कोल्हापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम २०२४-२५ करता ऊसदर घोषित !
३ कारखान्यांचा दर ३ सहस्र ३०० रुपये प्रतिटन
कोल्हापूर – जिल्ह्यातील २३ पैकी २२ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०२४-२५ करता ऊसदर (किमानमूल्य भाव) घोषित केला आहे. यात १६ सहकारी आणि ७ खासगी कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये ‘देशभक्त रत्नाप्पा अण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना’, ‘कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना’ आणि ‘दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रिज’ या ३ कारखान्यांनी सर्वाधिक म्हणजे ३ सहस्र ३०० रुपये प्रतिटन असा दर घोषित केला आहे. काही कारखान्यांनी ३ सहस्र १००, तर काही कारखान्यांनी ३ सहस्र २००, तसेच याच्या आसपास दर घोषित केले आहेत.
‘ऊस नियंत्रण आदेश १९६६’ मधील प्रावधानांनुसार कारखान्यांनी हंगामामध्ये गाळप केलेल्या उसाचे १४ दिवसांत देय किमान मूल्यभावाप्रमाणे ऊस पुरवठादार शेतकर्यांना देणे बंधनकारक आहे. यानंतर विलंब झाल्यास १५ टक्क्यांप्रमाणे व्याज आकारण्याचे प्रावधान आहे. याचसमवेत कारखान्यांनी दर निश्चित करून त्याची माहिती वर्तमानपत्र, तसेच कारखान्याच्या स्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे.