बालकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र बाल अधिकार कक्षाची स्थापना !
प्रयागराज महाकुंभपर्व २०२५
प्रयागराज – महाकुंभपर्वासाठी येणार्या भाविकांसह लहान मुलेही येतील. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून त्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र बाल अधिकार कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. हे कक्ष केवळ बालकांच्या सुरक्षेसाठीच कार्यरत असतील. बाल अधिकारांप्रती संवेदनशील असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचीच या कक्षात नियुक्ती करण्यात येणार आहे. पालकांपासून हरवलेल्या, घरातून पळून आलेल्या, रस्ता चुकलेल्या किंवा पालकांनी बलपूर्वक सोडून दिलेल्या मुलांच्या संरक्षणासाठी हे पथक कार्यरत असेल.
रेल्वे विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, लहान मुलांच्या खिशात मुलांचे नाव, वडिलांचे नाव, संपूर्ण पत्ता आणि भ्रमणभाष क्रमांक आदी माहिती ठेवावी, म्हणजे आपत्काळात मुलांना साहाय्य करणे सुलभ होईल. यासह महिला आणि बालविकास विभागाकडूनही प्रयागराज रेल्वे स्थानकावर विशेष कक्ष उभारण्यात येणार आहे.
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने लहान मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष योजना आखण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार वरील निर्णय घेण्यात आला आहे.