असाही एक विवाह !
महानंदा, वारणा यांसारख्या प्रसिद्ध ‘ब्रँड’प्रमाणे दूध प्रक्रियेच्या क्षेत्रात कार्य करणार्या ब्रँडचे व्यवस्थापकीय संचालक एका महनीय व्यक्तींच्या मुलीचा विवाह सोहळा नुकताच पुणे येथे पार पडला. स्वत:चे मोठे आस्थापन असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार आणि ओळखी पुष्कळ आहेत. नातेवाईकही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे विवाह हासुद्धा ‘शाही’ होणे अपेक्षित होते, त्याप्रमाणे तो झालाही ! मोठ्या व्यक्तींचे विवाह, म्हणजे प्रचंड गडबड, गोंधळ, मोठ्या पाहुण्यांची वर्दळ ही आलीच ! विवाह म्हणजे बाहेरच्या जगात इतरांना एक दिवस धांगडधिंगा घालण्याची संधीच ! असे असूनही त्या महनीय व्यक्तींनी विवाह समारंभातील धार्मिक विधींचा भाग चांगल्या प्रकारे होऊ दिला. विवाहात जी गाणी लावली होती, ती अस्सल मराठी आणि चांगल्या दर्जाची होती. काही गायकांनी ती गायली. त्यांचे जावई विदेशात नोकरी करत असल्यामुळे आणि त्यातही राजस्थानी असल्यामुळे विदेशातील पाहुणे मंडळींची लग्नाला उपस्थिती होती; मात्र विदेशी पाहुणे मंडळीतील पुरुष हे भारतीय पद्धतीने सदरा, पायजमा, शेरवानी परिधान करून, तर महिला महाराष्ट्रीयन आणि गुजराती पद्धतीची साडी नेसून सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. रात्रीच्या स्वागत समारंभातही विदेशी पाहुण्यांनी विदेशी पोषाख न घालता भारतीय पद्धतीचाच पोषाख घातला होता. भारतियांना मात्र विदेशी पद्धतीच्या पेहरावाचे, पुरुषांना ‘कोटा’चे पुष्कळ आकर्षण असते, ते लग्नासारख्या कार्यक्रमातही लक्षात येते. स्वागत समारंभातही शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, केवळ मंजुळ वाद्यांचे वादन असेच कार्यक्रम ठेवले होते. स्वागत समारंभात पुष्कळ गर्दी असूनही तेथे कोणताही धांगडधिंगा नव्हता. जावई राजस्थानी असल्याने विवाहाच्या आदल्या रात्री ‘संगीत रजनी’चा कार्यक्रम ठेवला होता. विवाह विधींच्या वेळी नातेवाइक आणि आप्तेष्ट, तर स्वागत समारंभाला सर्व परिचित अन् आस्थापनाशी संबंधित लोक यांना निमंत्रण होते.
असे विवाहसोहळे बाहेरच्या जगात सध्या अभावानेच आढळतात. लोक विवाहाला केवळ जेवणासाठीच येतात आणि नाच-गाण्याची आवड पूर्ण करून घेतात. विवाहाचे विधी व्यवस्थित होण्याऐवजी भटजींना ‘लवकर आवरा’, असे सुनावण्यात येते. त्यात वधू-वर यांना उचलणे, नातेवाइकांचा विवाहाच्या व्यासपिठावर गदारोळ असा भाग होतो. समाजातील प्रतिष्ठित लोकांनी त्यांचे असे सार्वजनिक आणि घरगुती कार्यक्रम चांगल्या पद्धतीने केल्यास इतरांसाठी तो आदर्श ठेवला जातो. समाजात यातून चांगला संदेशही जातो. त्यामुळे विवाह, म्हणजे ‘शक्तीप्रदर्शन’ आणि गोंधळ यांपुरता मर्यादित न रहाता त्यातून धार्मिकताही टिकून रहाते.
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल.