सद्गुरु स्वाती खाडये यांनी पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांची मुलाखत घेऊन त्यांच्या साधनाप्रवासाचे उलगडलेले विविध पैलू !
१४.३.२०२३ या दिवशी पुणे येथील सौ. मनीषा महेश पाठक (वय ४२ वर्षे) सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संतपदी विराजमान झाल्याचे सद्गुरु स्वाती खाडये यांनी घोषित केले. त्या सोहळ्यात आरंभी सद्गुरु स्वाती खाडये यांनी सौ. मनीषा पाठक यांचा साधनाप्रवास जाणून घेण्यासाठी त्यांची मुलाखत घेतली. ती पुढे दिली आहे. (भाग १)
१. लहानपणापासून केलेली साधना
१ अ. बालपणीच आईने साधनेचे संस्कार करणे
सद्गुरु स्वाती खाडये : ‘मनीषाताई, तुम्ही साधनेला आरंभ कधी केला ? सनातन संस्थेत येण्यापूर्वी तुम्ही कर्मकांडानुसार साधना करत होता का ? तुमचा गुरुकृपायोगानुसार साधनेचा प्रवास नेमका कधी चालू झाला ?
सौ. मनीषा पाठक : माझी आई मला लहानपणापासून ‘शुभं करोती’ आणि स्तोत्रे म्हणायला शिकवायची. मी ३ – ४ वर्षांची असल्यापासून मनाचे श्लोक म्हणायचे. श्री व्यंकटेश आमचे कुलदैवत होते. त्यामुळे घरी कर्मकांड फार मोठ्या प्रमाणात होते. ‘कर्मकांड करत असतांनाही भाव कसा ठेवायचा ?’, हे आई मला लहानपणापासून शिकवायची.
१ आ. वडील शिस्तप्रिय असणे आणि त्यांच्याकडून राष्ट्रप्रेमाचे बाळकडू मिळणे : माझे बाबा फार शिस्तप्रिय होते. माझे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये होते. माझ्या आजोबांचे भाऊ, चुलतभाऊ, आजी, असे सर्व जण स्वातंत्र्यसैनिक होते. बाबा मला ‘दुर्गा वाहिनी’त (टीप) जायला सांगायचे. ते मला काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांच्या चित्रफिती दाखवायचे. तेव्हा ‘आपणही राष्ट्र आणि धर्म यांसाठी काहीतरी करूया’, असे मला वाटायचे.
(टीप – ‘दुर्गा वाहिनी’ ही विश्व हिंदू परिषदेची महिला शाखा आहे.)
१ इ. काकूंचे निधन झाल्यावर ‘आपल्या जीवनाचा उद्देश काय ?’ इत्यादी प्रश्न मनात येऊ लागणे : मी आठवीत असतांना माझ्या काकूंचे गर्भाशयाच्या कर्करोगाने निधन झाले. काकूंशी माझी जवळीक होती. त्यांच्या निधनानंतर माझ्या मनात ‘आपल्या जीवनाचा उद्देश काय ? मृत्यूनंतर आपले काय होते ?’, असे प्रश्न येऊ लागले.
१ ई. कुलदेवता, गणपति आणि श्री गजानन महाराज यांची उपासना करणे : प्रथम मी कुलदैवत व्यंकटेशाची, तसेच गणपतीचीही उपासना करायचे. नांदेड हे आमचे मूळ गाव ! नांदेडमध्ये मालेगाव रोडला श्री गजानन महाराजांचे मोठे मंदिर आहे. तेथे जाऊन मी १५१ प्रदक्षिणा घालायचे, तसेच गुरुवारी कडक उपवास करायचे.
१ उ. ‘केवळ संसार करायचा नसून काहीतरी वेगळे करायचे आहे’, अशी ओढ असणे
सद्गुरु स्वाती खाडये : ‘ईश्वरप्राप्ती व्हायला पाहिजे’, असे तुम्हाला वाटत होते का ?
सौ. मनीषा पाठक : मी मनाचे श्लोक म्हणायचे किंवा करुणाष्टके ऐकायचे. तेव्हा मी समर्थ रामदासस्वामींशी जोडली गेले. माझ्या मनात ‘मला केवळ संसार करायचा नाही. काहीतरी वेगळे करायचे आहे’, अशी ओढ होती. ही ओढ इयत्ता ८ वीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण होईपर्यंत माझ्या मनात होती. मी स्वाध्याय परिवार, ब्रह्मकुमारीचा परिवार इत्यादी ठिकाणी जाऊन माझ्या मनातील काही प्रश्न विचारत असे.
१ ऊ. श्री गजानन महाराज यांच्याशी सूक्ष्मातून बोलणे आणि पुढील मार्ग दाखवण्यासाठी त्यांना प्रार्थना करणे
सौ. मनीषा पाठक : मी सूक्ष्मातून श्री गजानन महाराजांशी बोलायचे. मी त्यांना सांगायचे, ‘मला तुमच्या चरणांशी यायचे आहे. मी पारायण आणि उपवास करते; पण ‘याच्या पुढे काय ?’, असे माझे मन सारखे शोधत रहाते.’ एकदा माझे बाबा मला शेगावला घेऊन गेले होते. तिथे मी महाराजांचे दर्शन घेतले आणि त्यांना ‘मला मार्ग दाखवा’, अशी आर्ततेने प्रार्थना केली.
२. सनातन संस्थेशी संपर्क आणि सेवेला आरंभ !
२ अ. सनातनचे पहिले प्रवचन ऐकल्यावर मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे आणि श्री गजानन महाराजांनी ‘आता तुझा शोध संपला आहे’, असे आतून सांगणे
सौ. मनीषा पाठक : मी पदवीच्या शेवटच्या वर्षाला होते. तेव्हा सनातनच्या सांगली येथील साधिका सौ. विद्या जाखोटियाभाभी (आताच्या कै. (सौ.) विद्या जाखोटिया, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आल्या होत्या आणि त्यांचे मुरलीधराच्या मंदिरात ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन होते. तेव्हा मला सनातनचे पहिले प्रवचन ऐकायला मिळाले. तेथे मला सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. तेव्हा श्री गजानन महाराजांनी मला आतून सांगितले, ‘आता तुझा शोध संपला आहे.’
सद्गुरु स्वाती खाडये : श्री गजानन महाराजांनी तुम्हाला ही अनुभूती दिली आणि हा मार्ग दाखवला. गुरु देहाने वेगळे असले, तरी त्यांचे अंतर्मन एकच असते. सगळे गुरु आपल्याला ईश्वराकडेच घेऊन जातात.
२ आ. प्रवचनानंतर साधिकेने म्हटलेले प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन ऐकून भावजागृती होणे
सौ. मनीषा पाठक : प्रवचनानंतर जाखोटियाभाभींनी प.पू. भक्तराज महाराजांचे ‘प्रभु या माया बाजारी…’, हे भजन म्हटले. ते ऐकतांना मला पुष्कळ रडू आले. तेव्हा ‘याला भावजागृती म्हणतात’, हे मला कळत नव्हते.
२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून ‘माझे जीवन यांच्या सेवेसाठीच आहे’, असे वाटणे : भाभींनी जवळच सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावले होते. मी तेथील एक ग्रंथ उचलला आणि एक पान उघडले. तेव्हा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र दिसले. ते पाहून ‘आता माझे जीवन यांच्या सेवेसाठीच आहे’, असे मला वाटले.
२ ई. सेवेला आरंभ : प्रवचनानंतर मी भाभींना म्हणाले, ‘‘मला तुमच्यासारखी सेवा करायची आहे.’’ त्या म्हणाल्या, ‘‘उद्या ग्रंथप्रदर्शन लावायचे आहे. तू हे ग्रंथ घेऊन जा आणि उद्या प्रदर्शनाच्या ठिकाणी घेऊन ये.’’ त्या दिवसापासूनच माझी सेवा चालू झाली. सद्गुरु स्वाती खाडये : छान झाले ! तुम्हाला बालपणातच साधना कळली आणि तुम्ही लगेच साधनेला आरंभ केला.
३. दुचाकीवरून जातांना झालेल्या अपघातात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे महाविष्णूच्या रूपात दर्शन होणे आणि त्यांच्यावरील श्रद्धा वाढणे
सौ. मनीषा पाठक : मी कुलदेवाचा नामजप करत दुचाकीवरून महाविद्यालयात जात होते. आमचे महाविद्यालय चढावर होते. मी जात असतांना समोरून एक ट्रक उतारावरून खाली येत होता आणि मी चढावरून जात होते. तेव्हा गाडीसमोर मध्येच एक कुत्रा आला आणि मी ‘ब्रेक’ लावला. गाडी मार्गाच्या डाव्या बाजूला गेली आणि मी उजव्या बाजूला ट्रकच्या चाकाजवळ पडले. ट्रकच्या चालकानेही जोरात ‘ब्रेक’ लावला. मी मार्गावर पडले. तेव्हा प्रथम मला परात्पर गुरु डॉक्टरांचे महाविष्णूच्या रूपात दर्शन झाले. तेव्हा ‘गुरुदेव विराट रूपात माझ्या जवळ आहेत. त्यामुळे मला काहीच होणार नाही’, असे मला वाटले.’
४. नांदेड येथील सेवाकेंद्रात स्वच्छतेसहित सर्व प्रकारच्या सेवा करणे
सद्गुरु स्वाती खाडये : तुम्ही सेवा कशी चालू केली ?
सौ. मनीषा पाठक : मी नांदेड येथील सेवाकेंद्रात शौचालय आणि स्नानगृह स्वच्छ करायचे किंवा तेथे जी सांगतील, ती सेवा करायचे. नंतर मी पुढचे शिक्षण घेण्यासाठी पुण्याला गेले.
(पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांच्या संत-सन्मान सोहळ्याच्या वेळी सद्गुरु स्वाती खाडये यांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीतील संकलित भाग) (१४.३.२०२३)
(‘ही मुलाखत पू (सौ.) मनीषा पाठक यांना संत म्हणून घोषित करण्यापूर्वीची असल्याने त्यांच्या नावाच्या आधी ‘पूज्य’ लावलेले नाही.’ – संकलक) (क्रमशः)
|