हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत बांगलादेशाला साहाय्य करणे अयोग्य ! – कथाकार देवकीनंदन ठाकूर
नवी मुंबई, २९ डिसेंबर (वार्ता.) – भारताने नुकताच बांगलादेशाला तांदूळ निर्यात केला. त्याला कथाकार देवकीनंदन ठाकूर यांनी आक्षेप घेतला आहे. ‘जोपर्यंत हिंदूंवर होणारे अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत बांगलादेशाला साहाय्य करणे योग्य नाही’, असे प्रतिपादन देवकीनंदन ठाकूर यांनी खारघर येथे पत्रकार परिषदेत केले. खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानात श्रीमद्भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले की,…
१. एकीकडे बांगलादेशी तेथील हिंदूंचा छळ करून त्यांची हत्या करत आहेत. मंदिरांची तोडफोड करत आहेत आणि दुसरीकडे भारत सरकार बांगलादेशाला अन्नधान्य देत आहे, हे योग्य नाही. जोपर्यंत तेथील सरकार हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलत नाही, तोपर्यंत भारताने कोणतेही साहाय्य देऊ नये. त्या सरकारने प्रथम तेथील हिंदूंसाठी स्वतंत्र राष्ट्राची व्यवस्था करावी.
२. देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी महिला आणि पुरुष यांचे बेकायदेशीर वास्तव्य आहे. हिंदूंनी कररूपाने भरलेल्या पैशातून राबवण्यात येत असलेल्या सरकारी योजनांचा लाभ बांगलादेशी नागरिकांना मिळत नाही ना, याची सरकारने काळजी घेतली पाहिजे. बांगलादेशात हिंदूंची हत्या करणार्या भावांच्या भारतात रहात असणार्या बांगलादेशी बहिणींना ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ दिला गेला नाही ना ?, याचीही निश्चिती करावी.
३. हिंदु धर्माचे संरक्षण आणि संवर्धन यांसाठी ‘सनातन बोर्ड’ स्थापन करण्याची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे मुसलमानांचे वक्फ बोर्ड आहे, शीख आणि ख्रिस्त्यांच्या संस्था आहेत. त्याचप्रमाणे सनातन धर्माच्या ४ शंकराचार्यांनीही एक बोर्ड स्थापन केले पाहिजे.
४. हिंदु परंपरेचे रक्षण करण्यासाठी आणि मंदिरांचा गैरवापर रोखण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. आम्हाला आमची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करायची आहे. मंदिरांचा पैसा गुरुकुल, रुग्णालये आणि धार्मिक संस्था सुधारण्यासाठी वापरणे आवश्यक आहे.
५. २७ जानेवारी या दिवशी प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात सनातन धर्म संसदेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व हिंदूंनी सहभागी व्हावे. आम्ही आमच्या हक्कांसाठी एकत्र येण्याची आणि आमच्या मंदिरे अन् धर्माच्या रक्षणासाठी सनातन बोर्डाची आवश्यकता असल्याचे सरकारला सांगण्याची वेळ आली आहे.
६. रामायण आणि भागवत यांचा भारतीय शिक्षणव्यवस्थेत समावेश करावा. यातून प्रत्येक घराला धर्म आणि परंपरा यांचे पालन करणारी सशक्त सनातनी मुले मिळतील. सनातन्यांनी रामायण आणि गीता यांचा अभ्यास केल्यास समाजाला दिशा मिळेल. ज्या गीतेवर हात ठेवून खोटे न बोलण्याची शपथ घेतली जाते, त्या गीतेचा शिक्षणात समावेश का होऊ शकत नाही ?
७. देशातील अनेक शाळांमध्ये मुलांना टिळा लावण्यास बंदी घातली आहे. आपली संस्कृती आणि धर्म यांच्यापासून मुलांना दूर ठेवण्याचे हे षड्यंत्र आहे. या शाळा धर्म परिवर्तनाचा अड्डा तर बनल्या नाहीत ना ? हिंदु समाज आणि सरकार या दोघांनीही जागरूक रहायला हवे.