परात्पर गुरु डॉक्टरांची ‘जिज्ञासा’, ‘संशोधक वृत्ती’ आणि ‘साधकांवरील निरपेक्ष प्रेम’ यांमुळे असे चालू झाले सूक्ष्म जगताचे अद्वितीय संशोधन !
‘मार्च-एप्रिल २००१ मध्ये सनातनच्या दैदीप्यमान इतिहासातील एका आगळ्यावेगळ्या आणि ‘न भूतो न भविष्यति ।’ अशा अध्यायाला प्रारंभ झाला. मी सुखसागर, फोंडा येथे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या निर्मितीची सेवा करत होते. एक दिवस मी पूर्ण झालेले साप्ताहिक घेऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे अंतिम पडताळणीसाठी गेले. तेव्हा ते मला अकस्मात् म्हणाले, ‘‘तुमच्याकडील साप्ताहिक निर्मितीची पुढील सेवा आता हस्तांतरित करा. उद्यापासून तुम्ही सूक्ष्म-विभागात सेवा करणार आहात !’’ त्यांचे बोलणे ऐकून मी काही क्षण भांबावले; कारण ‘सूक्ष्म-विभाग’ हा शब्द मी प्रथमच ऐकत होते.
१. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधिकेला सूक्ष्म-विभागाविषयी सांगणे
१ अ. ‘सूक्ष्म-विभागातील सेवांविषयी पुष्कळ जिज्ञासा वाटणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘वाईट शक्तींचा त्रास ‘न्यून कसा करू शकतो ?’, हे शोधायचे आहे’, असे सांगणे : ‘नवीन सूक्ष्म-विभाग कसा असेल ?, तेथे कोणत्या सेवा असतील ?, त्या सेवा मला जमतील का ?’, या विचारांनी मला रात्रभर झोप लागली नाही. ‘या सेवांचे स्वरूप काय असेल ?’, याची मला पुष्कळ जिज्ञासा होती. सकाळी मी गुरुदेवांना भेटले आणि सूक्ष्म-विभागातील सेवांचे स्वरूप विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काही नाही. साधकांच्या साधनेत अडथळे आणणार्या आध्यात्मिक त्रासांचे निवारण करायचे. त्रास देणार्या वाईट शक्तींचा त्रास ‘न्यून कसा करू शकतो ?’, हे शोधायचे.’’
१ आ. ‘वाईट शक्तींचे निवारण देवच करणार आहे’, असे सांगून परात्पर गुरु डॉक्टरांनी साधिकेला आश्वस्त करणे : माझ्या मनात प्रश्नांचे काहूर माजले होते. मी परात्पर गुरु डॉक्टरांना पुन्हा विचारले, ‘‘वाईट शक्तींविषयी अभ्यास करायचा, तर मी ‘करणी’, ‘भूतबाधा’ इत्यादी माहिती असलेल्या ग्रंथांचा अभ्यास चालू करू का ?’’ या माझ्या बाळबोध प्रश्नावर ते हसले आणि त्यांनी मला आश्वस्त केले, ‘‘आपण काहीच करायचे नाही. देवच सर्व करणार आहे ! आपण केवळ त्याला प्रार्थना करायची आणि त्यालाच विचारायचे.’’
२. साधकांची साधना आणि अध्यात्मप्रसार यांमध्ये अडथळे आणणार्या वाईट शक्तींचे निवारण करण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्म-विभाग स्थापन करणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्मप्रसारासाठी स्वतःचे आयुष्य वेचले. अध्यात्मप्रसार जसा जोमाने वाढू लागला, तशी त्यांच्यावरील वाईट शक्तींची आक्रमणेही वाढू लागली. पुढे साधकांनाही आध्यात्मिक त्रास होऊ लागले. साधकांना त्रास होऊ लागल्यावर मात्र गुरुदेव हुंकारले, ‘आतापर्यंत मला त्रास दिला, तर मी गप्प राहिलो; पण आता माझ्या साधकांना त्रास देऊ लागलात, तर मी गप्प बसणार नाही.’ यानंतर सूक्ष्म-विभागाला आरंभ झाला.
३. एका साधिकेने सुखसागर येथे येऊन वाईट शक्तींची स्थाने शोधणे
३ अ. एका साधिकेला उघड्या डोळ्यांनी सूक्ष्मातील दृश्ये, तसेच चांगल्या-वाईट शक्ती दिसणे : एक साधिका तेव्हा सुखसागर,फोंडा येथे आल्या होत्या. त्यांना उघड्या डोळ्यांनी सूक्ष्मातील सर्व दिसत असे. दैवी आशीर्वाद असल्यास ६ वे इंद्रिय जागृत झालेले असते. त्याप्रमाणे त्यांना उघड्या डोळ्यांनी चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या शक्ती दिसत. त्या हुबेहूब रंगांसह त्या वेगवेगळ्या वाईट शक्तींचे चित्रही काढू शकत होत्या.
३ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या साधिकेसमवेत ‘सुखसागर’मधील वाईट शक्तींची स्थाने शोधून आणि त्यांचे परीक्षण करून निवारण करणे : वर्ष २००१ मध्ये ‘सुखसागर’ च्या शेजारी एक पडीक वास्तू होती. त्या वास्तूमध्ये असंख्य वाईट शक्ती वास करायच्या. हे सर्व सर्वसामान्यांना कळणे शक्य नव्हते; परंतु ‘त्या वास्तूत वाईट शक्तींचे प्रकार चालतात’, हे सर्वत्र प्रसिद्ध होते. या वास्तूतील वाईट शक्तींना ‘सुखसागर’ येथील सात्त्विकता सहन होत नसल्याने त्या सतत ‘सुखसागर’वर आक्रमणे करत असत. त्या साधिकेला हे सर्व उघड्या डोळ्यांनी दिसत होते. एक दिवस परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या साधिकेसमवेत फिरून ‘सुखसागर’च्या पूर्ण वास्तूचे परीक्षण केले. त्यांनी ‘सुखसागर’मधील वाईट शक्तींची सर्व स्थाने शोधून त्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय केले आणि वाईट शक्तींचे निवारण केले.
३ इ. साधिकेने वाईट शक्तींचे स्थान दाखवल्यावर तेथे उभे राहून परात्पर गुरु डॉक्टरांनी नामजप करणे आणि त्यामुळे वाईट शक्ती तेथून निघून जाणे : त्या वेळी आम्ही प्रथमच वाईट शक्तींना घालवण्याचे उपाय पहात होतो. एरव्ही समाजात वाईट शक्ती घालवण्यासाठी विविध उपाय केले जातात; पण इथे आम्ही अनुभवत होतो, ते सर्व बुद्धीअगम्य होते. त्या साधिका वाईट शक्तींचे सूक्ष्म अस्तित्व अनुभवत होत्या आणि परात्पर गुरु डॉक्टरांना त्यांचे स्थानही दाखवत होत्या. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर नामजप करत तिथे उभे रहात आणि काही वेळाने त्या साधिका सांगत, ‘‘हे स्थान शुद्ध झाले आहे. येथील वाईट शक्ती आता पळून गेल्या आहेत.’’ या सगळ्याचे वर्णन मी शब्दांत करू शकत नाही.
३ ई. परात्पर गुरु डॉक्टरांचा ‘नामजप’, ‘संकल्प’ आणि ‘अस्तित्व’ यांमुळे वाईट शक्तींवर परिणाम होऊन त्यांनी वास्तू सोडून जाणे : साधिकेच्या त्या वेळच्या बर्याच परीक्षणांत असे दिसले की, ‘परात्पर गुरु डॉक्टर जवळ येत आहेत’, असे पाहून वाईट शक्ती पळून जात असत. गुरुदेवांनी एखाद्या कोपर्यात किंवा भिंतीवरून हात फिरवला की, त्या पळून जात आणि शेजारच्या इमारतीत निघून जात. परात्पर गुरु डॉक्टरांचे आध्यात्मिक सामर्थ्य एवढे होते की, त्यांनी केलेला नामजप, त्यांचा संकल्प आणि त्यांचे अस्तित्व यांनीच वाईट शक्तींची शक्ती न्यून होत असे.
४. आध्यात्मिक सामर्थ्य असूनही सतत शिष्यभावात राहून ‘श्री गुरूंच्या कृपेने झाले’, असे सांगणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
आम्ही अनेक साधकांनी वाईट शक्तींनी वास्तू सोडून पळून जाणे प्रत्यक्षच पाहिले आणि त्या साधिकेने सूक्ष्मातून अनुभवले की, वाईट शक्ती गुरुदेवांना घाबरत; पण गुरुदेव नेहमीच नम्रपणे म्हणत, ‘‘माझे गुरु सर्व करतात’’ किंवा ‘‘देव किती करतो ना !’’ त्यांनी कधीही स्वत:ची आध्यात्मिक क्षमता दाखवण्यासाठी अवडंबर केले नाही. समाजातील अघोरी बाबा पुष्कळ आरडा-ओरडा करून वाईट शक्ती घालवतात. गुरुदेव मात्र नेहमीच म्हणत, ‘‘आपले ध्येय ‘वाईट शक्तींवर उपाय करणे’, हे नसून साधकांच्या साधनेत अडथळे आणणार्या वाईट शक्तींपासून साधकांचे रक्षण करणे, हे आहे.’’
– सौ. मंगला पांडुरंग मराठे, फोंडा, गोवा.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |