जिल्ह्यातील सव्वा ३ कोटी दस्तऐवजांचे ‘डिजिटायझेशन’ होणार !
पुणे – जीर्ण होत असलेल्या कागदपत्रांचे ‘स्कॅनिंग’ करून ‘डिजिटायझेशन’ (संकणकीकृत करणे) करण्यात येणार आहे. जन्म-मृत्यू नोंदणी दाखले, सातबारा उतारे, फेरफार तसेच विविध प्रकारचे उतारे यांचा यात समावेश असून ही संख्या सव्वा ३ कोटी इतकी आहे. ‘डिजिटायझेशन’साठी निविदा प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. यासाठी लागणार्या ६ कोटी रुपयांच्या खर्चाला ‘भूमी अभिलेख विभागा’ने संमती दिली असून हे काम ३ वर्षांत पूर्ण करायचे आहे. ‘राष्ट्रीय भूमी अभिलेख’ आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जुने अभिलेख स्कॅन करण्यासाठी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने जीर्ण झालेल्या दाखल्यांचे स्कॅनिंग करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अन्वये जिल्ह्यातील १२ तहसील कार्यालय, ११ उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, ३ नगर भूमापन कार्यालय अशा एकूण २६ कार्यालयांतील २ कोटी ८० लाख ६२ सहस्र १९२ पाने स्कॅन केली जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व कार्यालये मिळवून ३ कोटी २३ लाख ९ सहस्र ४७६ कागदपत्रांचे, पानांचे स्कॅनिंग करण्यासाठी ६ कोटी रुपये खर्च येणार आहे. कागदपत्रांच्या स्कॅनिंगमुळे भविष्यात ऑनलाईन पद्धतीने ही कागदपत्रे उपलब्ध होतील. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचेल, असे कुळ कायदा शाखेचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी सांगितले.