भारताने ढाक्यावर (बांगलादेश) विजय मिळवला, ती मोहीम ‘ऑपरेशन कॅक्टस-लिली’ !
डिसेंबर १९७१ पूर्व बंगालमध्ये पाकिस्तानी सैन्याविरुद्ध भारतीय सेनेचे घमासान युद्ध चालू होते. त्या वेळच्या पूर्व पाकिस्तानची राजधानी ढाका जिंकणे, हे एक ध्येय होते. भारतीय सेनेने ढाक्यावर तिन्ही बाजूंनी आक्रमण केले होते; परंतु त्यामध्ये दोन प्रमुख अडथळे होते. पहिला नैसर्गिक अडथळा होता, ईशान्य मोसमी पावसामुळे वाटेतील सर्व नद्या-नाले दुथडी भरून वहात होते. दुसरा अडथळा, म्हणजे ढाक्याच्या वायव्येला ७० मैलांवर असलेल्या सिराजगंज शहराजवळ पाकिस्तानी क्रमांक ‘९३ ब्रिगेड’ची छावणी होती. ती ब्रिगेड ढाक्याचे संरक्षण करण्यासाठी भारतीय सैन्यावर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होती. भारतीय सैन्याने वायूसेनेची हेलिकॉप्टर्स आणि सैन्याचे अभियंते यांच्या साहाय्याने तात्पुरते पूल बांधून पूर आलेले नद्या-नाले पार केले. सुदैवाने पूर्व पाकिस्तानच्या आकाशामध्ये (एअर स्पेस) ८ डिसेंबर १९७१ या दिवशी भारतीय वायूसेनेने पूर्णपणे स्वामीत्व मिळवले होते. त्यामुळे भारतीय वायूसेनेच्या विमानांचा मार्ग सुरक्षित झाला होता. पाकिस्तानी क्रमांक ९३ ब्रिगेडची आगेकूच अडवण्यासाठी ११ डिसेंबर १९७१ या दिवशी भारतीय सशस्त्र सैन्य दलांनी सिराजगंज शहराच्या दक्षिणेला जमुना-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या संगमाजवळ असलेल्या ‘टंगेल’ गावापाशी विमानांतून ‘पॅराशूट बटालियन ग्रुप’ उतरवून आक्रमण केले. त्या ऐतिहासिक ‘ऑपरेशन’चे (मोहिमेचे) नाव होते ‘कॅक्टस-लिली.’ त्यामध्ये भारताच्या क्रमांक ५० स्वतंत्र ‘पॅराशूट ब्रिगेड’च्या दुसर्या ‘पॅराशूट बटालियन ग्रुप’चे सैनिक विमानांतून पॅराशूटच्या साहाय्याने ‘टंगेल’ गावापाशी उतरवले.
१. भारतीय वायूसेनेने वापरलेली विमाने
‘ऑपरेशन कॅक्टस-लिली’मध्ये भारतीय वायूसेनेने ‘मार्गशोधक २ ‘फेअरचाईल्ड पॅकेट (सी-११९ अमेरिकन)’ विमाने, तोफांसारखे जड साहित्य उतरवण्यासाठी ६ ‘अन्टोनोव्ह ए.एन्.-१२ (रशियन)’ विमाने, त्यांच्या मागे सैनिक उतरवणारी ‘पॅकेट’ (२० विमाने) आणि ‘डकोटा’ (२२ विमाने) (सी-४७ अमेरिकन) विमाने’, ही विमाने वापरली. मुख्य लक्ष्यापासून शत्रूची दिशाभूल करण्यासाठी २ ‘कॅरीबू (कॅनेडियन)’ विमाने वापरली होती.
२. विविध सैन्याचे एकत्रीकरण
‘ए.एन्.-१२’ विमानांच्या ताफ्याचा तळ कोलकात्याच्या डमडम विमानतळावर होता. ‘पॅकेट’ विमाने आगरा आणि अलाहाबाद (प्रयागराज) विमानतळांवरून कोलकातामार्गे कार्यरत झाली होती. पाटणा शहराजवळच्या ‘बीहटा’ विमानतळावर ‘डकोटा’ विमानांचा तळ होता. कलाईकुंडा विमानतळावर ११ डिसेंबर १९७१ या दिवशी सर्व विमानांचा ‘टास्क फोर्स’ (वायूसेनेचे वैशिष्ट्यपूर्ण दल) एकत्र आला. मोहीम कशी कार्यवाहीत आणायची, याचे तेथे ‘ब्रीफिंग’ (माहिती सांगणे) देण्यात आले. ‘पॅकेट स्क्वाड्रन’च्या कमांडिंग अधिकार्यांनी विमानांच्या कार्याविषयीचे ‘ब्रीफिंग’ केले. त्यानंतर क्रमांक २ ‘पॅराशूट बटालियन’च्या कमांडिंग अधिकार्यांनी ‘पॅरा’ सैनिकांना एक लहानसे उत्साहवर्धक भाषण दिले. ३ प्रकारची विमाने वेगवेगळ्या वेगांनी, वेगवेगळ्या उंचीवरून, एकाच ‘ड्रॉपिंग झोन’वर (पॅराशूटच्या साहाय्याने सोडण्यात येणार्या सैनिकांना उतरवण्याचे ठिकाण), ‘पॅरा बटालियन ग्रुप’चे साहित्य (तोफा, वाहने इत्यादी) आणि ‘पॅरा’ सैनिक सूर्यास्ताच्या सुमारास उतरवले. याखेरीज स्वतःच्या बचावाची शस्त्रास्त्रे नसलेली ‘पॅकेट’, ‘डकोटा’ आणि ‘ए.एन्.-१२’ ही मालवाहू विमाने ही पूर्व पाकिस्तानमध्ये प्रथमच बराच वेळ उड्डाण करणार होती. सुदैवाने पूर्व पाकिस्तानच्या आकाशावर (एअर स्पेस) भारतीय वायूसेनेने पूर्णपणे स्वामीत्व मिळवलेले असल्यामुळे भारतीय वायूसेनेच्या विमानांचा मार्ग सुरक्षित झाला होता.
३. भारताचा विजय
‘ऑपरेशन कॅक्टस लिली’च्या ‘पॅराशूट बटालियन ग्रुप’ने जमुना-ब्रह्मपुत्रा संगमावरील पुंगली पूल ११ डिसेंबर १९७१ च्या रात्रीच कह्यात घेतला आणि पाकिस्तानी क्रमांक ९३ ब्रिगेडला ढाक्याच्या संरक्षणासाठी जाण्यापासून रोखले. त्यायोगे भारतीय सैन्याला ढाका काबीज करण्यास साहाय्य झाले. उत्कृष्ट रचनात्मक नियोजन, तसेच भारतीय सशस्त्र सैन्य दलांचा समन्वय आणि शौर्य यांच्या परिणतीमधून विजय प्राप्त झाला.
– विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त), पुणे.