सरपंच हत्याकांडातील आरोपींची हत्या झाल्याच्या दाव्यावर स्पष्टीकरण द्या ! – बीड पोलिसांची अंजली दमानियांना नोटीस
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण !
बीड – मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाशी संबंधित पसार आरोपींपैकी तिघांची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या दाव्यामुळे बीड पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली असून पसार आरोपींच्या संदर्भात जो दावा केला, त्याचे स्पष्टीकरण द्यावे, अशा सूचना पोलिसांनी पाठवलेल्या नोटिसीमध्ये करण्यात आल्या आहेत.
बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी अंजली दमानिया यांना नोटीस बजावली आहे. ज्या भ्रमणभाषवरून ‘व्हॉईस मेसेज’ आला, तो भ्रमणभाष क्रमांक, तो संदेश, इतर माहिती आणि पुरावे द्यावेत, असे त्या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
राजकीय वादात अभिनेत्रीचे नाव जोडणे योग्य नाही ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री
कोल्हापूर – आपण शिवछत्रपतींच्या राज्यात रहातो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेहमी स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडू नयेत, याची काळजी घेतली. त्यामुळे बीड येथील जे प्रकरण चालू आहे, त्यात अभिनेत्रीचे नाव जोडणे योग्य नाही. सुरेश धस हे एक धडाडीचे आमदार असून ‘लोकप्रतिनिधी’ या नात्याने ते त्यांची भूमिका मांडत आहेत. या संदर्भात मी आमदार सुरेश धस यांच्याशी दूरभाष करून त्यांनी असे करणे योग्य नसल्याचे सांगणार आहे.
हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांना त्यांच्या भ्रमणभाषवर ३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याचा ध्वनीसंदेश पाठवणारी व्यक्ती मद्याच्या नशेत होती, असे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.
ही माहिती मी यापूर्वीच पोलीस अधीक्षकांना दिली आहे ! – अंजली दमानियामला असलेली सर्व माहिती मी पोलीस अधीक्षकांना दिली आहे. पोलीस अधीक्षकांनी कदाचित ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडे दिली नसेल. त्यामुळे हे पत्र पाहून मला आश्चर्य वाटले. असे असले, तरी स्थानिक गुन्हे शाखेला ही माहिती हवी असेल, तर त्यांना मी माहिती देणार आहे. |
प्राजक्ता माळी यांची क्षमा मागणार नाही ! – सुरेश धस, आमदार, भाजप
बीड – मी प्राजक्ता माळी यांना ‘ताई’ म्हणालो. त्यांचा अवमान होईल, असे मी काहीही बोललेलो नाही. मी त्यांचा अवमान केलेला नसल्याने त्यांची क्षमा मागण्याचा प्रश्नच येत नाही. मी त्यांचा ‘हास्यजत्रा’ कार्यक्रम पहातो; पण त्यांनी माझा निषेध केला, तर माझेही हास्यजत्रा पहाणे बंद ! त्या महिला आयोगात गेल्या, तर मीही चौकशीला सामोरा जाईन.