गुरुदेवांप्रती अपार श्रद्धा असलेले आणि सेवेची तळमळ असणारे जुन्नर येथील श्री. खंडू डुंबरे (वय ६७ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
साधनेचे गांभीर्य आणि शिकण्याची वृत्ती असलेले श्री. खंडू डुंबरे !
श्री. खंडू तुळशीराम डुंबरे (वय ६७ वर्षे) यांचे घर जुन्नर गावापासून २ कि.मी. अंतरावर आहे. डुंबरेकाका त्यांच्या पत्नीसह साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांचे वितरण करतात, तसेच ‘आकाशकंदिल आणि भेटसंच यांची मागणी घेणे, सनातन पंचांगांचे वितरण करणे, ग्रंथप्रदर्शन लावणे, गुरुपौर्णिमेचा प्रसार करणे, अर्पण मिळवणे, नियतकालिकांचे वर्गणीदार करणे, तसेच नूतनीकरण करणे’, यांसारख्या सेवा करतात.
पू. (सौ.) मनीषा पाठक आणि एक साधिका यांना जाणवलेली डुंबरेकाकांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. पू. (सौ.) मनीषा पाठक, पुणे
१ अ. नम्रतेने बोलणे आणि बोलण्यात कर्तेपणा नसणे : ‘डुंबरेकाकांच्या बोलण्यात पुष्कळ नम्रता असते. त्यांच्या बोलण्यात मला कधीच अहं आणि कर्तेपणा जाणवला नाही.
१ आ. साधनेचे गांभीर्य असणे : काकांना प्रथम पाहिल्यावर ‘काका सनातनचे पुष्कळ जुने साधक आहेत’, असे मला जाणवले. त्यांनी २ वर्षांतच अष्टांग साधनेचे सर्व टप्पे अत्यंत तळमळीने कृतीत आणण्याचा प्रयत्न केला.
१ इ. शिकण्याची वृत्ती असणे : श्री. डुंबरेकाका एक वर्षापूर्वी जुन्नर येथील सत्संगाला आले होते. त्या वेळी ते सत्संगात सांगितली जाणारी सूत्रे लिहून घेत होते. ते प्रत्येक सूत्राची मनापासून नोंद करत होते. तेव्हा मला त्यांच्यात बालकभाव जाणवला. ते नेहमीच शिकण्याच्या स्थितीत असतात. ‘काका ठाणे जिल्ह्यात माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक होते’, असे मला नंतर कळले.
१ ई. जाणवलेले पालट : काकांचा चेहरा तेजस्वी वाटतो.
२. सौ. स्मिता बोरकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६८ वर्षे), जुन्नर, पुणे.
२ अ. आधार वाटणे : ‘जुन्नर केंद्रातील साधकांना श्री. डुंबरेकाकांचा पुष्कळ आधार वाटतो.
२ आ. सेवेची तळमळ
१. काका अनेकदा त्यांच्या मुलाकडे रहायला जातात; पण ‘सेवा करता यावी’, यासाठी ते एकच दिवस गावाला जाऊन पुन्हा जुन्नर येथे परत येतात.
२. त्यांनी एका फळविक्रेत्या महिलेला साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या अंकाचे वर्गणीदार केले आहे. ‘सेवा हाच प्राण !’, असा त्यांचा भाव आहे.
२ इ. अल्प अहं : काका एका शाळेत मुख्याध्यापक होते, तरी कोणतीही सेवा करतांना त्यांच्यात अहं जाणवत नाही.
२ ई. नामजपादी उपायांमुळे काकांच्या नातवाच्या गळ्याजवळ झालेल्या गाठीचा वैद्यकीय अहवाल ‘नॉर्मल’ येणे आणि ‘उपायांचा परिणाम प्रभावी होतो’, हे लक्षात आल्याने काकांची परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धा दृढ होणे : डुंबरेकाकांच्या नातवाच्या गळ्याजवळ २ मासांपूर्वी एक गाठ झाली होती. त्यासाठी काका-काकूंना नामजपादी उपाय करण्यास सांगितले होते. त्या दोघांनीही नामजप भावपूर्ण रीतीने केला. त्यानंतर आधुनिक वैद्यांनी ‘ती गाठ कर्करोगाची आहे का ?’, हे पहाण्यासाठी वैद्यकीय पडताळण्या केल्या, तर तो अहवाल ‘नॉर्मल’ आला. तेव्हा काकांचा भाव जागृत झाला आणि ‘नामजपादी उपायांचा परिणाम प्रभावी होत आहे’, असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांची गुरुदेवांवरील श्रद्धा आणखी दृढ झाली.’
श्री. खंडू डुंबरे यांनी व्यक्त केलेले मनोगतआध्यात्मिक पातळी घोषित केल्यावर श्री. डुंबरेकाकांची भावजागृती झाली. साधनेच्या प्रयत्नांविषयी ते म्हणाले, ‘‘मन एकाग्र करून व्यष्टी साधना करायला हवी. आपण किती साधना करतो यापेक्षा ती किती मनापासून करतो, हे गुरुदेव पहातात, हे मला शिकायला मिळाले. तसे प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवे.’’ |
जुन्नर (पुणे) – सेवेची तीव्र तळमळ असणारे, तसेच गुरुदेवांप्रती श्रद्धा आणि भाव असणारे येथील श्री. खंडू डुंबरे (वय ६७ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे २६ डिसेंबर या दिवशी जुन्नर येथील एका सत्संगात घोषित करण्यात आले. सनातनच्या १२३ व्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी ही आनंदवार्ता घोषित केली. ही वार्ता ऐकल्यावर सत्संगाला उपस्थित सर्व साधकांची भावजागृती झाली. या वेळी साधकांनी श्री. डुंबरे यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे सांगितली. सत्संगाच्या प्रारंभी भावप्रयोगाच्या वेळी साधकांनी त्यांना आलेल्या अनुभूती सांगितल्या.
या वेळी पू. (सौ.) मनीषा पाठक श्री. डुंबरेकाकांविषयी म्हणाल्या, ‘‘कठीण प्रसंगांमध्येही श्री. डुंबरेकाकांनी साधनेचे अखंड प्रयत्न केले. ते ३५ वर्षे शाळेत शिक्षक आणि त्यानंतर मुख्याध्यापक होते. त्यानंतर ते निवृत्त झाले. तरी काकांच्या बोलण्यात कोणताही अहं जाणवत नाही. काका मायेतून अलिप्त झाल्याचे जाणवतात. स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाचे प्रयत्न काकांनी मनापासून केले.’’
सौ. वंदना खंडू डुंबरे (काकांच्या पत्नी) म्हणाल्या, ‘‘माझी साधना चालू होऊन ४ वर्षे झाली. माझी साधना चालू झाल्यानंतर यजमानही साधना करू लागले; मात्र माझ्यापेक्षा त्यांचे साधनेचे प्रयत्न अधिक गांभीर्याने होतात. तेच मला साधनेच्या प्रयत्नांमध्ये साहाय्य करतात. ‘माझे प्रयत्न चांगले होतात’, असे मला वाटायचे. यजमानांची अंतर्मनातून साधना चालू असल्याचे गुरुदेवांनी आज मला लक्षात आणून दिले.’’
सौ. स्मिता बोरकर म्हणाल्या, ‘‘काकांना त्यांच्या चुका सांगितल्यानंतर ते त्यांच्या चुका मनापासून स्वीकारतात. त्याविषयी खंत वाटून आणि शिकण्याच्या स्थितीत राहून ती चुक पुन्हा होणार नाही, यासाठी प्रयत्न करतात.’’
कार्यक्रमाच्या वेळी साधकांना आलेली अनुभूती
१. पू. (सौ.) मनीषाताई भावप्रयोग सांगत असतांना सुक्ष्मातून गुरुदेव घरात आले आहेत. ते पू. मनीषाताई बसलेल्या आसंदीकडे गेले. त्याचक्षणी पू. मनीषाताईंच्या ठिकाणी गुरुदेव दिसू लागले. त्यावरून ते दोघेही वेगळे नाहीत, अशी अनुभूती उपस्थित साधकांना आली.
२. कु. प्रार्थना पाठक
(वय १३ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)
काकांची आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यानंतर वातावरणात सकारात्मक पालट जाणवला. आनंदाची आणि चैतन्याची स्पंदने वाढली. वातावरणातील प्रकाशात वाढ होऊन संपूर्ण घरात हलकेपणा जाणवत होता.
श्री. खंडू तुळशीराम डुंबरे यांना साधना करतांना शिकायला मिळालेली सूत्रे !
पूर्वी श्री. खंडू डुंबरे हे त्यांच्या पत्नीसमवेत अधून-मधून सनातनचे सत्संग ऐकायचे. त्यानंतर ते ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गाला उपस्थित राहू लागले. नंतर त्यांनी साधनेला आरंभ केला. त्यांनी केलेले साधनेचे प्रयत्न आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. डुंबरे पती-पत्नीमध्ये झालेले पालट पाहून नातेवाईक नामजप करू लागणे
‘साधना करू लागल्यावर आम्ही सत्सेवा म्हणून नातेवाइकांना साधना सांगायला आरंभ केला. जेव्हा घरी एखादा कार्यक्रम असायचा, तेव्हा त्या निमित्ताने सर्व नातेवाईक एकत्र यायचे. त्या वेळी आम्ही त्यांना नामजप करण्याचे महत्त्व सांगायचो. नंतर आम्हा उभयतांमध्ये झालेले पालट पाहून आमचे नातेवाईकही नामजप करू लागले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनाने वेळी डोळ्यांत भावाश्रू येणे आणि त्यांनी व्यष्टी साधना वाढवण्यासाठी प्रयत्न करायला सांगितल्यापासून नामजप चांगला होऊ लागणे
एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘साधनावृद्धी शिबिर’ झाले. त्या शिबिरात सहभागी होण्याची संधी मला मिळाली. त्या वेळी माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन घेण्याची तळमळ वाढली होती. शिबिर संपल्यानंतर त्यांने दर्शन झाले. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले. गुरुदेवांनी मला व्यष्टी साधना वाढवण्यासाठी प्रयत्न करायला सांगितले. तेव्हापासून माझा नामजप चांगला होऊ लागला आहे.
३. गुरुकृपेने व्यष्टी साधनेचे प्रयत्न होऊ लागणे
नामजपासह माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया (टीप) होऊ लागली. ‘व्यष्टी साधनेच्या आढाव्यात चुका सांगणे, तसेच साधकांनी सांगितलेल्या चुका स्वीकारणे’, यांसारखे प्रयत्न गुरुकृपेने माझ्याकडून होऊ लागले.
(टीप : स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया म्हणजे स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं न्यून करण्यासाठी नियमितपणे चुका लिहून त्यावर मनाला स्वयंसूचना देणे.)
‘गुरुदेवांनी या जिवाकडून साधनेचे प्रयत्न अखंड करून घ्यावेत’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. खंडू तुळशीराम डुंबरे (वय ६७ वर्षे), जुन्नर, पुणे. (१६.११.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |