पवित्र इंद्रायणी नदी रसायनांमुळे फेसाळली !
नागरिकांनी वारंवार उपोषणे, आंदोलने करूनही प्रश्न अनुत्तरित
आळंदी (पुणे) – तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदी मागील २ दिवसांपासून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे. रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडणे, मैलामिश्रित पाणी नदीत सोडणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. हिवाळी अधिवेशनात इंद्रायणी जलप्रदूषणाचे मांडलेले सूत्र, नागरिकांनी वारंवार उपोषणे आणि आंदोलने करूनही हा प्रश्न गांभीर्याने घेतला जात नाही. जुन्या बंधार्याखालील नदीपात्रातील पाणी या पांढर्या शुभ्र तरंगणार्या फेसाने झाकून जात आहे. इंद्रायणीत रसायनयुक्त सांडपाण्यामुळे जलचरांचे जीव धोक्यात आले आहेत, असे मत स्थानिक जनतेकडून व्यक्त होत आहे.
हिवाळी अधिवेशनात तत्कालीन आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी इंद्रायणीच्या वाढत्या प्रदूषणाचे सूत्र शासनासमोर लक्षवेधी करून मांडले होते. त्या वेळी मंत्री उदय सामंत यांनी इंद्रायणी नदीविषयी सकारात्मक पावले उचलणार असून इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करणार असल्याची ग्वाही दिली आहे. (वारंवार आवाज उठवूनही इंद्रायणी नदीची स्वच्छता न होणे प्रशासनाला लज्जास्पद ! नदी प्रदूषणाच्या संदर्भात प्रशासन संवेदनशील कधी होणार ? – संपादक)