दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार !; हिरापन्ना शॉपिंग सेंटरमध्ये आग !
७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार !
अलिबाग (रायगड) – मुरुड येथे ७ वर्षांच्या मुलीला बोटीवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी २२ वर्षीय तरुणाविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित मुलगी तिच्या बहीण-भावासह प्रातर्विधीसाठी समुद्रकिनारी गेली होती. या वेळी आरोपी आर्यन दीपक कोटकर याने तिला फूस लावून बोटीवर नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिने याविषयी सांगितल्यावर तिच्या आईने तक्रार प्रविष्ट केली.
संपादकीय भूमिका : अशा वासनांधांना कठोर शिक्षा करायला हवी !
हिरापन्ना शॉपिंग सेंटरमध्ये आग !
मुंबई – मुंबई सेंट्रल येथील हाजीअली परिसरातील सुप्रसिद्ध हिरापन्ना शॉपिंग सेंटरमध्ये तळमजल्यावरील २ बंद गाळ्यांमध्ये आग लागली आहे. आगीच्या धुराचे लोट रस्त्यावर येत होते. येथे भ्रमणभाष, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, परफ्यूम यांची अनेक दुकाने आहेत. येथील वाट चिंचोळी असल्याने आग विझवण्यास अडचण येत होती.
गोरेगाव येथे भीषण आग !
मुंबई – गोरेगावमध्ये मध्यरात्री १२ वाजता जंगलात १ कि.मी. परिसरात भीषण आग लागली. मध्यरात्री अडीच वाजता अग्नीशमनदलाने आग विझवली. डोंगराळ भागातील झाडे, झुडपे, पालापाचोळा या आगीत जळून खाक झाला.
मासेमारीसाठी गेलेली बोट बुडाली !
मुंबई – मालाड परिसरातील मढ कोळीवाड्यात मासेमारीसाठी गेलेली बोट बुडाली. रात्री १२.०० ते १२.३० च्या सुमारास मढ कोळीवाड्यातील तिसाई बोटीचा दुर्दैवी अपघात झाला. या बोटीला चीनच्या मालवाहू जहाजाने धडक दिली. त्यामुळे ही बोट उलटली. सुदैवाने आजूबाजूला काही बोटी असल्याने मासेमारी करण्यासाठी गेलेल्या कोळी लोकांचा जीव वाचला.
‘डिजिटल अरेस्ट’मध्ये कुत्र्याचे पिल्लू दाखवले !
मुंबई – येथील एका व्यक्तीला पोलिसांचा गणवेश घालून ‘डिजिटल अरेस्ट’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; पण संबंधिताने सतर्क राहून स्वतःच्या ऐवजी कुत्र्याच्या पिल्लाला भ्रमणभाषच्या छायाचित्रकासमोर धरले. यातून डिजिटल अरेस्टचा प्रयत्न करणार्याचा खोटारडेपणा उघड झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने कॅमेरा बंद केला. त्याने आधी अंधेरी पोलीस ठाण्यातील अधिकारी असल्याचे सांगितले होते.