शॅकच्या मालकाला धमकावणार्या तोतया सनदी अधिकार्याला अटक
(शॅक म्हणजे समुद्रकिनार्यावरील तात्पुरते उपाहारगृह)
म्हापसा, २९ डिसेंबर (वार्ता.) – तोतया भारतीय प्रशासकीय (सनदी) अधिकारी बनून कळंगुट भागातील शॅकच्या मालकांना धमकावणार्या ओडिशा येथील मनोज कुमार (वय ३१ वर्षे) या अभियंत्याला पोलिसांनी अटक केली आहे. मनोजकुमार याने तो एक उच्च दर्जाचा सरकारी अधिकारी असल्याचे भासवले. त्याच्याकडे भारतीय प्रशासकीय अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र सापडले. कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आाली. यासंबंधी पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी सांगितले की, संशयित मनोज कुमार हा ५ डिसेंबर या दिवशी गोव्यात आला आणि भाड्याने टॅक्सी करून कळंगुटमधील एका हॉटेलमध्ये उतरला. त्याने टॅक्सीचालकाला भारतीय प्रशासकीय अधिकारी असून लवकरच त्याचे स्थानांतर गोव्यात होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर तो गोव्यातून निघून गेला. त्यानंतर संशयित मनोज कुमार पुन्हा २० डिसेंबर या दिवशी गोव्यात आला. त्याने त्याच टॅक्सीचालकाशी संपर्क साधला. २६ डिसेंबर या दिवशी तो कळंगुट येथील टॅक्सींच्या वाहनतळावर गेला आणि भारतीय प्रशासकीय अधिकारी असल्याचे कार्ड दाखवून तेथील कर्मचार्यांना समवेत घेऊन त्याने किनारी भागाची पहाणी करणार असल्याचे सांगितले. तो भारतीय प्रशासकीय अधिकारी असल्याचे मानून कर्मचारी त्याच्यासमवेत गेले. त्यानंतर संशयिताने बागा येथील २ शॅकना भेटी देऊन तेथे पहाणी केल्याचे नाटक करत काहीतरी त्रुटी काढून शॅक बंद करण्याची धमकी दिली. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली.