‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने’चे काम बंद !
नेतवड माळवाडी येथील शेतकर्यांचा प्रकल्पाला विरोध !
पुणे – जुन्नर तालुक्यातील नेतवड येथे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्प’ २८ एकर गायरान जागेत उभारला जात आहे. या प्रकल्पाला नेतवड माळवाडी येथील ग्रामस्थांनी विरोध करत काम बंद पाडले. शेतकर्यांना वीज उपलब्ध व्हावी; म्हणून राज्य सरकारच्या वतीने सर्वत्र सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. ज्या ठिकाणी प्रकल्पाचे काम चालू आहे, तेथील ९५० जुनी झाडे वनविभागाच्या साहाय्याने तोडण्यात आली. झाडे तोडल्यावर गावाच्या हद्दीमध्ये पुन्हा वृक्षारोपण करावे, या अटीवर वनविभागाने झाडे तोडायला अनुमती दिली होती; मात्र नवीन झाडे लावण्यात आली नाही. हद्दीत ३३ एकर गायरान क्षेत्र आहे. यातील २ एकर जागा वीज वितरण केंद्राला दिली होती. उर्वरित क्षेत्रामध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारल्यास गावासाठी गायरान भूमी उरणार नाही. त्यामुळे हा प्रकल्प नको, असा ठराव ग्रामसभेत संमत केला; मात्र त्याला न जुमानता हा प्रकल्प उभारला जात आहे. आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका नेतवड आणि माळवाडी येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.
‘वीज प्रकल्पामुळे २४ घंटे वीज उपलब्ध होणार असली, तरी आमच्या गावाला या प्रकल्पाचा लाभ होणार नाही. या प्रकल्पामुळे परिसरात उष्णता निर्माण होणार असल्याने शेतातील पिके आणि बराकीत साठवलेला कांदा सडून जाईल’, असे नेतवड येथील उपसरपंच विशाल बनकर यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी ग्रामस्थ, संबंधित आस्थापन, जुन्नरचे तहसीलदार, पोलीस प्रशासन यांची बैठक घेऊन तोडगा काढू. शेतकर्यांना विश्वासात घेऊन या प्रकल्पाचे काम केले जाईल, असे सांगितले. प्रकल्पामुळे गावात गायरान क्षेत्र शिल्लक रहाणार नाही. जुनी झाडे तोडल्याने निसर्गाचा र्हास झाला आहे. झाडांवर अनेक पक्षी वास्तव्याला होते; मात्र झाडे तोडल्याने पर्यावरणाची हानी झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प उभारू देणार नाही, असे सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे यांनी सांगितले.