जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे सामूहिक आरती, बालसंस्कारवर्ग आणि आध्यात्मिक ग्रंथालय यांना प्रारंभ !
जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) – शिर्डी येथे पार पडलेल्या ‘तृतीय महाराष्ट्र मंदिर – न्यास परिषदे’त ठरल्यानुसार जयसिंगपूर येथे ११ वी गल्ली मधील मंदिर विश्वस्त आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंतराव जांभळे यांच्या खासगी मालकीच्या श्री दत्त मंदिरात सामूहिक आरती, बालसंस्कारवर्ग आणि आध्यात्मिक ग्रंथांचे ग्रंथालय चालू करण्यात आले.
प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. महेंद्रसिंह रजपूत यांच्या हस्ते श्रीकृष्णाची प्रतिमा पूजन करण्यात आले, तर ज्येष्ठ नागरिक श्री. विष्णु हात्तळगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आध्यात्मिक ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. भगवंतराव जांभळे, श्री. प्रकाश फडतारे, श्री. सुमंत रत्नपारखे, ‘श्री स्वामी समर्थ दरबार’चे विश्वस्त श्री. विनय कदम, ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराचे विश्वस्त श्री. राजेंद्र दाईंगडे, कापड व्यापारी श्री. निर्मल पोरवाल, सौ. भक्ती जांभळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे उपस्थित होते.
या संदर्भात गीता परिवाराच्या मध्यांचलप्रमुख श्रीमती प्रमिलाताई माहेश्वरी म्हणाल्या, ‘‘मंदिर महासंघाच्या माध्यमातून श्री. भगवंतराव जांभळे यांनी पुढाकार घेऊन बालसंस्कारवर्ग चालू केला, हे चांगले कार्य केले आहे. असे बालसंस्कारवर्ग सर्वत्र चालू होणे आवश्यक आहे.’’