बांदा सीमा तपासणी नाका बांधकामाच्या प्रकरणी १२ वर्षांनंतर महसूल विभागाला जाग !
अकृषक करापोटी १४ लाख रुपये भरण्याची महसूल विभागाची परिवहन विभागाला नोटीस
सावंतवाडी – मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील सटमटवाडी, बांदा येथील सीमा तपासणी नाका बांधण्यात आला आहे. यासाठीचा ‘अकृषक’ (एन्.ए. – नॉन ॲग्रिकल्चर) भूमी कर आणि तो कर वेळेत न भरल्याने आकारण्यात आलेला दंड, असे एकूण १४ लाख २२ सहस्र ५४० रुपये भरण्याचे निर्देश महसूल प्रशासनाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आर्.टी.ओ.ला.) नोटिसीद्वारे दिले आहेत.
सटमटवाडी येथे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांच्या सीमेवर १२ वर्षांपूर्वी सीमा तपासणी नाका उभारण्यास प्रारंभ करण्यात आला होता; मात्र त्यासाठीची भूमी ‘अकृषक’ करणे आवश्यक होते; परंतु ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी अप्रसन्नता व्यक्त करत, ‘सर्वसामान्य जनतेवर अशा प्रकरणात कारवाईचा बडगा उचलला जातो; मग आर्.टी.ओ. या शासनाच्या विभागाला वेगळा न्याय का ?’, असा प्रश्न उपस्थित केला. यामुळे शासनाची कोट्यवधी रुपयांची हानी होत असल्याचे सांगत कल्याणकर यांनी शासनस्तरावर, तसेच न्यायालयीन लढा उभारला आहे. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तब्बल १२ वर्षांनंतर महसूल प्रशासनाने कर भरण्याविषयी आर्.टी.ओ.ला नोटीस पाठवली आहे. १२ वर्षांचा भूमी महसूल कर १२ लाख ९१ सहस्र १४० रुपये आणि दंड १ लाख ३१ सहस्र ४०० रुपये, अशी एकूण १४ लाख २२ सहस्र ५४० रुपये भरण्याची नोटीस बांद्याच्या तलाठ्यांनी आर्.टी.ओ.ला पाठवली आहे. ही रक्कमही ७ दिवसांच्या आत वसूल न केल्यास पुन्हा आंदोलन करण्याची चेतावणी कल्याणकर यांनी दिली आहे.