China Builds Dam On Brahmaputra : ब्रह्मपुत्रा नदीवर चीन बांधत आहे जगातील सर्वांत मोठे धरण !
बीजिंग – चीन नेहमीच भारताविरुद्ध कट रचत असतो. आता चीन तिबेटमधील ब्रह्मपुत्रा नदीवर भारताच्या सीमेच्या अगदी जवळ जगातील सर्वांत मोठे धरण बांधणार आहे. चीनच्या जिनपिंग सरकारने या धरणाच्या प्रकल्पाला संमती दिली आहे. जिनपिंग सरकारने या धरणाला ‘पृथ्वीवरील सर्वांत मोठा प्रकल्प’ म्हणून घोषित केले आहे. तिबेटची सर्वांत लांब नदी यारलुंग त्सांगपो नदीवर हे धरण बांधले जाणार आहे. या नदीला भारतात ब्रह्मपुत्रा नदी म्हणतात. हे धरण तिबेटमध्ये अशा ठिकाणी बांधले जाईल जिथून ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेश आणि नंतर बांगलादेशाकडे वळते.
१. हे धरण उभारल्यामुळे चीनला लाभ होणार असला, तरी भारतासाठी हा चिंतेचा विषय आहे. भारतात ब्रह्मपुत्रा नदी अनेक राज्यांतून वहाते. चीनने हे धरण बांधून पाणी अडवले, तर त्याचा थेट परिणाम या राज्यांवर होणार आहे.
२. चीन या धरणाचा वापर केवळ जलविद्युत् निर्मितीसाठीच करणार नाही, तर त्याचा वापर भारताच्या विरोधात शस्त्र म्हणूनही केला जाऊ शकतो. चीनला जेव्हा वाटेल, तेव्हा त्याने या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यास भारतातील काही राज्यांमध्ये पूरजन्य स्थितीही निर्माण होऊ शकते.
३. या धरणातून भारताच्या सीमेजवळील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडून चीन पूरसदृश परिस्थिती निर्माण करू शकतो.
४. चीनची ही चाल ओळखून भारताने अरुणाचल प्रदेशात ब्रह्मपुत्रेवर धरण बांधण्यासाठी पावले उचलली आहेत.
५. सध्या चीनमधील सर्वांत मोठे धरण ‘थ्री गॉर्जेस’ आहे. या धरणात ४० अब्ज घनमीटर पाणी आहे आणि या धरणाचा पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर परिणाम होत आहे. चीनमधील या धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग मंदावला आहे; ज्यावर जगभरातील शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
संपादकीय भूमिकाआता धरणाच्या माध्यमातून चीन भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताला कात्रीत पकडण्याची एकही संधी न सोडणार्या चीनला भारताने धडा शिकवणे आवश्यक ! |