शिक्षक त्यांची कर्तव्ये बजावत नाहीत ! – आमदार प्रशांत बंब, भाजप
छत्रपती संभाजीनगर – राज्यातील शाळांमधील शिक्षक त्यांची कर्तव्ये बजावत नाहीत. ते खोटी कागदपत्रे देऊन शासनाकडून विनाकारण पैशांची लूट करतात, असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी २७ डिसेंबर या दिवशी येथे केला. शिक्षकांची ही गोष्ट शिक्षक आणि आम्हा राजकारणी यांसाठी लज्जास्पद आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
आमदार प्रशांत बंब पुढे म्हणाले की, मी सातत्याने गेल्या ७-८ वर्षांपासून राज्यातील शिक्षणाची अवस्था मांडत आहे. राज्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. मी त्याची कारणेही सातत्याने मांडत आहे. देशातील पिढी घडवण्याचे सर्वांत मोठे दायित्व, हे शिक्षकांचे असते. त्यामुळेच शिक्षकांना गलेलठ्ठ वेतन दिले जाते. मी आजही त्यांना विनंती करतो की, शिक्षकांनी गावात जाऊन मुक्कामी रहावे. केवळ सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत शिकवण्याचे काम शिक्षकांचे नाही. त्यांनी २४ घंटे गावांमध्ये संस्कार आणि व्यसनमुक्ती करण्याचे काम करावे; पण दुर्दैवाने हे सांगावे लागत आहे.
मी आता दर्जेदार शिक्षणासाठी मोहीम हातात घेत आहे. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे, हे माझे मत आहे. त्यासाठी मी कायदेशीरपणे घटनेच्या चौकटीत प्रयत्न करणार आहे. वेळप्रसंगी शिक्षकांवर कठोर कारवाई करायला शासनाला भाग पाडणार आहे. शिक्षक स्वतःची मुले खासगी शाळेत घालतात, ज्या शाळांमध्ये शिक्षकांना १५ सहस्र रुपयेही वेतन नाही, तेथे सरकारी शाळेतील शिक्षकांना ६० सहस्र ते दीड लाख रुपयांपर्यंत वेतन असते.
संपादकीय भूमिकासरकारी शाळेतील शिक्षक गलेलठ्ठ वेतन घेऊनही विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यात अपयशी असणे हे प्रशासनाला लज्जास्पद ! |