रामापाशी एक समाधान मागावे, त्यात सर्व आले !
एक साधक वृत्तीची बाई श्रीमहाराजांच्या (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या) दर्शनास आली. श्रीमहाराज तिला म्हणाले, ‘भगवंत प्रसन्न व्हावा; म्हणून आपण हा सारा खटाटोप करतो. समजा तो प्रसन्न झाला आणि ‘तुला काय पाहिजे, ते केवळ दोन शब्दांत माग’, अशी त्याने अट घातली, तर तुम्ही काय मागाल ?’ ती म्हणाली, ‘तुझ्या नामात प्रेम दे, असे मी मागीन.’ श्रीमहाराज म्हणाले, ‘पण हे तर ४ शब्द झाले. दोनच शब्दांत मागायचे, अशी आपली अट आहे.’ बाई गोंधळून गेली. तेव्हा जरा हसून श्रीमहाराज म्हणाले, ‘समाधान दे, एवढेच मागावे. नामात प्रेम, भगवंताचे अनुसंधान, अनन्य शरणागती, भगवंताचा साक्षात्कार या गोष्टी मिळाल्याविना समाधान मिळत नाही. तेव्हा एक समाधान मागितले की, एवढ्या सर्व गोष्टी देऊनच त्याला ते देता येईल. कुणीकडून तरी आपले काम झाल्याशी कारण !’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)