श्री. प्रशांत कोयंडे यांचा व्यक्त भावाकडून अव्यक्त भावाकडे आणि स्थुलातून सूक्ष्माकडे झालेला प्रवास !

‘गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत अष्टांग साधनेसह ‘अनेकांतून एकात येणे’, ‘स्थुलातून सूक्ष्मात जाणे’, ‘व्यक्त भावातून अव्यक्त भावाकडे जाणे’  इत्यादी साधनेचे मूलभूत सिद्धांत (घटक) येतात. ‘साधकाने साधनेमध्ये पुढच्या पुढच्या टप्प्यांकडे जाणे आवश्यक असते’, असे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेले आहे आणि साधकही तसा प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने रामनाथी आश्रमातील श्री. प्रशांत कोयंडे यांनी साधनेच्या मूलभूत तत्त्वांना अनुसरून केलेले प्रयत्न याविषयीची सूत्रे पुढे देत आहोत. 

श्री. प्रशांत कोयंडे

१. ‘स्थुलातून सूक्ष्माकडे जाण्यासाठी केलेले प्रयत्न 

१ अ. प्रत्यक्ष मंदिरात जाण्याऐवजी मानसरित्या दर्शन घेणे : ‘पूर्वी माझ्याकडून ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे’, या आध्यात्मिक सिद्धांताच्या दृष्टीने क्वचित् प्रयत्न केला जात होता. आता गेल्या काही दिवसांपासून तसा प्रयत्न नियमित होऊ लागला आहे आणि त्यातून मला आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होत असल्याची जाणीव होऊ लागली आहे. पूर्वी मी रामनाथी आश्रमाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायक आणि श्री भवानीमाता मंदिर यांचे प्रतिदिन दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालत होतो. आपल्याला ‘स्थुलातून सूक्ष्माकडे जायचे आहे’, हे मी विसरून गेलो होतो. अचानक मला त्याची आठवण झाली आणि मी ध्यानमंदिरात बसून मानसरित्या श्री सिद्धिविनायक आणि श्री भवानीमाता मंदिर येथील देवतांचे दर्शन घेऊन मानस प्रदक्षिणा घालण्यास आरंभ केला. त्यामुळे ‘पूर्वी मला नामजप करतांना येणारी झोप आता बंद झाली आहे आणि माझ्या एकाग्रतेत वाढ झाली आहे’, असे मला जाणवले.

१ आ. रात्री मानसरित्या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या खोलीत जाऊन झोपणे : नंतर मला रात्री मानसरित्या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या खोलीत जाऊन झोपण्याचा प्रयत्न करण्याची जाणीव झाली. काही वर्षांपूर्वी मी तसा प्रयत्न करत होतो. त्यानंतर ते बंद झाले होते. आता पुन्हा मला त्याची जाणीव होऊन मी तसा प्रयत्न करू लागलो. त्यामुळे सकाळी उठल्यावर थकवा जाऊन उत्साह येणे, साधनेच्या प्रयत्नांचे विचार मनात येणे, असे होत असल्याचे माझ्या लक्षात आले.

१ इ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची मानस पाद्यपूजा केल्यावर ती त्यांच्यापर्यंत पोचल्याचे लक्षात येणे : त्यानंतर एके दिवशी अचानक माझ्या मनात सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची मानस पाद्यपूजा करण्याचा विचार आला आणि मी तसा प्रयत्न केला. तसे केल्याने मला चांगले वाटले. मनातील नकारात्मकता अल्प झाली आणि त्याच दिवशी दुपारी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा सत्संग लाभला. तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘‘तुम्ही २ – ३ दिवसांपूर्वी भेटीला आला होतात ना ?’’ हा प्रश्न त्यांनी माझ्यापूर्वी भेटीला आलेल्या २ – ३ जणांना विचारला होता. मलाही त्यांनी हाच प्रश्न विचारल्यावर तिथे असलेल्या सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३६ वर्षे) यांनी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना सांगितले, ‘‘काही साधक सूक्ष्मातून तुमच्या खोलीत येऊन तुमचे दर्शन घेतात. त्यामुळे तुम्हाला असे वाटत असणार.’’ तेव्हा मी म्हणालो, ‘‘मीही तसेच करतो आणि आज मी प्रथमच तुमची मानस पाद्यपूजा केली.’’ यावर ते म्हणाले, ‘‘त्यामुळेच माझे पाय दुखणे बंद झाले. जेव्हा माझे पाय दुखतात, तेव्हा तुम्ही (साधक) माझी पाद्यपूजा करता आणि माझे पाय दुखणे थांबते.’’ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या या बोलण्यातून माझ्या लक्षात आले की, आपण स्थुलाऐवजी सूक्ष्मातून त्यांचे दर्शन घेतले, तर ते त्यांच्यापर्यंत पोचते. यानंतर मी त्यांना सध्या करत असलेल्या स्थुलातून सूक्ष्माकडे जाण्याच्या माझ्या प्रयत्नांविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे !’’

(क्रमश:)

– श्री. प्रशांत कोयंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.२.२०२४)

याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/868969.html

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक