ मी सत्संगाला जाऊ लागले.
५ आ. ‘गुरुदेव आपल्याकडे पहात आहेत’, असे वाटणे आणि त्यांच्यावरील श्रद्धा दृढ होणे : मी सेवेला पायीच जायचे, तरी मला कधीच काही त्रास झाला नाही. मी परात्पर गुरु डॉक्टरांचे एक छायाचित्र जवळ ठेवले होते. तेव्हा ‘परम पूज्य माझ्याकडे पहात आहेत’, असे मला वाटायचे. तेव्हापासून गुरुदेवांवरील माझी श्रद्धा दृढ झाली.
५ इ. शिक्षण घेत असतांना शिकवणीवर्ग घेऊन आर्थिक अडचणींवर मात करणे आणि सेवाही चालू ठेवणे
सद्गुरु स्वाती खाडये : शिक्षण घेत असतांना तुम्हाला पुष्कळ अडचणींना सामोरे जावे लागले, तरीही तुम्ही न डगमगता गुरूंवर श्रद्धा ठेवून शिक्षण पूर्ण केले आणि साधनाही केली. हे तुम्हाला कसे जमले ?
सौ. मनीषा पाठक : हीसुद्धा गुरुदेवांचीच कृपा ! मला २ लहान बहिणी होत्या. त्यांचेही शिक्षण चालू होते. माझे वडील निवृत्त होणार होते. त्यामुळे मला नोकरी करून शिकावे लागणार होते. मी मिळतील ती छोटी-मोठी कामे केली. मला कुठल्याही कामाची लाज वाटली नाही.
मी दुचाकीवरून स्वारगेट येथून ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे गठ्ठे घ्यायचे आणि कोथरूड भागात आणून द्यायचे. मग मी अन्य वृत्तपत्रांचे गठ्ठेही द्यायचे. त्याचे मला दिवसाचे २० रुपये मिळायचे. मी पैसे कधीच अनावश्यक व्यय केले नाहीत. आई-वडिलांनीच मला काटकसरीने रहायला शिकवले होते. त्यानंतर मी मुलांचे शिकवणीवर्ग (ट्यूशन्स) घ्यायचे. मी शाळेत असतांना टिळक विद्यापिठाच्या संस्कृतच्या परीक्षा दिल्या होत्या. त्यामुळे मला संस्कृत भाषा चांगली येत होती. मी संस्कृतचे शिकवणीवर्ग घेऊ लागले. तेथे मला ७०० रुपये मिळायचे.
एकदा मी ‘सनातन प्रभात’चे वितरण करत असतांना तेथे एक काकू आल्या. त्यांनी मला माझ्या शिक्षणाविषयी विचारले आणि म्हणाल्या, ‘‘माझी मुलगी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे आणि तिच्या मैत्रिणीही आहेत. तू त्यांना घरी येऊन शिकवशील का ?’’ त्यावर मी ‘चालेल’, असे म्हटले.
सद्गुरु स्वाती खाडये : गुरुदेव आपल्याला सांगतात, ‘‘नियोजनकौशल्य जमले की, सर्व चांगले जमते.’’ तुमच्याकडे ‘नियोजनकौशल्य’, हा गुण आधीपासूनच होता.
५ ई. तीव्र शारीरिक त्रास होत असतांना गुरुदेवांवरील दृढ श्रद्धेमुळे काळजी न वाटणे
सौ. मनीषा पाठक : मला शारीरिक त्रासही चालू झाले होते. मला ‘मायग्रेन’चा (तीव्र डोकेदुखीचा) ‘अटॅक’ यायचा. माझ्या डोक्याचा डावा भाग पुष्कळ दुखायचा आणि जोरात चक्कर यायची. त्या वेळी मी ‘सिग्नल’च्या जवळ असेन, तरी हातातली गाडी बाजूला ठेवून मी मार्गाच्या कडेला बसत असे.
सद्गुरु स्वाती खाडये : या सगळ्या प्रसंगातही ‘गुरुदेव मला वाचवणार आहेत’, अशी तुमची दृढ श्रद्धा होती ना ?
सौ. मनीषा पाठक : हो, सद्गुरु ताई. तेव्हा मी साधकांमध्ये रहायचे आणि सेवेत असायचे. त्यामुळे मला ‘या शहरात आपले कसे होईल ?’, अशी काळजी वाटली नाही.
६. वाईट शक्तींचे झालेले त्रास आणि त्यांवर गुरुकृपेने केलेली मात !
६ अ. साधनेला आरंभ करण्यापूर्वी झालेले वाईट शक्तींचे त्रास
सद्गुरु स्वाती खाडये : तुम्हाला वाईट शक्तींचा तीव्र त्रास होता. तो त्रास कशा स्वरूपाचा होता आणि त्या वेळी तुम्ही गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून कसे प्रयत्न केले ?
सौ. मनीषा पाठक : मला लहानपणापासूनच वाईट शक्तींचा त्रास होता. माझी देवावर भक्ती होती. त्यात अनिष्ट शक्तींच्या त्रासांमुळे पुष्कळ अडथळे यायचे.
१. मला वाईट स्वप्ने पडायची, दृष्ट लागायची, भीती वाटायची, तसेच ‘आपल्या बाजूला कुणीतरी वावरत आहे’, असे जाणवायचे. माझे अपघात व्हायचे. मी लहानपणापासून सतत रुग्णाईत असायचे.
२. मी अगदी लहान होते. तेव्हा आई-बाबा मला तिरुपतीला घेऊन गेले होते. त्या वेळी मला पुष्कळ जुलाब झाले आणि मी रुग्णाईत झाले. तेथे जवळच राघवेंद्रस्वामींचा मठ आहे. आईने मला तेथेच नदीच्या काठावर एका दगडावर ठेवले आणि स्वामींना सूक्ष्मातून सांगितले, ‘आता या बाळाला वाचवणे केवळ तुमच्याच हातात आहे.’
३. काही खाल्ले की, मला ‘उलट्या होणे, पोटात दुखणे, सारखे रुग्णालयात भरती करावे लागणे’, असे शारीरिक त्रास होत होते.
४. कधी कधी माझी चिडचिड व्हायची किंवा मी पुष्कळ भावनिक व्हायचे. मी घंटोन्घंटे रडायचे.
५. मला काही सुचत नसे. एखाद्या व्यक्तीला जे सांगायचे नाही, ते माझ्याकडून सांगितले जायचे. मी १० वीत असतांना आगाशीतून (गॅलरीतून) खाली पडले होते, तसेच माझ्या शरिराची डावी बाजू लुळी पडली होती. मला परीक्षेलाही बसता आले नाही. या प्रसंगांतून मी गुरुदेवांच्या कृपेनेच वाचले.
६ आ. साधनेला आरंभ केल्यानंतर वाईट शक्तींमुळे झालेले विविध त्रास
सद्गुरु स्वाती खाडये : ताई, साधनेत आल्यावर तुमचा त्रास वाढला. त्यावर मात करून तुम्ही सेवा आणि साधना कशी केली ?
सौ. मनीषा पाठक : साधनेला आरंभ केल्यावर मला ‘हात-पाय वाकडे होणे, उलट्या होणे किंवा डोक्यात मुंग्या येणे, बेशुद्ध पडणे’, असे त्रास व्हायचे. माझे डोके इतके दुखायचे की, मी भिंतीवर डोके आपटून घ्यायचे. मला सहन होत नसे. ‘कुणीतरी माझा गळा दाबत आहे’, असे मला वाटायचे. त्या वेळी मी ‘परात्पर गुरु डॉक्टर जवळ आहेत आणि तेच माझी काळजी घेत आहेत’, असा भाव ठेवायचे.
माझ्या कपड्यांवर रक्ताचे डाग पडत असत. माझ्या चपलांना छिद्रे पडायची. माझ्याकडे गुरुदेवांचे एक छायाचित्र होते, त्यावरही डाग पडले होते. मला वाईट शक्ती दिसायच्या. मी त्यांची चित्रे काढत असे. कु. प्रार्थना हिच्या (मुलीच्या) जन्मानंतरही ३ वर्षे माझे प्रकटीकरण व्हायचे.
कधी कधी माझे मन आणि बुद्धी यांवर पुष्कळ आवरण यायचे. मला काहीच कळत नसे. मी एखाद्या मनोरुग्ण व्यक्तीप्रमाणे वागायचे. सद्गुरु ताई, मी साधनेत नसते ना, तर वेड्या माणसांप्रमाणे रस्त्यावर फिरत राहिले असते. हा त्रास प्रार्थनाच्या जन्मानंतर हळूहळू न्यून होऊ लागला. तेव्हा पुणे जिल्ह्यामध्ये साधकांवर नामजपादी उपाय करण्यासाठी प.पू. देशपांडेकाका आले होते. मी त्यांच्या उपायांना जाऊ लागले आणि त्यामुळे माझे त्रास न्यून होऊ लागले. त्यानंतर माझी नामजपादी उपायांवरील श्रद्धा वाढली.
मी घरातल्या चांगल्या वस्तू बाहेर आणून ठेवत असे आणि बाहेरच्या लोकांच्या केराच्या बालदीतील कचरा घरात घेऊन यायचे. माझे मानसिक त्रास फार काळ राहिले नाहीत; मात्र शारीरिक त्रास अधिक काळ राहिले. मी सकाळी उठले की, ‘कुणीतरी माझे अंग घट्ट बांधले आहे’, असे मला वाटायचे. त्यामुळे मला सर्वसामान्य महिलांप्रमाणे घरातील कामे करता येत नसत.
सद्गुरु (कु.) स्वाती खाडये : या गोष्टी वाईट शक्ती तुमच्याकडून करून घेत होत्या. तुम्ही ठणठणीत दिसत होता आणि आतून तर तुम्हाला तीव्र त्रास होत होता. तुम्ही त्यावर चांगली मात केली. गुरुदेवांनी तुम्हाला पावलोपावली वाचवले.
६ इ. वाईट शक्तींनी दिलेल्या त्रासांच्या प्रसंगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने रक्षण होणे
सौ. मनीषा पाठक : एकदा माझा त्रास एवढा वाढला की, मी माझ्या स्वभावदोष-निर्मूलनाच्या संदर्भात लिखाण केलेल्या सर्व वह्या एकत्र करून पेटवून दिल्या. तेव्हा प्रार्थना ७ – ८ मासांची होती. मी शांतपणे आगीकडे बघत बसले होते. मला ‘मी काय करत आहे ?’, ते कळत नव्हते. प्रार्थना त्या आगीजवळ गेली असती, तर तिलाही भाजले असते. तेव्हा आमच्या भोवती गुरुदेवांचे संरक्षककवच होते. त्यामुळे आम्हाला काहीच झाले नाही.
सद्गुरु स्वाती खाडये : तुम्ही दृढ श्रद्धा ठेवून साधना केल्यामुळे मृत्यूच्या प्रसंगातही गुरुदेवांनी तुम्हाला फुलासारखे झेलले आहे.’
(पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांच्या संत-सन्मान सोहळ्याच्या वेळी सद्गुरु स्वाती खाडये यांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीतील संकलित भाग) (१४.३.२०२३)
(‘ही मुलाखत पू. (सौ.) मनीषा पाठक यांना संत म्हणून घोषित करण्यापूर्वीची असल्याने त्यांच्या नावाच्या आधी ‘पूज्य’ लावलेले नाही.’ – संकलक)
(क्रमशः)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/868954.html