आगामी वर्षात आरोग्याच्या दृष्टीने स्वतःच्या दिनक्रमात आणायची सूत्रे !
वर्ष २०२५ च्या उंबरठ्यावर आपण सगळ्यांनीच पुढील काही गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी स्वतःच्या दिनक्रमात आणायला हव्यात, असे प्रकर्षाने वाटते.
१. सगळ्या गोष्टींसाठी गोळ्या न शोधणे, ‘पिल पॉपिंग’ची (मनाने औषधे घेणे) सवय कमीत कमी असणे किंवा बंद करणे, शरिराला बरे व्हायला पूर्ण वेळ देणे, अधिकाधिक उपचारासाठी आयुर्वेद औषधांची कास धरून ‘अँटिबायोटिक्स’ (प्रतिजैविके) आणि ‘सिंथेटिक’ (कृत्रिम) औषधांचा वापर न्यूनतम ठेवणे.
२. ताणाची नोकरी आणि घर असे दुहेरी उत्तरदायित्व असतांना स्वतःचे प्राधान्यक्रम लक्षात घ्यावे आणि आपल्या जोडीदाराशी बोलून आरोग्याला सुयोग्य दोन्हींचा ताळमेळ बसेल, असा पर्याय निवडणे.
३. सकाळी लवकर उठणे आणि रात्री जागरण न करता लवकर झोपणे. बाहेर खायची वेळ आल्यास त्यातल्या त्यात चांगले पर्याय निवडणे.
४. घरात विकतचा खाऊ आणतांना त्यात कुठले तेल वापरले आहे, ते आवर्जून बघणे. मुलांना रंग घातलेले पदार्थ, चायनीज (सोया सॉस, अजिनोमोटो) यांतील संभाव्य धोके लक्षात घेऊन गोळ्या, केक, सिरप या गोष्टी न देणे, जेणेकरून सवय लागू नये.
५. कुठल्याच गोष्टींमध्ये टोक न गाठणे. व्यायाम, बाहेर खाणे, अपथ्य, वजन सगळेच आटोक्यात ठेवणे.
६. कोणत्याही आजाराची लक्षणे दिसताच तो आजार अंगावर न काढता वैद्यकीय सल्ला घेणे. त्यानुसार परीक्षण करून उपचार चालू करणे.
७. उपाहारगृहामध्ये गेले असता चीज, मेयोनीज, मैदा हे पदार्थ टाळून पदार्थांची मागणी करणे. ‘सॉफ्ट ड्रिंक’ (शीतपेय) ऐवजी त्यातल्या त्यात सोडा, ताक अशा न्यूनतम भेसळ असलेली पेय घ्यावीत.
८. अधिकचे वजन, लहान वयात थायरॉईड, कोलेस्टेरॉल, पाळीच्या वेळी पोटात दुखणे, अनियमित पाळी हे ‘न्यू नॉर्मल’ (नवीन सामान्य) नाही. त्यावर उपचार करून ही लक्षणे उत्तम पद्धतीत आटोक्यात रहातात. आपली इच्छा मात्र हवी. ‘जिम’मध्ये (आधुनिक उपकरणांसह असलेली व्यायाम शाळा) व्यायाम करत असाल, तर सर्वांगीण व्यायाम करण्याकडे पूर्ण लक्ष देणे.
९. मौजमजा म्हणून धूम्रपान (स्मोकिंग), मद्यपान यांपासून स्वतःला दूर ठेवणे. ‘जितक्या लहान वयात मुलांची या गोष्टींशी ओळख होईल, तितके त्यांना त्याचे व्यसन लागायची शक्यता अधिक असते’, असे संशोधन सांगते. पालकांनी मुलांसमोर मद्यपान करत बसू नये आणि आपल्याकडून ते त्यांच्यापर्यंत पोचवू नये, असे किमान वाटते. कुठल्याही संवादाचा अभाव ठेवून मग नंतर त्यावर ताशेरे ओढण्यात फारसे योग्य नाही.
१०. इतरांच्या तुलनेत मागे पडण्याची भीती, दुसर्याशी तुलना, मत्सर आणि त्यातून स्वतःला त्रास करून न घेणे, यातून स्वतःचे मानसिक स्वास्थ्य खराब होण्यापलीकडे पदरात काही पडत नाही. दुसर्याच्या चुका काढत बसण्यात तुमचा वेळ आणि तुमचे लक्ष्य गेले की, तुमच्या हातून विधायक असे काही होत नाही, हे नक्की.
आपण समाजासाठी, कुटुंबासाठी, आपल्या क्षेत्रासाठी चांगले काय देऊ शकतो, याचा विचार केल्यास देश म्हणून सगळ्यांना एकत्र पुढे नेता येईल हे नक्की !
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (२८.१२.२०२४)