दुटप्पी राहुल गांधी !
काँग्रेसचे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इंग्लंडमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलतांना अवमान केला. त्यांच्याविषयी बिनबुडाचे आरोप केले. त्याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. यामुळे वीर सावरकर यांचे वंशज सात्यकी सावरकर यांच्या भावना दुखावल्या. सात्यकी सावरकर हे वीर सावरकर यांचे नातू ! त्यांनी पुण्यातील स्थानिक न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात अपकीर्तीचा फौजदारी खटला भरला. न्यायालयाने तो आमदार/खासदार न्यायालयात वर्ग केला. सध्या या खटल्यावर अनेक सुनावण्या झाल्या; पण राहुल गांधी यांचे अधिवक्ता उपस्थित रहात नसल्याने न्यायालयाने राहुल गांधी यांना २ डिसेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश दिले. तसे न केल्यास अटक करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांच्या वतीने एक अधिवक्ता न्यायालयात उपस्थित होते. त्यांनी न्यायालयात अर्ज केला. संसदेचे अधिवेशन चालू असल्याने २० डिसेंबरपर्यंत सवलत देण्यात यावी. त्यानुसार न्यायालयाने सवलत दिली; मात्र राहुल गांधी अधिवेशन काळातच संभल येथे गेले आणि तेथे मुसलमानांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. ‘तेथे जाऊन त्यांनी केवळ राजकारण केले’, असे या खटल्यातील सात्यकी सावरकर यांचे अधिवक्ता संग्राम कोल्हटकर म्हणाले. राहुल गांधी यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे कोल्हटकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसा अर्ज देतांना संभल येथे गेल्याच्या बातम्यांची कात्रणे जोडली आहेत. आता यावर न्यायालय काय निर्णय देते, हे लवकरच समजेल.
राहुल गांधी यांना न्यायालयाचा आदर करावासा वाटला असता, तर त्यांना देहली ते पुणे प्रवास हा काही मिनिटांचा विमान प्रवास करून न्यायालयात त्यांची बाजू मांडून पुन्हा संसदेच्या कामात सहभागी होणे सहज शक्य होते; पण त्यांनी तसे न करता सवलत मागितली आणि संभल येथे जाऊन धर्मांधतेचे राजकारण केले. हा त्यांच्यातील खोटारडेपणा आहे. खरे तर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी केवळ आणि केवळ गोंधळ घालून संसद बंद पाडण्याचेच काम केले. मग एकीकडे संसदेचे काम करायचे आहे; म्हणून न्यायालयात उपस्थित रहाता येत नसल्याचे सांगायचे आणि त्याच वेळी दुसरीकडे त्याच संसदेचे काम बंद पाडायचे, हा दुटप्पीपणा नव्हे का ? राहुल गांधी यांनी अधिवेशनानंतर दुसर्याच दिवशी परभणी (महाराष्ट्र) येथे जाऊन मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेऊन जातीचे राजकारण केले.
पुढील सुनावणीच्या राहुल गांधी यांना उपस्थित रहावेच लागेल. त्यामुळे न्यायालयानेही अधिवक्ता कोल्हटकर यांच्या अर्जाची गंभीर नोंद घेत राहुल गांधींवर कारवाई करून अशा राजकारण्यांच्या दायित्वशून्य वृत्तीवर अंकुश ठेवावा.
– सौ. भक्ती भिसे, पनवेल