छत्तीसगडमध्ये ख्रिस्ती झालेल्या ६५१ कुटुंबांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
सक्ती (छत्तीसगड) – छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यात ख्रिस्ती झालेल्या ६५१ कुटुंबांनी नुकताच हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे. ही सर्व कुटुंबे पूर्वी हिंदु होती; पण काही कारणांमुळे त्यांनी ख्रिस्ती पंथ स्वीकारला होता. भाजपचे नेते प्रबल प्रतापसिंह जुदेव यांच्या पुढाकाराने हा ‘घर वापसी’ (हिंदु धर्मात पुनर्प्रवेशाचा) कार्यक्रम पार पडला. जुदेव यांचे कुटुंब २ पिढ्यांपासून या कार्यात गुंतले आहे. त्यांनी धर्मांतरित सहस्रावधी कुटुंबांना हिंदु धर्मामध्ये परत आणले आहे. सक्ती येथे आयोजित एका विशाल हिंदु परिषदेत या कुटुंबांच्या सदस्यांनी हिंदु धर्मात प्रवेश केला. या कार्यक्रमात साध्वी प्रज्ञा यांच्यासह अनेक हिंदु संत सहभागी झाले होते.
‘क्रिप्टो ख्रिश्चन’ हा सर्वांत मोठा धोका ! – भाजपचे नेते प्रबल प्रतापसिंह जुदेव
(‘क्रिप्टो ख्रिश्चन’ म्हणजे ख्रिस्ती पंथाचे गुप्तरित्या पालन आणि प्रचार करणारे ख्रिस्ती )
या कार्यक्रमात बोलतांना प्रबल प्रतापसिंह जुदेव म्हणाले की, सनातन संस्कृतीला ‘क्रिप्टो ख्रिश्चन’ हा सर्वांत मोठा धोका आहे. हिंदु समाजात रहाणारे हे ‘क्रिप्टो ख्रिश्चन’ फसव्या पद्धतीने धर्मांतराला प्रोत्साहन देतात आणि ख्रिस्ती पंथाचा गुप्तपणे प्रचार करतात. त्यांचे हे कुकृत्य उघडे पाडणे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे.